Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वाजवा रे टाळ्या..

 

कोणत्याही सभेत टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला तर बोलणाऱ्या वक्तयास उत्साह (किंवा चेव) येतो. हमखास टाळ्या मिळवून देणारे वक्तव्य केले तरी समोरच्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत, तर बोलणाऱ्यांची आणि व्यासपीठावर असणाऱ्यांची पंचाईत होते, प्रचारामध्ये अस्वस्थता येते. शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर परिसरात एका प्रमुख उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रथम तालुका पातळीवरील वक्त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली, नंतर जिल्हा पातळीवरील वक्ते बोलू लागले. प्रत्येक वक्तयाने आपला पक्ष, पक्षाच्या नेत्याची असणारी उत्तुंग (?) प्रतिमा, पक्षाची ध्येयधोरणे, परिसरात झालेली विकासकामे आदींची टिमकी वाजवली. ‘आपल्या भागातून’ हजारो मतांचे अधिक्य देऊ, असेही त्यांनी ठणकावून सांगितले, परंतु रामा शिवा गोविंदा.., एक टाळी पडेल तर शपथ. मेळावा सुरू होऊन बराच वेळ झाला तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही, ही बाब पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या लक्षात आली. हजरजबाबी व हुशार म्हणून ख्याती असणाऱ्या या नेत्याने आपल्या भाषणात याबाबत थेट विचारणा केली. ‘‘अरे, एवढे साडेतीन तास झाले मेळावा सुरू होऊन, अनेकांची जोरदार भाषणेही झालीत, पण तुम्ही एकदाही टाळी वाजवली नाही. तुमच्या उत्साहाला काय झाले आहे तरी काय?. .’’ या जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या इंजेक्शनचा परिणाम झाला तो व्यासपीठावरच, कारण त्याचे भाषण सुरू असताना त्याच्या एका दमदार वाक्यास व्यासपीठावरील एका नेत्यानेच टाळी वाजवली. प्रेक्षक कार्यकर्त्यांनीही ती सूचना लगोलग ऐकली आणि त्यांनी त्यांनी टाळ्या वाजविल्या. त्यावरही त्या जिल्ह्य़ाध्यक्षांचे समाधान झाले नाही. त्यांनी भाषणातच टोला लगावला, ‘‘टाळ्या वाजवायला सांगू नका, टाळ्या अंत:करणापासून आल्या पाहिजेत.’’ यानंतर मात्र प्रेक्षकांचे अंत:करण जागे झाले असावे कारण, जिल्हाध्यक्षांनी तसे बजावल्यावर मात्र झालेल्या मंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी अधूनमधून टाळ्या वाजवून त्यांच्या भाषणास प्रतिसाद (जिल्हध्यक्षांच्या अपेक्षेप्रमाणे) देण्यात येऊ लागला.
अशी ही मुक्ताफळे..
ध्वनिवर्धक हातात आला म्हणजे.. मुक्ताफळे उधळायचीच, अशी अनेक राजकारण्यांना सवयच झालेली असते. आपण काय बोलतो.., त्याचे संदर्भ विषयाला धरून आहेत की नाहीत, याचे तारतम्य न ठेवता मंडळी बोलतच राहतात, बोलतच राहतात.. जुन्नर परिसरात नुकत्याच झालेल्या एका प्रचारमेळाव्यात याचा अनुभव आला. त्या तालुक्यातून गेल्या वेळी त्या पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराला केवळ २५६ मतांचे अधिक्य मिळाले होते. ‘‘आता मात्र पन्नास हजारांचे अधिक्य हवे,’’ असा खणखणीत (?) इशारा एका मंत्र्याने दिला. असे झाले नाही तर पदे काढून घेतली जातील, असा आपल्या पद्धतीने दमही त्यांनी भरला. आपला नेताच असे बोलू लागल्याने मग तालुका पातळीवरील नेत्यांनाही चांगलाच चेव चढला. तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याने चक्क ‘‘विरोधी पक्षाचे नामोनिशाणही निवडणुकीनंतर राहणार नाही,’’ अशी वल्गना केली. तेव्हा समोरून एक आवाज आला, ‘‘अहो, ही बाजार समितीची निवडणूक नाही, लोकसभेची आहे..’’ त्यामुळे तापलेले वातावरण एकदम खाली आले. सभेनंतर प्रेक्षकांची कुजबूज सुरू झाली.. ज्याला तालुक्यातील संस्थेवर निवडून जाता आले नाही, त्याने असे बोलावे का, अशा बोलण्यांचा मतदारांवर परिणाम किती पडणार?, पण त्याकडे लक्ष देतो कोण? निवडणूकज्वर आल्यावर असे होणार नाही तर कसे?