Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

संधीचे रूपांतर विजयात करू- प्रतीक पाटील
सांगली, १ एप्रिल / प्रतिनिधी

 

महाराष्ट्राचे कर्तेकरविते ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांचा राजकीय खंबीरपणा व निष्ठा या बळावरच सांगली लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामाची दखल घेऊन काँग्रेसने दिलेल्या या संधीचे आपण विजयात रूपांतर करू, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार खासदार प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा अधिकृत उमेदवार जाहीर होत नसल्याने काँग्रेसअंतर्गत तर्कवितर्क सुरू होते. महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम हे आपले चिरंजीव विश्वजित यांच्या उमेदवारीसाठी हटून बसले होते, तर कवठेमहांकाळचे आमदार अजित घोरपडे हे प्रथमपासूनच बंडखोरीच्या तयारीला लागले होते. या पाश्र्वभूमीवर सांगलीची उमेदवारी जाहीर करण्यास काँग्रेसला विलंब झाला. परंतु मंगळवारी रात्री उशिरा प्रतीक पाटील यांची अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर ते दैनिक ‘लोकसत्ता’शी बोलत होते.
प्रकाशबापू पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर आपणाला या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. गेल्या तीन वर्षांच्या काळात आपण मौनी न राहता अनेक प्रश्न संसदेच्या पटलावर उपस्थित केले. त्यात स्थानिक प्रश्नांनाही आपण अधिक महत्त्व दिले होते. खासदार निधी व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदानाचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला. ग्रामीण भागातील सडक योजना पूर्णत्वास नेली. दुष्काळी भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अथक परिश्रम घेतले. राज्यातील अन्य खासदारांच्या तुलनेत आपण अधिक सक्रिय होतो, असा दावाही प्रतीक पाटील यांनी केला.
सध्या देशाला स्थिर सरकार हवे, अशीच जनमताची भावना आहे. काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत देशातील विविध प्रश्नांची सोडवणूक केली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व पुरोगामी लोकशाही आघाडीच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम सरकार म्हणून या लोकशाही आघाडीकडे पाहिले जाते. आता या निवडणुकीतही काँग्रेसला अधिक बळकट करण्यासाठी नेत्यांनी एकदिलाने प्रयत्न केले, तर पुन्हा एकदा काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडी सत्तेवर येणार आहे.
आपली उमेदवारी ही केवळ प्रतीक पाटील यांची नसून ती काँग्रेस कार्यकर्त्यांचीच आहे, असे आपण समजतो. ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याबाबत आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नसून डॉ. कदम व त्यांचे चिरंजीव विश्वजित यांची भेट घेऊन त्यांनाही आपल्या प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहोत. तसेच राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचीही आपण भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनीही आपल्याला विजयी होण्याचे आशीर्वाद दिले असल्याचेही प्रतीक पाटील यांनी सांगितले.