Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

तंबी दुराई, वेद राही यांना प्रियदर्शिनी पुरस्कार प्रदान
मुंबई, १ एप्रिल/प्रतिनिधी

प्रियदर्शनी अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्काराचे वितरण मंगळवारी इंडियन चेंबर र्मचटस्च्या वालचंद हिराचंद सभागृहात करण्यात आले. मराठीतील सवरेत्कृष्ट साहित्याचा २००९ चा पुरस्कार ‘लोकसत्ता’चे स्तंभलेखक व पत्रकार तंबी दुराई यांना तर हिंदी व सिंधीचा पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ लेखक वेद राही व ठाकूर चावला यांना देण्यात आला.
प्रियदर्शनी अकादमीच्या पुरस्काराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मराठी, हिंदी व सिंधी साहित्यातील सवरेत्कृष्ट निर्मितीचा अकादमीतर्फे दरवर्षी गौरव करण्यात येतो. मराठी साहित्य पुरस्कार निवड समितीवर असलेल्या रामदास फुटाणे आणि दिनकर गांगल यांनी तंबी दुराई यांच्या ‘दोन फुल एक हाफ’ या पुस्तकाची निवड पुरस्कारासाठी केली. लोकसत्ताच्या ‘लोकरंग’ पुरवणीत गेली दहा वर्षे हे सदर सुरू असून त्यातील निवडक सदरांचे या पुस्तकात संकलन आहे. स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हिंदी निवड समितीचे अध्यक्ष म्हणून विश्वनाथ सचदेव यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाला नगरपाल इंदू सहानी, ब्लू क्रॉस लॅबोरेटरीजचे व्यवस्थापकीय संचालक निश्चल इसरानी, फायनान्शियल टेक्नोलॉजी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश शाह आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला प्रियदर्शनी अ‍ॅकॅडेमीचे अध्यक्ष नानीक रुपानी यांनी प्रास्ताविक केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना इंदु सहानी यांनी सामाजिक जाणिवांवर भर देताना संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा जीवनसंघर्ष थोडक्यात सांगितला. मुंबईला जयहिंद महाविद्यालयात शिकताना अक्षरश: दिव्याखाली बसून ते अभ्यास करायचे. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे नव्हता. मात्र टाटाची शैक्षणिक शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि उच्च शिक्षणासाठी विदेशात माशेलकर रवाना झाले. खडतर परिस्थितीत शिक्षण घेतलेले ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा संशोधक बनले. योग्य, गरजू व्यक्तीला शिष्यवृत्ती मिळाली तर त्याचा फायदा तो समाजासाठी करू शकतो, असे सहानी यांनी सांगितले.
देशातील निम्मी लोकसंख्या २५ वर्षे वयोगटाच्या आतील आहे. हेच आता पुढील नेते आहेत. महिलांवरील अत्याचाराबाबत सुरू केलेल्या हेल्पलाईनवर वर्षभरात सात हजारपेक्षा जास्त कॉल येतात, यावरून महिलांना मानसिक, आर्थिक सहकार्य देणाऱ्या संस्थांची किती गरज आहे हे लक्षात येते. आपल्या शिक्षणाचा वापर करून पैसे कमावण्याबरोबर त्याचा वापर सामाजिक कार्यासाठीदेखील केला जावा, असे सहानी यांनी सुचविले. प्रियदर्शनी युथ विंगचे यावेळी सहानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच १०० गरजू विद्यार्थ्यांना ह्यावेळी प्रत्येकी १० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरणही करण्यात आले.