Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

निवडणूक आयुक्तांनी वरुणच्या मुद्दय़ावरून भाजपला पुन्हा फटकारले
मुंबई, १ एप्रिल/प्रतिनिधी

 

आम्हाला निवडणूक आयोगाच्या सल्ल्याची गरज नाही, या वरुण गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी तीव्र आक्षेप घेत भाजपला फटकारले. आम्ही कुणालाही फुकटचा सल्ला देत नाही. वरुणचे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. मात्र या प्रकरणात वरुणला उमेदवारी देणे म्हणजे त्याच्या म्हणण्याचे समर्थन केले, असा अर्थ त्यातून काढला जाऊ शकतो, असे एका प्रश्नाला उत्तर देताना कुरेशी यांनी सांगितले. राज्यातील निवडणूक यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आज निवडणूक आयुक्त कुरेशी आले होते. त्यांनी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेतल्या. यंत्रणेबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यातील नव्या मतदारांची नोंदणी पाहता त्यात तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच छायांकित ओळखपत्र देण्याचे राज्यातील काम समाधानकारक नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत केरळ, हरियाणा, पाँडेचरी या राज्यांनी १०० टक्के काम केल्याचे ते म्हणाला. ओळखपत्रांसाठी चालणाऱ्या पूर्वीच्या १३ कागदपत्रांमध्ये आणखी दोन कागदपत्रांची भर टाकण्यात आली असून आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेचे ओळखपत्र व आरोग्य विमा योजनेचे ओळखपत्रही निवडणुकीसाठी ओळखपत्र म्हणून चालू शकणार आहे. नक्षलवादी विभागांमध्ये मतदानाचा कालावधी सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंतच ठेवण्यात आला आहे. उशिरा मतदान घेतल्यास निवडणूक कर्मचाऱ्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये गडचिरोली व भंडारा हे दोन जिल्हे नक्षलवादप्रवण असल्याचे आयोगाने ठरविले आहे. ज्या उमेदवारांना गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे, त्यांच्या संपूर्ण प्रचाराचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असल्याचेही आयुक्त कुरेशी यांनी सांगितले. बोगस मतदान किंवा अन्य गैरप्रकारांना बळी पडू शकतील अशा मतदानकेंद्रांचा आढावा घेण्यात येणार असून, असे काही प्रकार घडल्यास पुन्हा समाधान होईपर्यंत मतदान घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक मतदान केंद्राला विशेष संपर्क यंत्रणा पुरविण्यात येणार असून गरज असेल तेथे सॅटेलाईट फोनचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यातून दोन हेलिकॉप्टर्स व काही मोटारबोटींची मागणी करण्यात आली असून त्याची पूर्तता केली जाईल. राज्यात आजवर आचारसंहिता भंगाची १५७ प्रकरणे नोंदवून ती निकाली काढण्यात आली आहेत. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या आचारसंहिता भंगाचा पूर्ण अहवाल मिळालेला नसून त्यांच्यावर एफआयआर नोंदविण्यात आला असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.