Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसला युतीत गुंतवून पवार चालले तिसऱ्या आघाडीच्या व्यासपीठावर
नवी दिल्ली, १ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

महाराष्ट्र आणि गोव्यात काँग्रेसला युती करून गुंतवून ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पावले आता तिसऱ्या आघाडीकडे वळली आहेत. येत्या शुक्रवारी भुवनेश्वर येथे होणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या जाहीर सभेनिमित्त माकपचे सरचिटणीस प्रकाश करात, तेलगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक या काँग्रेस विरोधकांसोबत व्यासपीठावर येण्याचे पवार यांनी ठरविले आहे.
काँग्रेससोबत महाराष्ट्रात जागावाटपाचा समझोता होईपर्यंत पंतप्रधानपदाच्या मुद्यावर माघार घेणारे पवार आता ऐन निवडणूक प्रचारादरम्यान आक्रमक झाले आहेत. पवार यांनी पंतप्रधानपदाच्या मुद्यावर तात्पुरती नरमाई दाखवली होती. पण काँग्रेसशी युती करूनही त्यांची पंतप्रधानपदावरील दावेदारी कायम आहे, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय पातळीवर युतीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ओरिसा आणि आंध्र प्रदेशात तिसऱ्या आघाडीतील पक्षांशी युती केली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत युपीएमध्ये राहूनही पवार यांनी आता उघडपणे काँग्रेसविरोधात आंध्र प्रदेश आणि ओरिसात तिसऱ्या आघाडीला मदत करण्याचे ठरविले आहे. या घडामोडीमुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पंतप्रधानपदासाठी तिसऱ्या आघाडीकडून दावा करणे शक्य व्हावे म्हणून पवार करात, चंद्राबाबू आणि पटनायक यांच्या व्यासपीठावर पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले.
निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी आवश्यक निकष जेमतेम पूर्ण करून त्याच्या जोरावर काँग्रेसशी राष्ट्रीय पातळीवर आघाडीसाठी वाटाघाटी करणाऱ्या पक्षांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी खिल्ली उडविली होती. राष्ट्रीय पातळीवर युतीचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर पवार यांना काँग्रेसने आयपीएलच्या मुद्यावरही चांगलेच अडकविले आणि शेवटी यंदाची आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत हलविणे भाग पडले. त्यानंतर महाराष्ट्रात जागावाटपाची चर्चा रखडवून काँग्रेसने राष्ट्रवादीला घायकुतीला आणले होते. पवार यांनी पंतप्रधानपदाचा मुद्दा म्यान करावा, अशी अट काँग्रेसकडून घालण्यात आली होती. या सर्वांचे उट्टे काढण्यासाठी आता पवार काँग्रेसला जेरीस आणण्याचे प्रयत्न करतील, असे म्हटले जात आहे. राज्यातील ४८ पैकी पहिल्या टप्प्यातील १३ जागांचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ३१ मार्चला संपताच पवार यांनी काँग्रेसविरोधातील हालचालींना वेग दिला आहे. काँग्रेसची हेतूपुरस्सर कोंडी करण्यासाठी पवार अशा क्लृप्त्या करीत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वर्तुळात उमटत आहे.