Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

‘हे लबाडाघरचे आवतन’
परभणी, १ एप्रिल/वार्ताहर

जोवर शेतकऱ्यांच्या हाती पैसा येणार नाही, तोवर शेतकरी ताठ मानेन उभा राहणार नाही. शेतकऱ्यांचे दारिद्य्र दूर करण्यासाठीच आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला. आता शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे लोक सात-बारा कोरा करण्याची भाषा करीत असले तरीही त्यांना त्याचा नेमका अर्थ समजला नाही. त्यांना शेतकऱ्यांच्या नावासकट सात-बारा कोरा करायचा की काय हेच समजत नाही, असा सवाल उपस्थित करून विरोधकांचे हे आश्वासन म्हणजे ‘लबाडाघरचे आवतन’ असल्याची टीका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आड केली.

खैरे यांचे शक्तिप्रदर्शन
औरंगाबाद, १ एप्रिल/प्रतिनिधी

ठरविलेल्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर सादर केल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. क्रांती चौकातून विराट मिरवणूक काढण्यात आली. यात शिवसेना आणि भा. ज. प.चे स्थानिक नेते आणि जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्री. खैरे यांनी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी एक वाजता क्रांती चौकातून युतीची मिरवणूक निघाली.

जालन्याची निवडणूक चुरशीने होण्याची चिन्हे
जालना, १ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या जालना मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांची उमेदवारी निश्चित होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींचाही मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

आवळे यांच्या उमेदवारीमुळे नाराजी
लातूर, १ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीचा उमेदवार ठरविताना बराच घोळ घालून काँग्रेसने आज लातूरमधून माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जयवंत आवळे यांची उमेदवारी जाहीर केली. या घोषणेनंतर जिल्ह्य़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटला आहे. विलासराव देशमुख गटाने नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे यांच्या नावाचा आग्रह धरला गेला होता, तर चाकूरकर गटाने माजी खासदार अरविंद कांबळे यांचे नाव लावून धरले होते.

पाटील, गायकवाड यांचे अर्ज
उस्मानाबाद, १ एप्रिल/वार्ताहर

शक्तिप्रदर्शन टाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील, शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सुरू असणाऱ्या धुसफुशीच्या पाश्र्वभूमीवर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील उपस्थित होते. शिवसेनेच्या उमेदवारासमवेतही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेहोते. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासासाठी लोकसभेची निवडणूक लढवीत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

आरोग्य खात्याला जाग आली!
गंगाखेड, १ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील दत्तवाडीत शंभराहून अधिक रुग्ण डेंग्यूसदृश तापाने फणफणल्याचे वृत्त आज ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर आरोग्य खात्याला जाग आली. आजच सकाळी साडेअकरा वाजता प्रशासनाने नागरिकांना स्वच्छतेबाबत जागे करीत रुग्णांना सराकरी वाहनाने गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांच्या गटबाजीतून गावकऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच ही साथ फैलावल्याचे आज गावकऱ्यांनीच सांगितले.

अप-डाऊन खासदार!
* जालना येथे काम करणारे सरकारी अधिकारी मोठय़ा प्रमाणावर ‘अप-डाऊन’ करतात. रेल्वेच्या प्रवासात अशाच एका कर्मचाऱ्यास शेजारी बसलेल्याने प्रश्न केला की, लोकसभा निवडणुकीच्या काळातही तुमचे ‘अप-डाऊन’ कसे काय चालते? तो कर्मचारी काही बोलण्याच्या आत समोर बसलेला दुसरा प्रवासी म्हणाला, ‘‘कर्मचाऱ्याचे काय सांगता? जालना मतदारसंघात निवडून आलेले यापूर्वीचे अनेक खासदारही औरंगाबाद-जालना ‘अप-डाऊन’ करणारेच होते.

