Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रीय वर्षगणना
सध्या आपण सर्वजण व्यवहारामध्ये जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यांचे १ वर्ष मानतो आहोत. याशिवाय धार्मिक सण, व्रते यासाठी चैत्र ते फाल्गुन या १२ महिन्यांचे वर्ष वापरतो.
भारताचे पहिले द्रष्टे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना असे वाटत होते की, संपूर्ण भारतासाठी

 

एकच वर्षगणना पद्धती असावी. त्यासाठी त्यांनी डॉ. मेघनाद सहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या ७ सदस्यांपैकी ३ मराठी भाषिक होते. शिवाय नव्या पंचागासाठी ज्या सभा, परिषदा घेतल्या जात, त्यात ६०-७० टक्के उपस्थिती मराठी ज्योतिषींची असायची. आपणा मराठी लोकांना हे भूषणास्पद आहे.
डॉ. मेघनाद सहा समितीच्या शिफारशींवरून, दिल्लीच्या भारतीय केंद्र शासनाने २२ मार्च १९५७ या दिवशी एक नवी वर्षगणना अस्तित्वात आणली. त्या दिवसाला शासनाने अधिकृतपणे म्हटले, ‘‘राष्ट्रीय सौर चैत्र १, शके १८७९.’

- संपातवर्ष -

शासनाने बनविलेल्या या पद्धतीत वर्षांचा आरंभ हा ‘वसंतसंपात’ या खगोलीय घटनेवर आधारित आहे. वसंतसंपात म्हणजे काय? क्रांतिवृत्त, नाडीवृत्त असे खगोलशास्त्रातले शब्द न वापरता सोप्या, व्यावहारिक भाषेत समजावून घेऊया.
आपण सूर्याच्या उगवण्याच्या जागेचे रोज निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की वर्षांतले साधारण ६ महिने (२२ डिसेंबर ते २१ जून) सूर्याचे उगवणे उत्तर दिशेकडे झुकत असते. संस्कृतमध्ये अयन म्हणजे विशिष्ट दिशेला जाणे. या काळात सूर्य उत्तरेकडे सरकत असतो म्हणून हा उत्तरायण काळ. तर राहिलेला बाकीचा (२२ जून ते २१ डिसेंबर) दक्षिणायन काळ. कारण, या काळात सूर्य पुन्हा उलट दक्षिणेकडे सरकायला लागतो. हे उत्तरायण, दक्षिणायन चक्र अव्याहत चालूच असते.
आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहतो. उत्तरायण सुरू होते (२२ डिसेंबर) त्या वेळी आपली रात्र वर्षांतली सर्वात मोठी रात्र असते व दिन सर्वात लहान असतो. जसजसा सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो तसतशे रात्र लहान होऊ लागते व दिन मोठा होऊ लागतो. असे होता होता एक दिवस असा येतो की, त्या दिवशी दिन व रात्र समसमान १२-१२ तासांची असतात. (२०-२१ मार्च) हाच वसंतसंपाताचा दिवस!
आपल्याकडे अगदी वेदांच्या प्राचीन काळापासून ऋतूंवर आधारित अशी कालगणता चालू आहे. ऋतूंची नावे (१) वसंत, (२) ग्रीष्म, (३) वर्षां, (४) शरद, (५) हेमंत, (६) शिशिर या ६ ऋतूंचे १ वर्ष होते. वसंतसंपात हा वसंत ऋतूचा मध्यदिवस आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर, पुण्याचे वेद व खगोल अभ्यासक डॉ. प. वि. वर्तक या मताचे आहेत. काही पंचांगे, चांद्र चैत्र व वैशाख महिन्यांचा वसंत ऋतू मानतात. ते चूक आहे. कारण; ऋतूंचा संबंध बदलत्या हवामानाशी आहे. पृथ्वीचा आस कलता आहे, त्यामुळे ती सूर्याभोवती फिरत असताना तिचे निरनिराळे भाग सूर्यापासून कमी-अधिक लांब जातात व हवामानात बदल घडतात. तेव्हा सूर्य हा ऋतूंचा कारण आहे. चंद्राशी त्यांचा काही संबंधच नाही.
स्वत:भोवती फिरत, पृथ्वीची सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण व्हायला जो काळ लागतो, त्याला आपण वर्ष म्हणतो. पण ही प्रदक्षिणा मोजायला सुरुवात कुठून करायची? सूर्याभोवती फिरताना आकाशात पृथ्वी कुठे असताना? शासनाने असे ठरवले की, वसंतसंपात झाल्यानंतरच्या दिवसांपासून! संपाताच्या दिवशी पृथ्वी अशा ठिकाणी असते की, सूर्य नेमका पूर्वेला विषुववृत्तावर उगवतो. तो दक्षिणेला किंवा उत्तरेला झुकलेला नसतो.
आणखीही एका दिवशी सूर्य नेमका पूर्वेला उगवतो. शरद ऋतूचा मध्य ‘शरदसंपात’ या दिवशी (२३ सप्टेंबर). पण शरदसंपात सूर्याच्या दक्षिणायन काळात येतो, तर वसंतसंपात उत्तरायण काळात!
पृथ्वी वसंतसंपात दिनानंतर पुढे जात राहून, सूर्याभोवती प्रदक्षिणा करून पुन्हा वसंतसंपाताच्या जागी आली की १ वर्ष झाले! संपातांवर अवलंबून असलेले म्हणून याला सांपातिक वर्ष म्हणतात. ऋतूंशी संबंधित म्हणून ऋतुवर्ष किंवा आर्तव वर्षही म्हणतात आणि सूर्याच्या अयनांशी नाते आहे म्हणून अयनवर्षही म्हणतात. इंग्रजीत Tropical year.

