Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
प्रादेशिक

तंबी दुराई, वेद राही यांना प्रियदर्शिनी पुरस्कार प्रदान
मुंबई, १ एप्रिल/प्रतिनिधी

प्रियदर्शनी अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्काराचे वितरण मंगळवारी इंडियन चेंबर र्मचटस्च्या वालचंद हिराचंद सभागृहात करण्यात आले. मराठीतील सवरेत्कृष्ट साहित्याचा २००९ चा पुरस्कार ‘लोकसत्ता’चे स्तंभलेखक व पत्रकार तंबी दुराई यांना तर हिंदी व सिंधीचा पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ लेखक वेद राही व ठाकूर चावला यांना देण्यात आला.

हिरानंदानी हॉस्पिटलची याचिका फेटाळली
मुंबई, १ एप्रिल/प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेने २.४० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यासाठी काढलेली नोटीसच मुळात बेकायदा असल्याने ती रद्द करावी यासाठी वाशी येथील हिरानंदानी हेल्थकेअर प्रा. लि. या कंपनीने केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज तडकाफडकी फेटाळली. गेल्या ऑगस्टपासून महापालिका या इस्पितळाकडे मालमत्ता कराची मागणी करीत आहे. एकूण देय करापैकी ७५ लाख रुपये त्यांनी आठवडाभरापूर्वी ठेव म्हणून जमा केले.

मीरा-भाईंदर भुयारी गटारी योजना
तक्रारीत मुख्यमंत्री लक्ष घालणार
मुंबई, १ एप्रिल / खास प्रतिनिधी
मिरा भाईंदर शहराच्या भुयारी गटार योजना प्रकल्पाची निविदा बेकायदेशीररित्या मंजूर करण्यात आल्याने योजनेत सुमारे १९४ कोटींचा गैरव्यवहार होणार आहे, या भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार मधु चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्वरित कारवाई करू, असे स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयुक्तांनी वरुणच्या मुद्दय़ावरून भाजपला पुन्हा फटकारले
मुंबई, १ एप्रिल/प्रतिनिधी

आम्हाला निवडणूक आयोगाच्या सल्ल्याची गरज नाही, या वरुण गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी तीव्र आक्षेप घेत भाजपला फटकारले. आम्ही कुणालाही फुकटचा सल्ला देत नाही. वरुणचे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. मात्र या प्रकरणात वरुणला उमेदवारी देणे म्हणजे त्याच्या म्हणण्याचे समर्थन केले, असा अर्थ त्यातून काढला जाऊ शकतो, असे एका प्रश्नाला उत्तर देताना कुरेशी यांनी सांगितले. राज्यातील निवडणूक यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आज निवडणूक आयुक्त कुरेशी आले होते.

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक
मुंबई, १ एप्रिल / प्रतिनिधी

सहार रोड येथे आठवडय़ाभरापूर्वी एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दहाच्या अधिकाऱ्यांनी आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून आज माटुंगा परिसरातून अटक केली. विजय चौहान असे या हल्लेखोराचे नाव आहे. युनिव्हर्सल अ‍ॅव्हिएशनमध्ये ग्राफ्िंटग असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या प्रीती शेखर अन्शन (२२) हिच्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला होता. हल्ला करून फरारी झालेल्या विजयला पोलिसांनी माटुंगा येथील लेबर कॅम्प परिसरातून अटक केली. विजय आठवडाभरापासून माटुंगा येथील मित्राच्या घरी लपून होता. मोबाईल शॉप चालविणाऱ्या चौहानच्या दुकानात प्रीती सहा महिन्यांपूर्वी नोकरीला होती. पत्नीपासून विलग झालेल्या विजयचे सुरूवातीपासूनच प्रीतीवर प्रेम होते परंतु अनेकवेळा प्रेमासाठी गळ घालूनही तिने होकार न दिल्याने विजयने तिच्यावर प्राणघातक हल्ला करून तिला संपविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सहआयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

प्रदीप सावंत पुन्हा पोलीस सेवेत
मुंबई, १ एप्रिल / प्रतिनिधी

तेलगी घोटय़ाळ्यातून यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आलेले पोलीस उपायुक्त प्रदीप सावंत यांचे निलंबन सरकारने मागे घेतले असून त्यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेतले आहे. सावंत यांची २००६ मध्ये पुणे येथील विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. तेलगी घोटाळ्यात ‘ओमिशन-कमिशन’चा ठपका ठेवत २००४ साली विशेष पथकाने सावंत यांना अटक केली होती. मात्र या प्रकरणातून पुणे येथील विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती किरण बेदी यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. तत्पूर्वी सावंत यांना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने विशेष पथकाच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले होते.

सातरस्ता येथे रस्ता खचला!
मुंबई, १ एप्रिल / प्रतिनिधी

सातरस्ता, संत गाडगेबाबा चौकातील रस्ता आज अचानक खचून १०-१२ फूटांचा खड्डा पडला आहे. याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडल्याने ट्रक कलून तीनजणांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणी पालिकेची जुनी मल:निस्सारण वाहिनी असून ही जुनी वाहिनी गळत असल्याने माती वाहून जात आहे. त्यामुळे हा रस्ता खचत आहे, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. ट्रकखाली तीनजणांचा मृत्यू झाल्यानंतर पालिकेने चौकशी करून या वाहिनीची दुरुस्ती करण्याची घोषणा केली होती. मात्र पालिकेने काहीच हालचाल केली नसल्याचे आज स्पष्ट झाले. आज खड्डा पडल्याने काही वेळ घबराट पसरली होती. आता शहरातील जुन्या जलवाहिन्या आणि मल:निस्सारण वाहिन्यांची तपासणी करण्याची घोषणा पालिका प्रशासनाने केली आहे.

आ. आव्हाड यांना हायकोर्टाची नोटीस
मुंबई, १ एप्रिल/प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लोकमान्यनगरमधील एका बेकायदा इमारतीविरुद्ध ठाणे महापालिकेने सुरु केलेल्या कारवाईत हस्तक्षेप करून ती बंद पाडल्याबद्दल न्यायालयीन अवमानाची कारवाई करावी, अशी विनंती करणाऱ्या एका अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना नोटीस काढली. ठाणे जिल्ह्यातील बेकायदा बांधकामांसंदर्भात वसईची ह्युमन राईटस् असोसिएशन आणि हरित वसई संघटना यांनी केलेल्या जनहित याचिका प्रलंबित आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध कारवाई केली जावी असा अर्ज ठाण्याचे एक नगरसेवक सुधीर बर्गे यांनी या याचिकांमध्ये केली आहे.

पावणे औद्योगिक वसाहतीतील कंपनीस आग
बेलापूर, १ एप्रिल /वार्ताहर

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील पावणे येथे बुधवारी सकाळी एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत दोन कामगार गंभीर जखमी झाले. धीरजलाल केमिकल कंपनीतील गोदामात सकाळी ११ वाजता अचानक आग लागली. सेलव्हॅन, टर्पेटाईन आदी ज्वलनशील पदार्थाचे पिंपांचे एकामागून एक स्फोट होऊ लागले. बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले. एमआयडीसी अग्निशमन दल व नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाचे १२ बंब व जवान सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते. जखमींना महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनसेचे तीन उमेदवार जाहीर
मुंबई, १ एप्रिल/ खास प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादसाठी सुभाष पाटील, भिवंडीतून डी. के. म्हात्रे तर कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी आज जाहीर केली.