Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

साताऱ्यात उदयनराजेंचा जोरदार शक्तिप्रदर्शनात अर्ज दाखल
सातारा, १ एप्रिल/प्रतिनिधी

 

छत्रपती शिवाजीमहाराजांचे थेट तेरावे वंशज माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी आपल्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणुकीने जोरदार शक्तिप्रदर्शन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
गृहमंत्री जयंत पाटील व जलसंपदामंत्री रामराजे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गर्जे उदयनराजे,उदयनरार्जे’च्या जयघोषात जलमंदिरपासून ही मिरवणूक काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास देशमुख यांच्याकडे उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत ‘ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. धैर्यशील पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार लक्ष्मणराव पाटील व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील उपस्थित होते.
आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज सादर करताना, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार सदाशिवराव पोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत,उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, मकरंद पाटील, डॉ. अतुल भोसले, जिल्हा विकास आघाडी संस्थापक यशवंतभाऊ भोसले आदी मान्यवरांचा समावेश होता.