जालना बाजार समिती कार्यक्षेत्रात यंदा कापूस खरेदीचा उच्चांक
१० लाख ७२ हजार क्विंटल कापसाची आवक
लक्ष्मण राऊत
जालना, १ एप्रिल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात चालू वर्षी (२००८-०९) कापसाची विक्रमी खरेदी झाली आहे. कापूस खरेदीचा हा बाजार समितीच्या इतिहासातील उच्चांक आहे. या वर्षी नाफेड आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन सरकारी संस्थांच्या मार्फत जवळपास १० लाख ७२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. या कापसाची एकूण किंमत तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मागील वर्षी (२००७-०८) जालना बाजार समिती क्षेत्रात एकूण ६ लाख २२ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली होती.

अग्निशमन अधिकाऱ्यालाही जुंपले निवडणुकीच्या कामाला
आपत्कालीन परिस्थितीत ओढावल्यास काय?
औरंगाबाद, १ एप्रिल/प्रतिनिधी
वाढत्या उन्हाच्या झळांबरोबर आग लागण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. बुधवारीच शहर आणि परिसरात तीन ठिकाणी आग लागली होती. अशावेळी अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात येतात. इकडे असे चित्र असताना औरंगाबाद विभागीय आपत्कालीन केंद्राचे प्रमुख आणि पालिका अग्निशामक विभागाचे प्रमुख अधिकारी शिवाजी झनझन यांची नेमणूक मतदान केंद्र अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

पैसा झाला मोठा!
परवा एका वृत्तपत्रात बातमी आली. ती वाचून माझा माझ्यावरच विश्वास बसेना. खरंच वाटेना. घरातल्या सगळ्यांना बातमी वाचून दाखविली. पण त्याचं कुणालाच काही वाटलं नाही. बायको थोडीशी अस्वस्थ झाली. पण पोरांना त्याचं काहीच वाटलं नाही. उद्या-परवा होळीचा सण आलेला आहे. नंतर धूलिवंदन, रंगपंचमी त्या निमित्ताने बाजारात माल विक्रीसाठी येणार. त्यात होळीसाठी गोवऱ्या विक्रीला आल्या, यात नवल काय? पिचकाऱ्या, रंगाचे डबे, साखरेचे-खोबऱ्यांचे हारही आलेत की बाजारात. पोरं परस्परात बोलत होती. एकमेकांना सांगत होती. त्या बातमीचं कुणालाच काही वाटत नव्हतं.

ऊसलागवड प्रोत्साहन योजनेस शेतक ऱ्यांचा थंड प्रतिसाद
पाणीटंचाईबाबत शासन, शेतकरी उदासीन
मिलिंद विटेकर
सोनपेठ, १ एप्रिल

उसाच्या कमतरतेमुळे अडचणीमध्ये सापडलेल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसलागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी योजना जाहीर केल्या आहेत. मात्र जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला थंड प्रतिसाद मिळत आहे. सोनपेठ तालुका ऊस आणि कापूस या नगदी पिकांचे आगर म्हणून ओळखला जातो.

आडसकर गुरुला चितपट करतील - पवार
धारूर, १ एप्रिल/वार्ताहर

‘‘रमेश आडसकरांनी गुरुकडून सर्व डाव शिकून घेतल्यामुळे ते गुरुला चीत-पट केल्याशिवाय राहणार नाहीत,’’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील उमेदवार रमेश आडसकर (कोकाटे) यांच्या प्रचारार्थ श्री. पवार यांची आज तालुक्यातील तेलगाव सभा झाली. या वेळी माजी मंत्री सुंदरराव सोळंके, आमदार प्रकाश सोळंके व उषा दराडे, महेश तपासे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, अशोक पाटील, एकनाथ आव्हाड, सुदामती गव्हे, पंडित दौंड, बाजीराव जगताप, अशोक डक, राजेंद्र जगताप आदी सभेस उपस्थित होती.

