Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

म्युच्युअल फंड ज्वालामुखीच्या तोंडावर!
स्पर्धात्मकतेतून जडलेल्या दुष्प्रवृत्तींवर ‘यूटीआय’ची टीका
मुंबई, १ एप्रिल/ वृत्तसंस्था
म्युच्युअल फंड उद्योगाकडून अल्पमुदतीसाठी उभ्या केलेल्या निधीचा विनियोग हा बडय़ा उद्योगांना दीर्घ मुदतीच्या प्रकल्पांसाठी दिला जात असून, या अनिष्ट प्रघातातून येत्या काळात मोठा पेच निर्माण होऊ शकतो, असा इशारा यूटीआय म्युच्युअल फंडाचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी अलीकडे सुरू झालेल्या ‘निश्चित मुदतपूर्ती योजना’ अर्थात फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्सच्या धडाक्यावर कटाक्ष टाकताना दिला.

कसाबची वकिली करण्यावर अंजली वाघमारे ठाम
मुंबई, १ एप्रिल/ प्रतिनिधी

पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद अजमल अमीर कसाब याचा बचाव करण्यासाठी नेमण्यात आलेल्या वकील अ‍ॅड. अंजली रमेश वाघमारे यांनी कोणत्याही धमक्या किंवा दबावाला बळी न पडता न्यायालयाने नेमून दिलेले हे काम यापुढेही सुरु ठेवून पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला आहे. न्यायालयाने कसाबच्या वकील म्हणून केलेली नेमणूक अ‍ॅड. वाघमारे यांनी सोमवारी स्वीकारल्यानंतर त्याच दिवशी रात्री वरळी पोलीस वसाहतीमधील त्यांच्या घरावर शिवसैनिक आणि त्या वसाहतीमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी हल्ला, घोषणाबाजी व दगडफेक केली होती. त्यावेळी वाघमारे यांनी आपण कसाबचे वकीलपत्र सोडून देऊ, असे त्या संतप्त जमावाला लिहून दिले होते.

काँग्रेसला युतीत गुंतवून पवार चालले तिसऱ्या आघाडीच्या व्यासपीठावर
नवी दिल्ली, १ एप्रिल/खास प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि गोव्यात काँग्रेसला युती करून गुंतवून ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पावले आता तिसऱ्या आघाडीकडे वळली आहेत. येत्या शुक्रवारी भुवनेश्वर येथे होणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या जाहीर सभेनिमित्त माकपचे सरचिटणीस प्रकाश करात, तेलगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक या काँग्रेस विरोधकांसोबत व्यासपीठावर येण्याचे पवार यांनी ठरविले आहे. काँग्रेससोबत महाराष्ट्रात जागावाटपाचा समझोता होईपर्यंत पंतप्रधानपदाच्या मुद्यावर माघार घेणारे पवार आता ऐन निवडणूक प्रचारादरम्यान आक्रमक झाले आहेत.

शिवराज, विलासराव वादात जयंतराव आवळेंचा फायदा!
पालघरमध्ये पुन्हा दामू शिंगडा
मुंबई, १ एप्रिल / खास प्रतिनिधी
लातूरच्या उमेदवारीवरून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांतील वादाचा फायदा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष जयंतराव आवळे यांना झाला असून त्यांच्या गळ्यात लातूरच्या उमेदवारीची माळ पडली आहे. विलासरावांच्या आग्रहामुळे आवळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी विलासरावांवर येऊन पडली आहे. तर पालघरमध्ये विरोध होऊनही काँग्रेसने पुन्हा दामू शिंगडा यांनाच उमेदवारी दिली आहे.

पाच मिनिटांचे उद्ध्वस्तपर्व!
राजकनिका, १ एप्रिल/पी.टी.आय.