- महिने -

पृथ्वीची सूर्याभोवती १ प्रदक्षिणा होते, याचा अर्थ ती सूर्याभोवती ३६० अंश कोनातून फिरते. याला १२ ने भागले की प्रत्येक कोन ३० अंशाचा होतो. शासकीय पद्धतीत वसंतसंपातानंतर सुरुवात करून ३० अंश कोनातून फिरायला पृथ्वीला जो वेळ लागतो तो १ महिन्याचा काळ.
या १२ महिन्यांना शासन कोणतीही नावे देऊ शकले असते. उदाहरणार्थ- सूर्यनमस्कारातली जी १२ नावे आहे ती या महिन्यांना देता आली असती. मित्र, रवी, सूर्य, भानू वगैरे. परंतु शासनाने परंपरेतली चैत्र ते फाल्गुन ही लोकांच्या परिचयातलीच नावे या महिन्यांना दिली. (आकृतीत वर्ष, ऋतू, महिने, दिवस, अयन हे सगळे परस्परसंबंध दाखविलेले आहेत) परंपरेतले महिने चंद्राच्या कलांशी (आकारांशी) निगडित आहेत आणि शासनाच्या पद्धतीचा तर चंद्राशी काहीच संबंध नाही. तेव्हा दोन्हीत फरक करण्यासाठी शासनाने आपल्या पद्धतीत प्रत्येक महिन्याच्या नावाआधी सौर हा शब्द जोडला आहे. (सौर म्हणजे सूर्यावर आधारित) सौर चैत्र, सौर वैशाख.. ते सौर फाल्गुन असे म्हणायचे. प्रत्येक २ सौर महिन्यांचा एक ऋतू होतो.
आकृतीत तुम्हाला असे दिसेल की, सूर्य पृथ्वीकक्षेच्या बरोबर मध्ये नसून थोडा बाजूला आहे. प्रत्यक्ष आकाशात स्थिती तशीच आहे. त्यामुळे ३० अंश कोनाचे पृथ्वीचे चालण्याचे अंतर बदलते. सूर्यापासून दूर असताना ते वाढलेले असते. जवळ असताना कमी असते. त्यामुळे सूर्याचा पृथ्वीवरचा गुरुत्वाकर्षणाचा प्रभावही बदलतो. तिच्या परिभ्रमण गतीत फरक पडतो. प्रत्येक ३० अंश कोनात. (महिन्यात) पृथ्वी किती काळ असते ते कोष्टक सोबत दिले आहे. कोष्टकावरून हे लक्षात येईल की प्रत्येक महिन्याचे दिवस व तास थोडेफार वेगवेगळे आहेत. सोयीसाठी प्रत्येक महिना जवळच्या पूर्ण दिवसांचा मानला जातो.
मार्गशीर्ष याऐवजी ‘अग्रहायण’ हे नाव उत्तरेत जास्त प्रचलित आहे. शासनाने ते घेतले आहे. त्याला खास अर्थही आहे. अग्रहायण = अग्र: + अयन. हा महिना संपला की पुढच्या महिन्यात वेगळे अयन (उत्तरायण) सुरू होते.
शासनाची कालगणना मुख्यत्वे (१) वसंतसंपात (२) दक्षिणायन (३) शरदसंपात व (४) उत्तरायण या महत्त्वाच्या घटनांवर आधारित आहे.
-------------------------------------
महिन्यातले सौर जवळचे
दिवस-तास महिने पूर्ण दिवस
-------------------------------------
३०-११ चैत्र ३०/३१
३०-२३ वैशाख ३१
३१-०८ ज्येष्ठ ३१
३१-११ आषाढ ३१
३१-०७ श्रावण ३१
३०-२२ भाद्रपद ३१
३०-०९ अश्विन ३०
२९-२२ कार्तिक ३०
२९-१३ अग्रहायण ३०
२९-११ पौष ३०
२९-१४ माघ ३०
२९-२३ फाल्गुन ३०
---------------------------------
३६५-०६ १२ ३६५/३६६
---------------------------------
सौर चैत्र ते सौर फाल्गुन (वसंतसंपात ते वसंतसंपात) या काळात पृथ्वीवर ३६५.२४२२ दिवस होतात. वरचे अपूर्ण दिवस सोडून वर्ष फक्त ३६५ दिवसांचेच मानतात. पण हा फरक मग चौथ्या वर्षी ३६६ दिवसांचे वर्ष मानून भरून काढतात. त्यासाठी सौर चैत्र दर चौथ्या वर्षी ३१ दिवसांचा मानला जातो. एरवी ३० दिवसांचा.
इसवीसन व शासकीय दोन्हीही वर्षे ३६५.२४ दिवसांची आहेत. (३६५.२५६३६०४२ दिवसांचे नक्षत्रवर्ष Sidereal year असते ते वेगळे)! परंतु, इसवी सनात महिन्याचे दिवस ३०/३१/२८/२९ का, याला कोणतेही तर्कशुद्ध उत्तर नाही. आरंभ १ जानेवारीला का? उत्तर नाही! पण शासकीय पद्धतीत तर्कशुद्ध उत्तरे आहेत. शासकीय पद्धतीत २८/२९ दिवसांचा कोणताच महिना नाही. सौर वैशाख ते भाद्रपद सलग ३१ दिवसांचे का याला उत्तर आहे. (कोष्टक पाहा). इथे एक लक्षात घ्यायचे! शासनाचा १ चैत्र किंवा वर्षांरंभदिन हा वसंतसंपातानंतरच्या मध्यरात्रीला चालू होतो. शासकीय पद्धतीत महिन्याचे दिवस सरळ इंग्रजी पद्धतीप्रमाणे १ ते ३० किंवा ३१ असेच मोजतात. दिवस मध्यरात्र ते मध्यरात्र असाच धरतात.