उपमुख्यमंत्री असतानाच ‘त्यांनी’ सात-बारा कोरा का केला नाही?
शरद पवार यांची मुंडे यांच्यावर टीका
बीड, १ एप्रिल/वार्ताहर
भारतीय जनता पक्षाचे केंद्रात व राज्यात सरकार होते. तुम्ही उपमुख्यमंत्री होता. त्या वेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे धाडस का केले नाही? असा प्रश्न करून सरकारमध्ये असताना जिल्ह्य़ाचा विकास करण्याचे सुचले नाही ते पुढे काय विकास करणार? लबाडाच्या घरी लोक जेवायला जात नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांचा समाचार घेतला.

अवघड चाललेला (उमेदवारीचा) पेपर!
प्रदीप नणंदकर
लातूर, १ एप्रिल

लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस शिल्लक असूनही काँग्रेस व भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांना उमेदवार निवडीचा पेपर अवघड जातो आहे, असे दिसते. दीर्घ काळ प्रतीक्षा केल्यानंतर काँग्रेसने आज सायंकाळी प्रदेश कार्याध्यक्ष जयवंत आवळे यांचे नाव जाहीर केले. परीक्षेच्या काळात पेपर अवघड जाण्याची दोन प्रमुख कारणे सांगितली जातात. वर्षभर अतिअभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसही परीक्षेच्या काळात ताण येऊन पेपर अवघड जाण्याचा संभव असतो.

आमचा जाहीरनामा
विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न हवा

शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेचे साधन या तीन बाबी एखाद्या जिल्ह्य़ात किती प्रमाणात प्रत्यक्षात आल्या यावरून त्या जिल्ह्य़ाचा मानव विकास निर्देशांक निश्चित करण्यात येतो. या मानव विकास निर्देशांकाचा अहवाल राज्य सरकारने यापूर्वीच स्वीकारलेला आहे. या निर्देशांकात जालना जिल्हा मराठवाडय़ात शेवटच्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जे पंचवीस जिल्हे राज्याच्या सरासरी निर्देशांकापेक्षा खाली आहेत त्यामध्ये जालना जिल्ह्य़ाचा क्रमांकाचा विसावा आहे. जालना जिल्ह्य़ाचे मागासलेपण स्पष्ट करण्यासाठी हा अहवाल पुरेसा आहे.

नेत्रगाव मतदानावर बहिष्कार टाकणार
उदगीर, १ एप्रिल/वार्ताहर

उदगीर ते नेत्रगाव या रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन हा रस्ता तयार करावा अन्यथा लोकसभा मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन नेत्रगावच्या गावकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. उदगीरपासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर नेत्रगाव हे गाव आहे. गावातील लोकांना दैनंदिन व्यवहारासाठी व शालेय शिक्षणासाठी उदगीरशिवाय पर्याय नाही. परंतु नेत्रगावापासून उदगीरला येण्यासाठी रस्ता नाही.

वेताळवाडीत तापाची साथ सोयगाव,
१ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील वेताळवाडी गावात अचानक विषाणूजन्य तापाची साथ सुरू झाल्याने दोन दिवसांत ३० ते ३५ रुग्णांना याची लागण झाली आहे. तालुक्यात वेताळवाडी धरणाजवळ वसलेल्या वेताळवाडी गावाची लोकसंख्या ४०० ते ४५० आहे. बहुतांश मोलमजुरी करणारे मजूर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सर्दी-खोकल्यांचे रुग्ण दवाखान्यात येत होते. आता त्यात तापाच्या रुग्णांची संख्या जास्त होती. डॉक्टरांनी सांगितले की, वाढत्या उन्हामुळे, वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे हे आजार होतात.

पवार यांच्यावर कारवाई होणार
नांदेड, १ एप्रिल/वार्ताहर

कंधार पंचायत समितीचे वादग्रस्त प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी. एल. पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्य़ात चौथीच्या इंग्रजीची परीक्षा सोमवारी (दि. ३०) होती. प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिक्षण विभागाने सर्वच केंद्रांवरची परीक्षा रद्द केली.परंतु कंधार तालुक्यातल्या बाचोटी केंद्रावर मात्र परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना सोमवारी व आज अशी दोनदा एकच परीक्षा द्यावी लागली. अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका पवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ते दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता निलंबनाची कारवाई प्रास्तावित करण्यात आली. शिक्षण विभागाने ही कारवाई प्रास्तावित केली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रावण हर्डिकर एक-दोन दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