अवघी पाच मिनिटे. एवढय़ा अवधीत सगळे उभ्याचे आडवे झाले. विश्वास बसणार नाही, अशा वेगाने हे सगळे घडले. आणि विशेष म्हणजे अवघ्या २०० मीटर रुंद आणि सुमारे ३ कि.मी. लांब एवढय़ाच भागात हा तडाखा देऊन ही ‘अस्मानी’ आली तशी निघूनही गेली. मात्र जाताना १० जणांना आपल्यासोबत घेऊन गेली. ओरिसातील केंद्रपारा जिल्ह्णााला वादळांचा तडाखा फार काही अनोखा नाही. पण काल घडलेला प्रकार विचित्रच होता. विलक्षण वेगाने झंझावात या गावात शिरला. एक नरसाळ्याच्या आकाराचा काळाकभिन्न ढग रोंरावत गावाच्या दिशेने आला. काही क्षणांत सर्वत्र अंधारून आले.

मारुती-८०० आणि ओम्नी लवकरच पडद्याआड
नवी दिल्ली, १ एप्रिल/ पीटीआय

भारतातील रस्त्यावर पंचवीस वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारी ‘मारुती-८००’ ही सामान्यांची मोटार आता लवकरच पडद्याआड जाणार आहे. १९८३ मध्ये प्रथम बाजारात आलेल्या या मोटारीची लोकप्रियता आजदेखील कमी झालेली नसली तरी नव्या मोटारींच्या आगमनामुळे या मोटारींच्या विक्रीवर विपरीत परिणाम होत आहे. पर्यावरण आणि प्रदूषणासंबंधीच्या ‘भारत स्टेज चार’ या निकषांची अंमलबजावणी सन २०१० पासून देशातील ११ शहरात होणार आहे. ‘भारत स्टेज चार’चे निकष ‘मारुती-८००’ आणि ‘ओम्नी’ ही वाहने पूर्ण करीत नसल्याने या दोन वाहनांची विक्री या शहरातून पुढील वर्षी पासून थांबविण्यात येणार असल्याचे मारुती-सुझुकीचे अध्यक्ष आर.सी.भार्गवा यांनी आज सांगितले. १९८३ मध्ये प्रथम बाजारात आलेल्या ‘मारुती-८००’ या मोटारींची आजपर्यंतची विक्री २७ लाखांहून अधिक झाली आहे. टाटा नॅनोच्या आगमनामुळे सर्वसामान्य ग्राहक या नव्या मोटारीकडे आकर्षित होत असल्याचे दिसून आले आहे. टाटा नॅनोची प्रारंभिक किमत १.२३ लाख असून ‘मारुती-८००’ ची दिल्लीतील प्रारंभिक कि मत (एक्स-शोरूम) १.९३ लाख रुपये आहे. यामुळे किमतीचा विचार करता नॅनो सामान्य ग्राहकाच्या आवाक्यात आहे. फेब्रुवारी २००९ या महिन्यात ‘मारुती-८००’ च्या विक्रीत सुमारे २९ टक्के घट झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या तणावमुक्तीसाठी बोर्डाचा २१ कलमी कार्यक्रम
शुभदा चौकर
मुंबई, १ एप्रिल

दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने त्या परीक्षांचे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणारे दुष्परिणाम कसे दूर करता येतील, याचाही अभ्यास कसून सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या तणावमुक्तीसाठी २१ कलमी कार्यक्रम आखण्यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल आज त्यांनी उचलले आहे. बोर्डाच्या मुंबई विभागाने आज बोर्डाचे सदस्य तसेच काही तज्ज्ञांची सभा बोलावून या कार्यक्रमाच्या तपशीलाबाबत चर्चा केली. दहावी व बारावीच्या परीक्षांचा अवाजवी बाऊ करण्याच्या पालक व शिक्षकांच्या मनोवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड ताणतणावाला सामोरे जावे लागते. या वर्षांत पालकांनी पाल्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे, कोचिंग क्लासेसच्या चक्रात मुलांना अडकवून त्यांची दहावी-बारावीची वर्षे अभ्यासाच्या धगीने करपवून टाकणे, दहावीत शाळेचा निकाल उंचावावा म्हणून नववीतच अनेकांना नापास करणे, दहावीच्या विद्यार्थ्यांंना शाळेतील मजेच्या उपक्रमांत सहभागी न होऊ देणे- या प्रवृत्ती कमी करण्यासाठी मुंबई मंडळाने ठोस कार्यक्रम आखण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने आजच्या मंडळाच्या सभेत सदस्यांबरोबरच काही तज्ज्ञांचीही मते अजमावण्यात आली. मध्यंतरी भावी देसाई या दहावीच्या विद्यार्थीनीने केलेल्या आत्महत्येच्या घटनेतून धडा घेऊन कॉपी करताना पकडले गेलेल्या मुलांवर कारवाई करताना मानवतावादी दृष्टिकोन कसा रुजवता येईल, याचीही चर्चा या सभेत झाली.