- शके -

शासनाने ही कालगणना इ.स. १९५७ मध्ये चालू केली. ते राष्ट्रीय कालगणनेचे पहिले वर्ष होते. परंतु त्यावेळी शालिवाहन शक १८७९ चालू होता. शासनाने तोच स्वीकारला. ‘राष्ट्रीय वर्ष १’ असे न म्हणता, शासनाने आपल्या पहिल्या वर्षांला ‘शके १८७९’ म्हटले. शालिवाहन राजे आपल्या महाराष्ट्रातले! पैठण ही त्यांची राजधानी होती. एक प्रकारे दिल्लीच्या केंद्र शासनाने महाराष्ट्रीय शक ‘राष्ट्रीय’ म्हणून अधिकृतपणे स्वीकारला आहे. करंटे आम्ही आहोत! हे दिनांक न वापरता इसवी सनाला कवटाळून बसलो आहोत!
आपली पारंपरिक नक्षत्रांवर आधारित कालगणना बिनचूक आहे. पण फार गुंतागुंतीची, किचकट आहे. त्यामुळे लोक इंग्रजी इसवी सन पद्धत वापरतात. त्यापेक्षा शासनाची राष्ट्रीय पद्धत का वापरू नये? तीही पूर्ण स्वदेशी आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी बनवलेली, सोपी, तर्कशुद्ध! महिन्यांची नावे आपली, शके आपला! या पद्धतीचे नुसते रंगरूप स्वदेशी नाही, तर आत्माही स्वदेशी आहे. कारण ती वेदकाळापासून चालत आलेल्या ‘ऋतू’ या संकल्पनेशी जोडलेली आहे. आपल्याकडे नक्षत्रवर्ष व ऋतुवर्ष दोन्हीही प्राचीन वेदकाळापासून स्वतंत्रपणे चालत आलेली आहेत. आपण धार्मिक सण चांद्रमासांप्रमाणे, तिथीप्रमाणे करू शकतो. त्याला शासनाची मनाई नाही. आपण जनतेने या विज्ञानयुगात बुद्धिवादाची कास धरायलाच हवी. त्यासाठी ही एक सोपी सुरुवात आहे! कायदा झालाय, कालगणना तयार आहे, फक्त तुम्ही, आम्ही कार्यवाही करायची आहे!
रवींद्र द. खडपेकर
raviplusindra@hotmail.com
(टीप : मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग येथे सोमवार ते शनिवार संध्या. ४ ते ७ या वेळात राष्ट्रीय वर्ष दिनदर्शिका मिळू शकेल. जिज्ञासूंनी संपर्क साधावा. दूरभाष - २५३३१२१२.)