Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शिवराज, विलासराव वादात जयंतराव आवळेंचा फायदा!
पालघरमध्ये पुन्हा दामू शिंगडा
मुंबई, १ एप्रिल / खास प्रतिनिधी

लातूरच्या उमेदवारीवरून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांतील वादाचा फायदा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष जयंतराव आवळे यांना झाला असून त्यांच्या गळ्यात लातूरच्या उमेदवारीची माळ पडली आहे. विलासरावांच्या आग्रहामुळे आवळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी विलासरावांवर येऊन पडली आहे. तर पालघरमध्ये विरोध होऊनही काँग्रेसने पुन्हा दामू शिंगडा यांनाच उमेदवारी दिली आहे.
लातूर (राखीव) मतदारसंघातून नगराध्यक्ष व्यंकट बेंद्रे यांना उमेदवारी देण्याचा विलासरावांचा प्रस्ताव होता. मात्र शिवराज पाटील यांचा बेंद्रे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता. काँग्रेसमधील स्थानिक नेतेमंडळींनीही बेंद्रे यांच्या नावाला विरोध केला. शिवराज पाटील यांनी उस्मानाबादचे माजी खासदार अरविंद कांबळे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. परिणामी लातूरच्या उमेदवारीचा वाद काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत गेला होता. शिवराज पाटील यांना शह देण्याकरिता विलासरावांनी कोल्हापूर जिल्ह्य़ातून विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जयंतराव आवळे यांचे नाव पुढे केले. जयंतराव आवळे हे विलासरावांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवराज पाटील यांना शह देण्याकरिता बाहेरचा उमेदवार आयात केला असला तरी त्यांना निवडून आणण्याची सारी जबाबदारी आता विलासरावांवर येऊन पडली आहे.
पालघर (राखीव) मतदारसंघातून खासदार दामू शिंगडा यांच्या उमेदवारीस काँग्रेसमध्येच तीव्र विरोध होता. काँग्रेसला ही जागा कायम राखायची असल्यास शिंगडा यांना उमेदवारी देऊ नये, असा मतप्रवाह पक्षात होता. शिंगडा यांच्याऐवजी राजेंद्र गावीत यांचे नाव चर्चेत होते. मात्र विद्यमान खासदाराला डावलायचे नाही, असा विचार झाला व शिंगडा यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली.
दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाल्याने राज्यातील सर्व २५ मतदारसंघांतील (शिर्डी - रामदास आठवले) काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत. पक्षाने बाळासाहेब विखे-पाटील, गोविंदा व बापू हरि चौरे हे तीन विद्यमान खासदार वगळता उर्वरित १० खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. यापैकी विखे-पाटील यांचा मतदारसंघ राखीव झाला तर चौरे यांचा मतदारसंघ खुला झाला आहे. गोविंदाने विरोध झाल्याने निवडणूक लढण्यास नकार दिला.