उगिले हॉस्पिटल संशोधन केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात
लातूर, १ एप्रिल/वार्ताहर

उगिले हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राचा सहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित एड्सबाधितांसाठीच्या मोफत रोगनिदान शिबिरात २२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात १८ पुरुष व ४ स्त्री रुग्णांचा समावेश होता. मोफत तपासणीनंतर एक्स-रे, इसीजी, रक्त, लघवी या तपासण्या नाममात्र शुल्कात करण्यात आल्या. या रोगनिदान शिबिरानंतर सायंकाळी वर्धापनदिनानिमित्त आयोजित वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवारांचा स्नेहमीलन मेळावा पार पडला. कर्मयोग मानव विकास प्रतिष्ठान व उगिले हॉस्पिटलच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त ‘इच्छाशक्ती एक संजीवनी’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पत्रकार शरद कारखानीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी. पंडितराव उगिले, डॉ. बी. एन. राचमाले, निवृत्ती करडे, डॉ. शिवाजीराव भिसे, डॉ. प्रदीप उगिले, डॉ. वंदना उगिले आदी उपस्थित होते.

अपघातातील दोघांचा मृत्यू
नांदेड, १ एप्रिल/वार्ताहर

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीपला झालेल्या अपघातात काल रात्री दोघांचा मृत्यू झाला. चांदू मरिबा गायकवाड (वय ५०) व खंडू गोविंद भोसले अशी त्यांची नावे आहेत. श्री. चव्हाण यांची काल मुखेड येथे जाहीर सभा होती. या सभेला तालुक्यातील गोजेगाव येथील १६ काँग्रेसचे कार्यकर्ते जीपने मुखेड येथे जात होते. कुंद्राळा कॅम्पजळ चालकाचा ताबा सुटल्याने जीप खड्डय़ात कोसळली व १६ जण जखमी झाले. प्रकृती गंभीर असलेल्या आठ जणांना नांदेडच्या गुरूगोविंदसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला मुखेड पोलिसांनी जीपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. काळे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आज बैठक
जालना, १ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या जालना मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्याकरिता जिल्हा काँग्रेस समितीची उद्या (गुरुवारी) बैठक आयोजित करण्यात आली आहे. शकुंतलादेवी मंगल कार्यालयात ही बैठक होईल. अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस संजय लाखे असतील. पक्षाचे जालना जिल्हा प्रभारी आमदार सुरेश देशमुख, उमेदवार डॉ. काळे, आमदार एम. एम. शेख, प्रदेश सचिव आर. आर. खडके, जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कुलवंत, जिल्ह्य़ातील सर्व माजी आमदार, आजी-माजी पदाधिकारी, जालना सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बळीराम शेजूळ आदी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू
उदगीर, १ एप्रिल/वार्ताहर

न्यायालयीन कोठडीत असलेल्या, परंतु फिट्सवर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तालुक्यातील तोंडार येथील गंगाधर किशनराव कोचेवाड (वय ४५) या आरोपीचा आज पहाटे चार वाजता मृत्यू झाला कोचेवाड याला २००७ मध्ये घरफोडी करताना पोलिसांनी पकडले होते. नंतर जामीन मिळाल्यापासून तो न्यायालयात हजर राहिला नाही. त्याच्या विरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट काढले. २६ मार्चला पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यास फिट्स येण्यास सुरुवात झाली. त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला लातूर येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान आज पहाटे चार वाजता त्याचा मृत्यू झाला.

