Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कसाबची वकिली करण्यावर अंजली वाघमारे ठाम
मुंबई, १ एप्रिल/ प्रतिनिधी

 

पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद अजमल अमीर कसाब याचा बचाव करण्यासाठी नेमण्यात आलेल्या वकील अ‍ॅड. अंजली रमेश वाघमारे यांनी कोणत्याही धमक्या किंवा दबावाला बळी न पडता न्यायालयाने नेमून दिलेले हे काम यापुढेही सुरु ठेवून पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला आहे.
न्यायालयाने कसाबच्या वकील म्हणून केलेली नेमणूक अ‍ॅड. वाघमारे यांनी सोमवारी स्वीकारल्यानंतर त्याच दिवशी रात्री वरळी पोलीस वसाहतीमधील त्यांच्या घरावर शिवसैनिक आणि त्या वसाहतीमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी हल्ला, घोषणाबाजी व दगडफेक केली होती. त्यावेळी वाघमारे यांनी आपण कसाबचे वकीलपत्र सोडून देऊ, असे त्या संतप्त जमावाला लिहून दिले होते. झाला प्रकार लक्षात घेता कसाबच्या वकील म्हणून यापुढेही काम करण्यास आपण तयार आहात का, असे न्यायालयाने विचारल्यावर अ‍ॅड. वाघमारे यांनी यावर विचार करून निर्णय घेण्यासाठी एक दिवसाचा अवधी मागून घेतला होता.
आज अ‍ॅड. वाघमारे यांनी तीन कार्बाइनधारी पोलिसांच्या संरक्षणात न्यायालयात येऊन आपण आरोपीच्या वकील म्हणून काम सुरु ठेवण्यास तयार आहोत, असे सांगितले. न्यायाधीश ताहिलीयानी यांनी याची नोंद केली व झाल्या प्रकारानंतर वाघमारे यांना पुरेसे संरक्षण देण्यात आले आहे, असे नमूद केले.
सात वर्षांचा सश्रम कारावास ते फाशी अशी शिक्षा दिली जाऊ शकते, अशा गुन्ह्याचा आरोप असलेल्या आरोपीने स्वत:च्या बचावासाठी वकील न केल्यास त्यास सरकारतर्फे वकील देण्यासंबंधी उच्च न्यायालयाने ‘क्रिमिनल मॅन्युअल’मध्ये नियमावली तयार केलेली आहे. त्यानुसार न्यायाधीश ताहिलीयानी यांनी गेल्या सोमवारी विधि सेवा प्राधिकरणाच्या पॅनेलवर असलेल्या अ‍ॅड. वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नेमणूक केली होती. खटल्याचे पुढील कामकाज आधी ठरल्याप्रमाणे ऑर्थर रोड कारागृहाच्या आवारात तयार केलेल्या खास न्यायालयात येत्या ६ एप्रिल रोजी सुरु होईल, असे न्यायाधीश ताहिलीयानी यांनी सांगितले.
न्यायालयाच्या बाहेर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अ‍ॅड. वाघमारे म्हणाल्या की, कसाबच्या वकील म्हणून न्यायालयाने माझी नेमणूक केली आहे. ती जबाबदारी पार पाडणे न्यायासाठी आवश्यक आहे व हे काम देशाच्या विरोधातही नाही, अशी माझी भूमिका आहे. लोक माझी ही भूमिका समजावून घेतील अशी माझी अपेक्षा होती व म्हणूनच मी सुरुवातीस पोलीस संरक्षण नको, असे सांगितले होते. परंतु माझ्या घरावर जो हल्ला झाला त्याने मला धक्का बसला. त्यानंतर आता सरकारने मला स्वत:हून पोलीस संरक्षण दिले आहे.
अ‍ॅड. वाघमारे म्हणाल्या की, ज्यांनी माझ्या घरावर हल्ला केला त्यांच्या भावना मी समजू शकते. विशेषत: मी एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असूनही अनेक पोलिसांचा बळी घेणाऱ्या आरोपीचे मी वकीलपत्र घ्यावे याविषयी विशेषत: पोलीस वसाहतीमधील माझ्या बांधवांनी आक्षेप घेणे हेही मी समजू शकते. परंतु एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असले तरी मलाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे व मलाही व्यावसायिक स्वातंत्र्य आहे हे लक्षात घेऊन हे पोलीस कुटुंबीय माझी भूमिका समजावून घेतील याची मला खात्री आहे. माझ्या घरावरील हल्यासंदर्भात ज्यांना अटक केली गेली आहे त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी असे मला वाटते.

झेड सुरक्षा व्यवस्था!
कसाबच्या वकील अ‍ॅड. अंजली वाघमारे यांना झेड सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा निर्णय राज्याच्या गृहविभागाने घेतला आहे. झेड सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत वाघमारे यांना आठ सुरक्षा रक्षकांचे संरक्षण मिळणार आहे. त्यांच्या गाडीत दोन सुरक्षा रक्षक आणि मागे एस्कॉर्ट गाडीत चार सुरक्षा रक्षक असा ताफा त्यांच्यामसनेत असेल. वास्तविक वाघमारे यांची नियुक्ती घोषित झाली तेव्हाच पोलिसांनी तात्काळ त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची आवश्यकता होती. परंतु त्याबाबत ढिसाळपणा दाखविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अंतर्गत चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले.