Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘सर्व शेतकऱ्यांनी शरद पवारांना विजयी करावे’
सांगोला, १ एप्रिल/वार्ताहर

 

डाळिंबावरील तेल्या रोगाने डाळिंब उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी मदतीचे पॅकेज देऊन मोठा दिलासा दिला. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी शरद पवार यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी केले आहे.
डाळिंब उत्पादक संघ यांच्या विद्यमाने सांगोला, माढा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यांतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची बैठक सांगोला येथे झाली. या बैठकीत चांदणे बोलत होते.
प्रगतशील बागायतदार बाबुराव गायकवाड म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले नेते आपणास लाभले आहेत. त्यांना मतदान करण्याची संधी आपणास मिळत आहे. हे या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे भाग्य आहे. शेतीच्या ज्या ज्या समस्या आहेत. जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडविण्याची धमक शरद पवार यांच्याकडे आहे म्हणून केवळ शेतकऱ्यांनीच नव्हे तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून पवार यांना साथ द्यावी, असे आवाहन केले.आटपाडीचे आनंदराव पाटील म्हणाले की, मोफत फलोत्पादन योजनेंतर्गत फळबाग लावा योजना शरद पवार यांनी सुरू केली. त्यामुळे दुष्काळी माण, आटपाडी, सांगोला, जत, माढा आदी भागातील शेतकऱ्यांनी डाळिंब लागवडबरोबर बोर, सीताफळ, अंजिर, चिकू आदी फलबागांची लागवड करून दुष्काळी पट्टा कॅलिफोर्निया करण्याचा प्रयत्न पवार यांच्यामुळे झाले आहे. ज्या माळरानावर कुसळशिवाय काहीही येत नव्हते. वर्षांकाठी हजार- पाचशे रुपयाची बाजरी होत नव्हती. त्याच जमिनीत परदेशातील परकीय चलन मिळवून लाखो रुपयांचे उत्पादन काढले. आज जो दुष्काळी तालुक्यातील २५ ते ३० टक्के शेतकरी झोपडीतून बंगल्यात राहण्यास गेला, सायकलवरून स्कॉर्पिओमधून फिरू लागला. त्याचे संपूर्ण श्रेय शरद पवार यांना आहे. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना ताठ मानेने समाजात फिरण्याची संधी मिळाली आहे. भविष्यात त्यांना मतदान करून मिळालेल्या संधीचे सोने करून घ्या. आमच्या तालुक्याला आजपर्यंत संधी होती. परंतु मतदारसंघाच्या बदलामुळे संधी हुकली आहे. तुम्ही बहाद्दर शेतकऱ्यांनी तरी संधी घ्यावी, असे आवाहन केले.
विभागीय संचालक दिलीप माने म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळे शेतकरी, शेतमजूर यांची अपेक्षा उंचावल्या आहेत. या अपेक्षा शरदराव पूर्ण करतील या अपेक्षेने या भागातील अपेक्षा उंचावलेली जनता, शेतकरी, शेतमजूर कामगारांनी प्रयत्न करावे. या बैठकीस दुष्काळी तालुक्यातील डाळिंब, बोर आदी उत्पादीत फळबाग शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होता. उपस्थितांचे आभार कोंडिबा सिद यांनी मानले.