क्रांती सेनेतर्फे अशोक विक्रम
लातूर, १ एप्रिल/वार्ताहर

क्रांती सेनेतर्फे लातूर मतदारसंघातून अशोक विक्रम यांची उमेदवारी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी आज जाहीर केली. श्री. जावळे म्हणाले की, आर्थिक निकषावर राखीव जागा द्याव्यात, दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा रद्द करावा, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादनाच्या आधारावर भाव मिळाला पाहिजे आदीप्रमुख मुद्दे क्रांती सेनेने लोकांसमोर नेण्याचे ठरवले आहे. राज्यात २७ जागांवर क्रांती सेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतील. धुळे येथे अनिल गोटे क्रांती सेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे घाटत असून उद्यापर्यंत त्यांची उमेदवारी जाहीर होणार असल्याचे ते म्हणाले. समाजात जातीयतेचे विष पेरणाऱ्या गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले व समीर भुजबळ यांना पराभूत करण्याचे धोरण क्रांती सेनेने जाहीर केले आहे. त्यानुसार त्या त्या मतदारसंघात कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे श्री. जावळे म्हणाले. या वेळी श्रीकांत सूर्यवंशी, भगवान माकणे, अशोक विक्रम उपस्थित होते.

आशियायी एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताला दोन कांस्यपदके
औरंगाबाद, १ एप्रिल/खास प्रतिनिधी
बँकॉक थायलंड येथे नुकत्याच झालेल्या आशियायी एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताने दोन कांस्य पदके पटकाविली. कनिष्ठ गटात एकेरीमध्ये तेजपाल कौर हिने तर तिहेरीमध्ये शर्वणी पेंडीलापल्ली, अमला संभावत आणि स्वाती रामटेकी यांनी सांघिक गटात कांस्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत भारतासह १० देशांचा सहभाग होता. भारताला सबज्युनियर आणि वरिष्ठ गटात चांगली कामगिरी नोंदविता आली नाही. मात्र कनिष्ठ गटात भारताने चांगली कामगिरी केली. तेजपाल कौर हिने १४.७० गुण घेत कांस्यपदक मिळविले. पुरुष एकेरीत औरंगाबादच्या विवेक देशपांडेचे कांस्यपदक हुकले. प्राथमिक फेरीत तो तिसऱ्या स्थानावर होता. अंतिम फेरीत दोन मोठय़ा चुका त्याने केल्यामुळे कांस्य पदक .३५ गुणांनी हुकले. तिहेरीमध्ये स्वाती रामटेकी, अमला संभावत आणि शर्वणी पेंडीलापल्ली या आंध्र प्रदेशच्या मुलींनी तिहेरीमध्ये १२.६२८ गुण मिळवून भारताच्याच क्रांती डोईबळे, मयुरा पेरे आणि प्राजक्ता भोसले (महाराष्ट्र) यांचा .०३८ गुणांनी पराभव करून कांस्य पदक प्राप्त केले. सुवर्ण आणि रौप्य पदक थायलंडच्या संघाने पटकाविले. या संघाबरोबर प्रमुख प्रशिक्षक म्हणून औरंगाबादचे मकरंद जोशी हे गेले होते.

औरंगाबादमध्ये ८ उमेदवारांचे अर्ज
औरंगाबाद, १ एप्रिल/प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत शिवसेना या एकमेव प्रमुख पक्षासह आठ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. यापैकी पाचजणांनी बुधवारी अर्ज भरले आहेत. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी आज चार अर्ज सादर केले. उर्वरित चारही उमेदवार अपक्ष आहेत. अशोक विठ्ठल बर्डे, उम्रानखान नसीरखान, सय्यद रऊफ सय्यद जमीर आणि मारुती परसराम मोरे यांनीही आज उमेदवारी अर्ज सादर केले. क्रांती सेनेचे प्रा. माणिक शिंदे, सलीम पटेल वाहेगावकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे शेख हारून मलिक यांनी सोमवार आणि मंगळवारी अर्ज भरले आहेत. काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष या पक्षांचे उमेदवार शेवटच्या दिवशी म्हणजेच ४ एप्रिलला अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. १ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्यात येईल, असे शांतिगिरी महाराज यांच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र ते गुरुवारी अर्ज भरणार असल्याचे आता सांगण्यात आले आहे.

