Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

शिधापत्रिकेप्रकरणी राज यांच्या आक्षेपाची दखल
मुंबई, १ एप्रिल/ खास प्रतिनिधी

 

शिधापत्रिका हा मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक विभागाकडे केलेल्या मागणीची दखल निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी घेतली असून दोन दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
शिधापत्रिके चा वापर पुरावा म्हणून करता येणार नाही, असे शिधापत्रिकेवर नमूद केले असतानाही प्रत्येक निवडणुकीत ओळखपत्र म्हणून शिधापत्रिकेचा वापर होत असतो. त्याचप्रमाणे शिधापत्रिकेच्या माध्यमातून मतदार यादीतही नाव नोंदविण्यात येत असून यापुढे शिधापत्रिका हे ओळखपत्र म्हणून मतदानाच्यावेळी मान्य करू नये तसेच छायांकित ओखळपत्र असल्याशिवाय मतदानास परवानगी देऊ नये, अशी मागणी अलीकडेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे केली होती.
एकटय़ा उत्तर मुंबईत ४९ हजार उत्तर भारतीय व बिहारींची नावे दुबार असल्याचे मतदार यांद्याच सादर करून राज यांनी यावेळी दाखवून दिले होते. आज निवडणूक आयुक्त कुरेशी यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी शिधापत्रिका हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरणे अयोग्य असल्याचे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगितले. तसेच याबाबत दोन दिवसात अहवाल मागवून निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. राज यांच्या भूमिकेचा हा विजय असून यामुळे निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या बोगस मतदानाला आळा बसेल असा विश्वास मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केला.