Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

माढय़ातील भाजपचे देशमुख पवारांपेक्षा दुप्पट श्रीमंत!
सोलापूर, १ एप्रिल/प्रतिनिधी

 

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख हे येथील राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार यांच्यापेक्षा दुप्पट श्रीमंत असल्याचे आढळून आले आहे.
श्री. देशमुख यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात त्यांची स्वत:ची तसेच पत्नी सौ. स्मिता आणि मनीष व रोहन या मुलांकडे मिळून १७ कोटी ७० लाख ११ हजार ७५७ रुपयांच्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. काल श्री. पवार यांनी त्यांची सर्व संपत्ती ८ कोटी ७० लाख ७३ हजार ८१२ रुपये दाखविली. श्री. देशमुख हे श्री. पवार यांच्यापेक्षा दुप्पट श्रीमंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्री. पवार यांच्याकडे एकही वाहन नाही तर श्री. देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांकडे पाच मोटारी, चार ट्रॅक्टर, दोन मोटारसायकली आहेत. श्री. देशमुख यांच्या नावाने रोखे, प्रमाणपत्रे, शेअर्स रूपाने ७ कोटी ४२ लाख ८७ हजार ६८० रुपयांसह कोंडी येथील शेतजमीन एक कोटी, कोंडी येथील वाणिज्य व निवासी जागा २ कोटी ४० लाख ७ हजार रुपये याप्रमाणे एकूण १३ कोटी ७० लाख ९३ हजार ६३ रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या पत्नी सौ. स्मिता यांच्या नावाने एकूण ३ कोटी ९४ लाख ७६ हजार ४९० रुपयांची संपत्ती आहे. त्यात प्रामुख्याने व्याज मूल्यांसारखा ३ कोटी ६३ लाख ७१ हजार ८०६ रुपयांचा समावेश आहे.
मुलगा रोहन याच्या नावाने ५३ हजार ७४८ रुपये तर मनीषच्या नावाने ३ लाख ८८ हजार ५६ रुपयांची संपत्ती दाखविण्यात आली आहे.