गंगाखेड शिवसेना महिला मेळावा
गंगाखेड, १ एप्रिल/वार्ताहर
परभणीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अ‍ॅड. गणेश दुधगावकर यांच्या प्रचारार्थ काल (मंगळवारी) शहरात शिवसेना महिला आघाडीचा मेळावा जिल्हासंघटिका सखुबाई लटपटे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी श्रीमती लटपटे यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख भाऊसाहेब जामगे, शिक्षक सेना जिल्हा संघटक बाळासाहेब राखे, महिला तालुका संघटिका शोभा कासले, विद्या कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. जिल्हा संघटिका लटपटे यांनी तालुक्यातील महिलांनी शिवसेनेचे उमेदवार दुधगावकर यांच्या पाठीशी उभे राहत विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तालुका संपर्क कार्यालयात झालेल्या या मेळाव्यात महिलांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती.

हिंगोली जिल्ह्य़ात १७६९ मतदान केंद्रावर मतदान होणार
हिंगोली, १ एप्रिल/वार्ताहर
पंधराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड, किनवट, हदगाव, वसमत, कळमनुरी व हिंगोली या सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण १७६९ मतदान केंद्रावर १६ एप्रिलला मतदान होणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदान केंद्राची संख्या उमरखेड-३०५, किनवट-२९०, हदगाव-२७८, वसमत-२७३, कळमनुरी-३११ आणि हिंगोली-३१२ या प्रमाणे आहे.

कांताप्रसाद राठी यांना लातूर माहेश्वरी भूषण पुरस्कार
लातूर, १ एप्रिल/वार्ताहर

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कांताप्रसाद राठी यांना लातूर माहेश्वरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित माहेश्वरी स्नेहमिलन या कार्यक्रमात कांताप्रसाद राठी यांना सपत्नीक लातूर माहेश्वरी भूषण पुरस्कार देऊन माहेश्वरी सभेचे प्रदेशाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी व महेश सेवा सदनचे राष्ट्रीय अध्यक्ष रामकुमार भुतडा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कांताप्रसाद राठी यांनी सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अयोध्यादेवी राठी, डॉ. अनिल राठी, डॉ. हरिप्रसाद सोमाणी, गोवर्धनदास भंडारी व पदाधिकारी उपस्थित होते.

कर्जमाफीचा निर्णय शिवसेनेमुळेच - आमदार जाधव
परभणी, १ एप्रिल/वार्ताहर
कर्जाच्या वाढत्या बोजामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाढती संख्या लक्षात घेता कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही. हे लक्षात घेऊन शिवसेनेने ‘शिवसेनेचा नारा, सातबारा कोरा’ अभियान राबवीत शासनास कर्जमाफी करावयास भाग पाडले. केवळ शिवसेनेमुळेच कर्जमाफीचा निर्णय होऊ शकला असे मत आमदार संजय जाधव यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान व्यक्त केले.शिवसेना -भाजपा व मित्र पक्षांचे उमेदवार गणेशराव दुधगावकर यांच्या प्रचारार्थ आमदार जाधव यांनी आज परभणी विधानसभा मतदारसंघातील धर्मापुरी, जलालपूर, मांडवा, नांदापूर व टाकळी (कुं.) या गावांचा दौरा केला. या दौऱ्यात तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमलताई पांडे, अंजली पवार, सर्कलप्रमुख प्रभू जैस्वाल, रमेश शेळके आदी मान्यवरांचा सहभाग होता.परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गणेश दुधगावकर यांच्या प्रचारानिमित्त आमदार जाधव यांनी धर्मापुरी, जलालपूर, मांडवा, नांदापूर, टाकळी (कुं.) येथे गावकऱ्यांच्या बैठका घेऊन शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले.

