Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

वरुण गांधी यांच्या खुनाची सुपारी घेणारा गुंड रशीद मलबारीला कर्नाटकमध्ये अटक
मुंबई, १ एप्रिल / प्रतिनिधी

 

भाजपचे पिलीभीत येथील उमेदवार वरूण गांधी यांच्या हत्येची सुपारी घेतलेला छोटा शकील टोळीचा शार्प शूटर रशीद मलबारी याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. मलबारीवर मुंबईत खुनाचे तीन गुन्हे दाखल असून त्या प्रकरणांमध्ये त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक कर्नाटकला जाणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
छोटा शकीलच्या इशाऱ्यावरून मुंबईत १९९६-९८ या काळात आपली दहशत निर्माण केलेल्या मलबारीवर खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि खुनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी सध्या तुरूंगात असलेले भाजपचे पिलीभीत येथील उमेदवार वरूण गांधी यांच्या हत्येची सुपारी छोटा शकीलने मलबारीला दिली होती.वरुण गांधी यांच्या हत्येचीच योजना आखण्याच्या प्रयत्नात असलेल्या मलबारीला कर्नाटकमधून पोलिसांनी अटक केली. मलबारीच्या अटकेचे वृत्त समजताच मुंबई पोलिसांनीही त्याला ताब्यात देण्याची विनंती कर्नाटक पोलिसांना केली होती.त्यानुसार लवकरच मुंबई पोलिसांचे एक पथक त्याला अटक करण्यासाठी कर्नाटकला रवाना होणार आहे असेही सहपोलीस आयुक्त मारिया यांनी सांगितले. छोटा शकील टोळीचा शार्प शूटर रशीद मलबारीवर शिवाजीनगर, वांद्रे आणि टिळकनगर पोलिसांत खुनाचे गुन्हे दाखल आहेत.