Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

खंडणीखोर नगरसेवकाला ‘मोक्का’
मुंबई, १ एप्रिल / प्रतिनिधी

 

घराची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीकडून १३ लाख रुपयांची खंडणी उकळणारे शिवसेना नगरसेवक विजय वाशिर्डे याच्यासह सात जणांवर आज ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली. दोन आठवडय़ांपूर्वी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पांडवपुत्र टोळीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या वाशिर्डे आणि त्याच्या सहा साथीदारांना अटक केली होती.
विभाग क्रमांक २१७चा नगरसेवक विजय वाशिर्डे (६०) याच्यासह मुकेश सोंडगर (३२), झकीर शेख (३२), निसार शेख (४३), तरबेज मकबूल (२८), लक्ष्मण किरण (२७) आणि सिद्धार्थ मयेकर उर्फ सिद्धू अशा सातजणांना पोलिसांनी अटक केली होती.
वाशिर्डेसह सर्व आरोपींना आज ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त राकेश मारिया यांनी दिली. गिरगाव परिसरातील सहावा कुंभारवाडा लेनमधील एक खोली २५ लाख रुपयांना विकली गेली. त्याची माहिती कळताच वाशिर्डे आणि त्याच्या साथीदारांनी घर विक्रेत्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून १३ लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. घरविक्रेत्याने सुरूवातीला नकार दिल्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकीही पांडवपुत्र टोळीचा सध्याचा म्होरक्या असलेल्या सिद्धार्थ मयेकर याने दिली होती. त्यानंतर काळबादेवी येथील एका हॉटेलमध्ये वाशिर्डेच्या उपस्थितीत मयेकरने फिर्यादीकडून खंडणीची १३ लाख रुपयांची रक्कम स्वीकारली. त्या वेळी पोलिसांनी सापला रचून वाशिर्डे आणि अन्य सहाजणांना अटक केली होती.