Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शरद पवार व सुशीलकुमारांचा पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल
सोलापूर, १ एप्रिल/प्रतिनिधी

 

माढा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचा उमेदवारी अर्ज माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी सूचक म्हणून दाखल केला. तसेच सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसचे नेते, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर आज पुन्हा त्यांच्या वतीने दुसरा अर्ज भरण्यात आला.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोलापूर लोकसभेसाठी उत्तम शिवदास जानकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. श्री. जानकर हे माळशिरस तालुक्यातील वेळापूरचे असून ते मोहिते-पाटील यांचे विरोधक समजले जातात. सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांची भूमिका समजली नाही. आतापर्यंत या मतदारसंघात अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या चार झाली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख यांच्यासह बुधवारी प्रदीप संपतराव भोसले व बलवीर दगडू बनसोडे (दोघे अपक्ष) यांनी अर्ज सादर केले. यापैकी बनसोडे हे खासदार रामदास आठवलेप्रणीत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी आठवले यांच्या कार्यपध्दतीवर टीका करीत बंडखोरी केली आहे.
उमेदवारी दाखल करताना त्यांच्यासमवेत रिपाइंचे प्रदेश संघटक सचिव भाग्यवान शिंदे, सांगोला तालुकाध्यक्ष रवी बनसोडे, उपाध्यक्ष आकाश बनसोडे, माळशिरस तालुकाध्यक्ष शामराव भोसले हे उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुन्हा दसरा अर्ज दाखल केला. या मतदारसंघात आतापर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या सहा एवढी झाली आहे.