द्रुतगती महामार्गावर गॅसचा टँकर उलटल्याने पाच तास वाहतूक ठप्प
लोणावळा, १ एप्रिल/ वार्ताहर

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने खोपोलीकडून पुण्याकडे जाणाऱ्या इंडेन कंपनीचा गॅस टँकर मुंबईकडे जाणाऱ्या क्वॉलिस गाडीवर धडकून उलटला. टँकरमधील गॅसची किरकोळ गळती सुरु झाल्याने सुरक्षिततेकरिता सकाळी साडेसात ते साडेबारा असा तब्बल पाच तास द्रुतगती मार्ग दुतर्फा बंद ठेवण्यात आला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूक उर्से टोलनाका व सोमाटणे फाटा येथून तर पुण्याकडे जाणारी वाहने खंडाळा व वळवण टोलनाका येथून पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली होती. पाच तासानंतर गॅसची गळती बंद केल्याने दुपारनंतर पुण्याकडील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. तर मुंबई मार्गावर टँकर आडवा झाला असल्याने ती लेन सायंकाळपर्यंत बंदच होती. पुण्याकडे द्रुतगती महामार्गाने जाणारी वाहने ही वळवण टोलनाक्यावर राष्ट्रीय महामार्गावर वळविल्याने लोणावळ्यात वाहतूक सुरळीत होती. मात्र कार्ला येथील आई एकवीरेची मुख्य यात्रा आजपासून सुरू झाल्याने येणाऱ्या यात्रेकरूंसह दोन्ही मार्गावरील वाहतुकीचा ताण वरसोली टोलनाक्यावर पडल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यात टोलनाक्यावर दुरुस्ती कामे सुरू असल्याने दोन्ही बाजूकडील एक-एक लेन बंद असल्याने त्यांचा त्रास वाहन चालकांना सोसावा लागला. तर द्रुतगती मार्गावर टोल भरला असताना पुन्हा टोल करिता राष्ट्रीय महामार्गावर आडवाआडव होत असल्याने काही वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.

राज्यातील १३ हजार गावांमध्ये पाणी, चाराटंचाई; प्रशासनाकडून दुर्लक्ष
मुंबई, १ एप्रिल/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमधील सुमारे १०७ तालुक्यांमधील १३ हजार गावांमध्ये भीषण पाणी व चारा टंचाई निर्माण झाली असून राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने स्थानिक प्रशासन पाण्याचे टँकर्स, चारा डेपो यासारख्या मागण्या पूर्ण करीत नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पत्र लिहून त्यांनी या भीषण परिस्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. भांडारी म्हणाले की, पावसाळ्यात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासूनच विदर्भ, मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रात तीव्र पाणी व चारा टंचाई जाणवू लागली आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आहे. पाणी टंचाई व चारा टंचाई हे विषय आचारसंहितेच्या बंधनात येत नाहीत, असे स्पष्टीकरण टी. एन. शेषन यांच्या काळात करण्यात आले आहे. असे असतानाही अनेक जिल्ह्यांत स्थानिक प्रशासन पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविण्याची मागणी पूर्ण करीत नाहीत. राज्यातील निवडणूक प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत पाणी व चारा याची मागणी मान्य केली नाही तर परिस्थिती अधिक भीषण बनेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी