Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘सायलेन्स झोन’ मधील मैदाने सभांसाठी देण्याची भाजपची मागणी
मुंबई, १ एप्रिल / प्रतिनिधी

 

निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्याबाबत आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली असल्याने मुंबई शहरातील मैदानांची संख्या अपुरी पडत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता शहरातील ‘सायलेन्स झोन’मध्ये येणाऱ्या मैदानांवर सुट्टय़ांच्या दिवशी सभा घेण्याची सशुल्क अनुमती द्यावी, अशी मागणी निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
राज्यातील निवडणूक कामाबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबई भेटीवर आलेले निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची आज मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. पोलिंग एजण्टची नावे त्याच बुथमधील असावीत, असा नियम आहे. त्याऐवजी पोलिंग एजण्ट त्या मतदारसंघातील नेमण्यास अनुमती द्यावी, अशी मागणीही मुंबई भाजपने निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईत निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांना मैदाने उपलब्ध होत नाहीत. त्यातच पालिकेच्या आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ‘सायलेन्स झोन’मध्ये येणाऱ्या मैदानांवर राजकीय पक्षांना निवडणूक सभा घेण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांची अडचण होत आहे. अशा ‘सायलेन्स झोन’अंतर्गत येणाऱ्या मैदानांवर विशेषत: शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात असणाऱ्या मैदानांवर सुट्टय़ांच्या दिवशी निवडणूक सभा घेण्यास सशुल्क परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या सूचनांचा योग्य तो विचार करण्यात यावा अशी विनंती करून भाजप पदाधिकाऱ्यांनी मानखुर्द विधानसभा मतदार याद्यांमध्ये बांगलादेशींची नावे आढळून आली असल्याने त्याबाबत ‘एफआयआर’ दाखल झाल्याची माहिती कुरेशी यांना दिली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.