Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पाच मिनिटांचे उद्ध्वस्तपर्व!
राजकनिका, १ एप्रिल/पी.टी.आय.

 

अवघी पाच मिनिटे. एवढय़ा अवधीत सगळे उभ्याचे आडवे झाले. विश्वास बसणार नाही, अशा वेगाने हे सगळे घडले. आणि विशेष म्हणजे अवघ्या २०० मीटर रुंद आणि सुमारे ३ कि.मी. लांब एवढय़ाच भागात हा तडाखा देऊन ही ‘अस्मानी’ आली तशी निघूनही गेली. मात्र जाताना १० जणांना आपल्यासोबत घेऊन गेली.
ओरिसातील केंद्रपारा जिल्ह्णााला वादळांचा तडाखा फार काही अनोखा नाही. पण काल घडलेला प्रकार विचित्रच होता. विलक्षण वेगाने झंझावात या गावात शिरला. एक नरसाळ्याच्या आकाराचा काळाकभिन्न ढग रोंरावत गावाच्या दिशेने आला. काही क्षणांत सर्वत्र अंधारून आले. जोडीला तितक्याच अनपेक्षितपणे मुसळधार पाऊस आणि गारा पडू लागल्या. आणि.. हे थांबले तेव्हा २०० मीटर बाय ३ कि.मी.च्या पट्टय़ातील दृश्य शत्रूराष्ट्राने केलेल्या बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या गावाप्रमाणे होते. पक्क्या घरांची सिमेंट काँक्रिटची छपरे उचकटून इतस्तत: पडली होती. गवती झोपडय़ा अथवा कच्चे बांधकाम केलेल्या घरांची तर नामोनिशाणीही शिल्लक राहिली नव्हती. एवढेच काय शेत नांगरण्यासाठी वापरला जाणारा अवजड ट्रॅक्टरही काडेपेटीप्रमाणे भेलकांडत जमिनीवर आडवा झाला होता. वीज आणि टेलिफोनच्या खांबांचे तर काही सांगण्यासारखेही उरले नव्हते.
हा झंझावात ताशी तब्बल २०० कि.मी. वेगाने आला होता. या ३ कि.मी.च्या पट्टय़ातील ११ गावांना त्याचा तडाखा बसला आणि १० जणांचा बळी घेऊन तसेच सुमारे २५० जणांना जखमी करून तो शांत झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पट्टय़ापासून अवघ्या काही मीटर दूर असलेल्या घरांना थोडासुद्धा धक्का बसला नाही. या झंझावाताचा तडाखा बसलेल्या बाघाबुडा गावातील अशोक पांडा म्हणाला, मी माझ्या घराबाहेर उभा असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला.गावाच्या दिशेने एक ट्रॅक्टर येत होता. या झंझावातात तो सापडला आणि पाचोळ्याप्रमाणे तो सुमारे २० फूट उंच उचलला जाऊन खाली आपटला. त्याचा ड्रायव्हर जागीच ठार झाला. अशीच गत एका बैलगाडीचीही झाली. सुदैव म्हणजे एवढय़ा जवळ असूनही आमच्या घराला काहीही इजा झाली नाही.
अन्य एकाने तलावातील नाव हवेत उचलली गेल्याचे पाहिले. नावेतील सहापैकी तीनजण ठार झाले. तर तिघे जखमी झाले.