Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गडहिंग्लजमध्ये जनसुराज्यची विचित्र कोंडी
दत्ता देशपांडे
गडिहग्लज, १ एप्रिल

 

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संभाजीराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. स्वत: संभाजीराजे विविध नेत्यांच्या भेटी घेवून लागले. पाठोपाठ शाहू महाराजही संभाजीराजेंच्या पाठिंब्यासाठी दौऱ्यावर राहिले. पण जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते प्रकाशराव चव्हाण यांना संभाजीराजेंनी दिलेला चकवा जनसुराज्यच्या जिव्हारी लागला आहे.
प्रकाश चव्हाण हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. पण कुपेकरांशी बिनसल्यानंतर त्यांनी बंडाचा झेंडा हातात घेवून जनसुराज्य पक्षाची उमेदवारी स्वीकारली आणि विधानसभा निवडणुकीत मतांच्या बेरजेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढाई करून प्रकाश चव्हाण थांबले नाहीत. त्यांनी जनसुराज्यच्या माध्यमातून तालुक्यात स्वत:चा वेगळा गट निर्माण केला. अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जनता दलाच्या साथीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवल्या. पण यश मिळाले नाही.
पाठोपाठ गडिहग्लज नगरपालिका निवडणुकीत जनता दल व जनसुराज्य आघाडीने मात्र घवघवीत यश संपादन करत गडिहग्लज साखर कारखाना पाठोपाठ नगरपालिकेवरही सत्तेचा झेंडा फडकविला. सध्या जनसुराज्य आणि जनता दल अशी अभेद्य आघाडी गडिहग्लज तालुक्यात वावरत आहे. याच आघाडीने नगरपालिका पोटनिवडणुकीत विजयाचा बार उडवून आपले राजकारणातले अस्तित्व दखल घेण्यासारखेच आहे हे दाखवून दिले आहे.
जनता दलाचे श्रीपतराव शिंदे हे डाव्या विचारांचे नेते म्हणून जनता दलाची पकड घट्ट ठेवून आहेत. सदाशिवराव मंडलिक यांच्याशी त्यांच्या विचाराची नाळ जुळते. त्यामुळे मंडलिक डावा विचार घेवून लोकसभा िरगणात उतरणार असतील तर शिंदेंचा त्यांना पाठिंबा राहणारच आहे. सदाशिवराव मंडलिक ज्या ज्यावेळी गडिहग्लज विभागाच्या दौऱ्यावर आले त्यावेळी श्रीपतराव िशदे यांची भेट घेवूनच गेले. शिंदे यांच्यासोबत प्रकाश चव्हाणांची राजकीय सोयरीक असल्याने मंडलिकांचेही चव्हाण यांच्याशी संबंध दृढ झाले. त्यामुळे आम्ही मंडलिक यांच्या पाठीशी आहोत अशी घोषणा यापूर्वी अनेकवेळा शिंदे-चव्हाण जोडीने केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ात जनसुराज्य पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने आहे. त्यात मंडलिक आणि विनय कोरे यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य जिल्ह्य़ाला माहीत आहे. अशा स्थितीत मंडलिकांना पाठिंबा द्यावा की विनय कोरे यांच्या जनसुराज्यचे घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर रहावे अशा द्विधा मनस्थितीत चव्हाण आणि त्यांच्या जनसुराज्य पक्ष वावरत आहे. स्थानिक राजकारणाची कोंडीही या पक्षाला त्रासदायक ठरणार आहे.
अशा राजकीय वातावरणात विजयाचा कौल आपल्याला मिळाला पाहिजे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजीराजे धडपडत आहेत. उमेदवारी स्पर्धेतील ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुपेकर यांची त्यांच्या कानडेवाडी गावी भेट देवून कुपेकरांशी मोकळेपणाने संभाजीराजे बोलले. कुपेकरांच्या कार्यकर्त्यांना मानाची वागणूक देवू हे सांगताना स्थानिक कोणत्याही राजकारणात आपण लक्ष घालणार नाही असा शब्द दिला. संभाजीराजे कुपेकरांना भेटले पण जनसुराज्य पक्षाचा पाठिंबा असतानाही प्रकाश चव्हाणांची भेट का टाळली, याचे गुपित उलगडले नाही.