गाव सोडून अल्पावधीत चपळगावकरांनी प्रगतीचा पायंडा पाडला- जयदत्त क्षीरसागर
बीड, १ एप्रिल/वार्ताहर
बीडचा भूमिपुत्र व्यंकटेश चपळगावकर यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने वृत्तपत्रसृष्टीला मोठा सर्वानाच धक्का बसला. पत्रकार भवनात आज सकाळी शहरातील पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अनेक पत्रकारांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, गाव सोडून अल्पवधीतच चांगली प्रगती करण्याचा पायंडा चपळगावकर यांनी पाडला. ज्येष्ठ पत्रकार दिलीप ख्रिस्ती यांनी व्यंकटेशच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सांगितले. तो केवळ पत्रकार नव्हे तर चांगला आर्टिस्ट होता. नव्याचा शोध हा त्याचा स्वभावगुण होता, असे ते म्हणाले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष मानुरकर म्हणाले की, चपळगावकर यांचे व्यक्तिमत्त्व हरहुन्नरी व प्रभावी होते. त्यामुळे प्रिंट मीडियातून इलेक्ट्रॉनिक माध्यमात जाऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली. महेश वाघमारे यांनी सांगितले, व्यंकटेशचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. सर्व स्तरातील माणसांबरोबर मैत्री करण्यात त्यांचा हातकंडा होता. जगदीश पिंगळे, लक्ष्मीकांत रुईकर, पोलीस निरीक्षक आव्हाळे, शेखरकुमार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

निषेधाची भित्तीपत्रके लावल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांसह इतरांवर गुन्हा
निलंगा, १ एप्रिल/वार्ताहर
लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘हद्दपारीचा तीव्र निषेध’ व एका घरापासून निलंगा मतदारसंघ वाचवा असे मजकूर छापलेले भित्तिपत्रक विनापरवाना शहरात विविध ठिकाणी लावल्याबद्दल राजकुमार धुमाळ या मनसे कार्यकर्त्यांसह इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना काल पहाटे शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या हद्दपारीचा तीव्र निषेध व एका घरापासून निलंगा मतदारसंघ वाचवा असा आक्षेपार्ह मजकूर छापलेले भित्तीपत्रक डकविल्याबद्दल निलंगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा आचारसंहिता कक्षप्रमुख एस. टी. चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भित्तीपत्रकाचे प्रकाशक मनसे कार्यकर्ता राजकुमार (भाऊ) धुमाळ यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

‘उमेदवारी अर्ज शुक्रवारी स्वीकारले जाणार नाहीत’
लातूर, १ एप्रिल/वार्ताहर
जिल्ह्य़ात ३ एप्रिलला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने लोकसभा निवडणुकीची नामनिर्देशनपत्रे त्या दिवशी स्वीकारण्यात येणार नाहीत, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी सांगितले. लातूर लोकसभा निवडणुकीसाठी २८ मार्चला अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या दिवसापासूनच नामनिर्देशनपत्र वितरण आणि नामनिर्देशन स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ४ एप्रिल ही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. तथापि ३ एप्रिलला रामनवमीनिमित्त राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निर्देशानुसार ३ एप्रिलला अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असेराज्य उपमुख्य निवडणूक अधिकारी व अप्पर सचिव अ. ना. वळवी यांनी कळविले आहे याचीही सर्वानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डवले यांनी केले आहे.

पोस्टाच्या अनागोंदीमुळे विद्यार्थी परिक्षेस मुकला!
बोरी, १ एप्रिल/वार्ताहर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सहाय्यक (विधी) अराजपत्रीय गट ब या पदाच्या परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र पोस्टाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल ७१ दिवसाने आज हातात पडल्याने बोरी येथील विजयकुमार प्रल्हादराव बेंबळगे या परीक्षेस मुकला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष अधिकाऱ्याने विजयकुमार बेंबळगे यांना सहाय्यक (विधी) अराजपत्रीय गट ब या पदाच्या परीक्षेसाठी (एयू०००८२) या बैठक क्रमांकाचे प्रवेश प्रमाणपत्र पाठवले. या प्रवेश प्रमाणपत्रावर मुंबईच्या स्टॉक एक्सचेंज सबडिव्हीजन पोस्टाचा शिक्का असून ते २२ जानेवारी २००९ ला डिस्पॅच केले होते. हे प्रवेशपत्र ७१ दिवसांनी आज प्राप्त झाले. मुंबई ते बोरी प्रवासासाठी १२ तास लागतात. परंतु या टपालास मात्र अख्खे ७१ दिवस लागले. त्यामुळे परीक्षार्थी परीक्षेस मुकले आहेत.

गहू , हरभरा काढणीला प्रारंभ
उदगीर, १ एप्रिल/वार्ताहर

रब्बी हंगामाचा शेवटचा टप्पा आला असून, रब्बीतील गहू, हरभरा या पिकांची रासणी करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. प्रतिवर्षांपेक्षा यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे यावर्षी रब्बीचा हंगाम बऱ्याच प्रमाणात कमी झाला. त्यातही गव्हाला पाण्याची जास्त आवश्यकता असते म्हणून हरभरा व सूर्यफूल या पिकांवरच बळीराजाने भर दिला. ग्रामीण भागात मजुरांची कमतरता लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी मळणी यंत्राद्वारेच रास करण्याचे काम आटोपून घेतले. पुरेशा पावसाअभावी धान्याचा उतार कमी येत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. उसाला पर्यायाने साखर व गुळाला चांगला भाव (दर) यावर्षी मिळाला म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली. पण ऊस जगवायचा कसा हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

लातूरमध्ये खळबळजनक राजकीय घटना घडतील- कोरे
लातूर, १ एप्रिल/वार्ताहर

परंपरागत राजकीय वाटचालीला लातूरमधील लोक कंटाळले आहेत.ा आगामी पंधरा दिवसांत धक्कादायक घटना लातूरकरांना पाहायला मिळतील, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री विनय कोरे यांनी केले. जनसुराज्य पक्षाचे लातूर लोकसभेचे उमेदवार तुकाराम गन्ने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विनय कोरे बुधवारी सकाळी लातूरमध्ये दाखल झाले. पत्रकारांशी बोलताना कोरे म्हणाले, जनसुराज्य पार्टीने राज्यात स्वत:च्या शक्तीवर नांदेड व लातूर या दोन जागा लढवायच्या ठरवल्या आहेत. दोन्ही ठिकाणी आमचा उमेदवार विजयी होईल, असे सांगताना कोरे यांनी या निवडणुकीतच विधानसभा निवडणुकीची तयारी आपण सुरू केली असल्याचे सांगितले. उदगीरचे माजी आमदार मनोहर पटवारी हे आमच्या पक्षात आजच प्रवेश करणार असून सायंकाळी एका बडय़ा नेत्याने चहासाठीचे आमंत्रण दिले आहे. या मतदारसंघात आपण पाच दिवस वेळ देणार असून अनेक धक्कादायक घटना लातूरमध्ये घडतील. विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या छुप्या युतीला येथील मतदार आता कंटाळला असून नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी लोक तयार आहेत. जनसुराज्य पक्ष हा योग्य पर्याय होऊ शकतो, हे आम्ही थेट मतदारांपर्यंत पोहोचवणार असल्याचे ते म्हणाले.

तुकाराम गन्ने यांचा उमेदवारी अर्ज दाखल
लातूर, १ एप्रिल/वार्ताहर

जनसुराज्य पक्षाचे उमेदवार तुकाराम गन्नो यांचा उमेदवारी अर्ज अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत बुधवारी (१ एप्रिल) दाखल करण्यात आला.तुकाराम गन्ने यांच्यासोबत ऊर्जामंत्री विनय कोरे, माजी आमदार मनोहर पटवारी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष माधवराव पाटील टाकळीकर, शिवदास लखादिवे उपस्थित होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ डवले यांच्याकडे गन्ने यांनी आपला अर्ज दाखल केला. जनसुराज्य पक्षातर्फे टाऊन हॉल येथील मैदानापासून शिवाजी चौक ते पाटील प्लाझा मंगल कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. पाटील प्लाझा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कोरे यांनी मार्गदर्शन केले.