Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सातारा जिल्हा आदर्श बनवणार - उदयनराजे
सातारा, १ एप्रिल/ वार्ताहर

 

आपल्या उमेदवारीसाठी जिल्ह्य़ातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहून मनापासून पाठिंबा दिला. या सर्वाच्या सहकार्याच्या जोरावर जिल्हा आदर्श बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे उदयनराजे भोसले यांनी
प्रांताधिकारी रामदास जगताप यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हॉटेल महाराजा येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, माजी खासदार सदाशिव पोळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप, यशवंतभाऊ भोसले, डॉ. अतुल भोसले, राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माने यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी सांगितले की, आजची रॅली उत्साहात भव्य स्वरूपात काढल्याचे सर्व श्रेय जिल्ह्य़ातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे.
आपण भविष्यकाळात कोणाच्याही कामात हस्तक्षेप न करता सर्वाना बरोबर घेऊन भेदभाव न करता व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करणार आहे. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. शिवसेनेच्या वतीने पुरुषोत्तम जाधव यांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी लोकशाहीमध्ये उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आजचा प्रतिसाद बघता आपल्या उमेदवारीला कोणताही धोका नाही. देशाला दिशा देण्यासाठी अनुभवी व्यक्तींची गरज आहे. लालकृष्ण अडवानींचा विचार देशाला मारक होईल. शरद पवार व मनमोहन सिंग हेच देशाला प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जातील. पंतप्रधानपदासाठी तेच लायक उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले.