Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

घामाघूम..
प्रतिनिधी
गेला आठवडाभर सरासरीच्या वर कायम असलेले तापमान व हवेतील वाढलेली आद्र्रता यांचा एकत्रित परिणाम म्हणून बुधवारी मुंबईत उकाडा वाढला. तसेच, सतत लागलेल्या घामाच्या धारांमुळे अस्वस्थताही वाढली होती. हवामानातील या बदलांनी मुंबईत उन्हाळा दाखल झाल्याची जणू वर्दीच दिली आहे. मुंबई म्हटली की कोणत्याही ऋतूत घामाच्या धारा लागतातच. यावेळी उन्हाळा सुरू झाल्यानंतर उकाडा वाढत गेला, पण बुधवारी त्याची तीव्रता जास्तच वाढली.

सीएसटी स्थानकात प्रवाशांसाठी तीन लिफ्ट
लिफ्टची सोय असलेले मुंबईतील पहिले स्थानक

कैलास कोरडे

अपंग आणि वयोवृद्ध प्रवाशांना रेल्वे स्थानकांतील पादचारी पुलांच्या पायऱ्या चढून फलाटांवर पोहोचणे अवघड होते. गर्दीच्या वेळी तर फलाट गाठणे त्यांना जिकिरीची होऊन बसते. व्हीलचेअर वापरणाऱ्या प्रवाशांची तर प्रचंड गैरसोय होते. मात्र सीएसटी स्थानकात सध्या उभारण्यात येणाऱ्या तीन नव्या लिफ्टमुळे अपंग व वयोवृद्ध प्रवाशांची या कटकटीपासून कायमची सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील एखाद्या रेल्वे स्थानकावर उभारण्यात येणाऱ्या या पहिल्या लिफ्ट ठरणार आहेत.

‘फॅशन वीक’ने प्रथमच नाळ जोडली सामान्यांशी
प्रतिनिधी

फॅशनची दुनिया अद्भूत असते. सर्वसामान्य
माणसाचा या दुनियेशी काही संबंध नसतो. या ग्लॅमरस लोकांचे कपडे, वागणं, खाणं, बोलणं सगळंच वेगळं.. असा लोकांचा समज असतो. पण जागतिक दहशतवादाने ही सीमारेषा धूसर होत असल्याचे चित्र यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकच्या निमित्ताने समोर आले. गेली काही वर्षे या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ने सर्वसामान्य नागरिकाबरोबर प्रथमच आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न केला.

स्कायवॉकच्या विरोधात मुंबईकर एकत्र लढणार!
प्रतिनिधी

मुंबईत ठिकठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्कायवॉकना स्थानिक रहिवाशांकडून कडवा विरोध होत आहे. मात्र स्कायवॉकला होत असलेल्या विरोधाची एमएमआरडीएकडून योग्य ती दखल घेण्यात येत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे काही नागरिक एकत्र आले असून त्यांनी एक समन्वय समिती स्थापन करून स्कायवॉकच्या विरोधात एकत्रित आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कायवॉकला विरोध असलेल्या स्थानिक रहिवाशांशी संपर्क साधून लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

एमएमआरडीएच्या हलगर्जीपणामुळे अंधेरीकरांचे पाणी बंद
प्रतिनिधी

‘एमएमआरडीए’ने सुरू केलेल्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे पालिकेच्या जलवाहिनीला धक्का लागल्याने अंधेरी पूर्व परिसरातील अनेक विभागांत गेले काही दिवस पाणीपुरवठाच झालेला नाही. स्थानिक रहिवाशांनी पालिका आणि ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही याची कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे तहानलेल्या रहिवाशांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

साडेपंधरा तासात अष्टविनायक
प्रतिनिधी

आठवडय़ातले साडेपाच अथवा सहा दिवस भरपूर काम करून आलेला शिणवटा घालवून पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी विकएन्डला मित्रमंडळींसोबत मस्त भटकंती करण्याचा ट्रेंड तरूण पिढीमध्ये वाढू लागला आहे. त्यातून जिवाभावाच्या मित्रांसोबतच्या सहवासाने मनावरील ताण दूर होतोच, शिवाय पर्यटनाचा आनंद मिळतो. ठाण्यातील विष्णूनगर भागातील नाक्यावर रोज नियमित वेळी भेटणाऱ्या ग्रुपपैकी उन्मेष डिंगोरे आणि अमेय भावे या तरूणांनी याच भटकंतीच्या छंदातून शनिवारी दुचाकीवरून अवघ्या साडेपंधरा तासात अष्टविनायक यात्रा पुर्ण केली. अशी किमया साधून या दोघांनी नाक्यावरील त्यांच्याच एका मित्राचा-सुजीत साठेचा १८ तास ४० मिनिटांत अष्टविनायक यात्रा बाईकवरून पुर्ण करण्याचा रेकॉर्ड मोडला आहे.

‘वेटिंग फॉर गोदो’ येतंय
प्रतिनिधी

गुढीपाडव्याच्या दिवशी जागतिक रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नाटय़नाथ निर्मित, अनंत पणशीकर प्रकाशित ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकाचा मुहूर्त दाजीशास्त्री पणशीकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाटय़संकुलात करण्यात आला. दाजीशास्त्री यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अशोक शहाणे रुपांतरित नाटकाच्या नाटय़संहितेचे पूजन केले आणि नाटकासाठी शुभेच्छा दिल्या. ‘वेटिंग फॉर गोदो’चे दिग्दर्शन अरुण होर्णेकर करीत असून त्यात शेखर नवरे, दिलीप खांडेकर आणि अरुण होर्णेकर यांच्या भूमिका आहेत. शिवाय यात एक महत्त्वाची भूमिका हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ कलावंत करणार आहेत. मुहूर्तप्रसंगी सांस्कृतिक कार्य संयालनालयाचे संचालक अजय आंबेकर उपस्थित होते. अजित केळकर, उपेंद्र दाते, राजन बांदेकर ही कलावंत मंडळीही या वेळी उपस्थित होती. यावेळी दिलीप खांडेकर आणि अरुण होर्णेकर यांनी नाटकाच्या एका प्रवेशाचे वाचन केले.

मंदीतही सिडकोचे ‘सेलिब्रेशन’ अबाधित!
राजीव कुळकर्णी

जागतिक मंदीच्या लाटेमुळे बडे-बडे बिल्डर, बँका व वित्तीय संस्थांचे डोलारे डळमळीत होऊ लागल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून विविध सवलतींची घोषणा होत असताना सरकारी उपक्रम असलेल्या सिडकोकडून मात्र ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत गतवर्षी जानेवारीमध्ये बाजार तेजीत असताना सिडकोने खारघर येथे ‘सेलिब्रेशन’-केएच ४ ही गृहनिर्माण योजना जाहीर केली. या योजनेला उदंड प्रतिसाद लाभला.

बदल दिसले.. पण सातत्य हवे!
गेल्या महिन्यात नाशिकमधील माझा एक मित्र कामानिमित्त मुंबईत आला होता. तसा तो वरचेवर रेल्वेने मुंबईला अप-डाऊन करीत असतो. त्यामुळे रेल्वे प्रवासाचे त्याला फारसे अप्रूप राहिलेले नाही. मात्र यावेळी तो रेल्वे प्रवास करताना भरताच प्रभावित झाल्याचे दिसत होते. कसारा ते सीएसटीदरम्यान रेल्वेमार्गावर आणि रेल्वे स्थानकांत दिसलेला बदल हे त्यामागील कारण असल्याचे त्याने सांगितले. मुंबईबाहेर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला हा बदल इतक्या प्रकर्षांने जाणवावा, या गोष्टीचे मला आश्चर्य वाटले.

राष्ट्रीय वर्षगणना
सध्या आपण सर्वजण व्यवहारामध्ये जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यांचे १ वर्ष मानतो आहोत. याशिवाय धार्मिक सण, व्रते यासाठी चैत्र ते फाल्गुन या १२ महिन्यांचे वर्ष वापरतो. भारताचे पहिले द्रष्टे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना असे वाटत होते की, संपूर्ण भारतासाठी एकच वर्षगणना पद्धती असावी. त्यासाठी त्यांनी डॉ. मेघनाद सहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या ७ सदस्यांपैकी ३ मराठी भाषिक होते. शिवाय नव्या पंचागासाठी ज्या सभा, परिषदा घेतल्या जात, त्यात ६०-७० टक्के उपस्थिती मराठी ज्योतिषींची असायची.

ठाण्यात हायटेक वधू-वर मेळावा : ‘लोकसत्ता’ सहप्रायोजक
प्रतिनिधी

ठाण्यामध्ये ५ ते ८ एप्रिलदरम्यान एक आगळा व भव्य वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ठाणे पूर्वेकडील युनायटेड स्पोर्टस् क्लबच्या पटांगणामध्ये हा मेळावा होत आहे. ‘शुभमंगल वधू- वर मेळावा’ असे याचे नाव असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून याचे आयोजन करण्यात आले आहे. सी. सी. टीव्हीचा वापर, व्हिडियो रेकॉर्डिग अशा हायटेक तंत्रांचा वापर मेळाव्यात केला जाणार असून ‘लोकसत्ता’ या मेळाव्याचा सहप्रायोजक आहे.

रॉयल पाम्स जमीनप्रकरणाला नवे वळण
प्रतिनिधी

चित्रपट निर्माता तसेच हिरे व्यापारी भरत शहा याने सीए समीर संघवीच्या मदतीने बनावट मिटिंग्ज मिनिट्स उच्च न्यायालयात पुरावा म्हणून सादर केल्याचा आरोप रॉयल पाम्सतर्फे पोलीस तक्रारीत केल्याने रॉयल पाम्स आणि शहा यांच्यामध्ये सुरू असलेल्या आरे कॉलनी येथील जमिनीच्या खरेदी आणि हस्तांतरणाप्रकरणाच्या वादाला नवे वळण मिळाले आहे.

जनसामान्यांच्या आशीर्वादाने अपना बँक प्रगतीपथावर - डॉ. लहाने
प्रतिनिधी

अपना बँकेच्या ४१ वर्षांच्या वाटचालीत बँकेच्या धुरिणांनी केलेल्या जनसामांन्यांच्या सेवेमुळे बँकेस त्यांचे उदंड आशीर्वाद मिळाले आहेत. त्यामुळे आजघडीला बँक प्रगतीपथावर आहे, असे उद्गार डॉ. तात्याराव लहाने यांनी अलीकडेच येथे काढले.

पत्रकारांसाठी पर्यावरणविषयक कार्यशाळेचे आयोजन
प्रतिनिधी

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलीकडेच पत्रकारांसाठी पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी डी. टी. देवळे यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने या कार्यशाळेचा प्रारंभ झाला. मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अजय फुलमाळी यांचे ‘जैविक आणि घन कचरा व्यवस्थापन’, कृषी पर्यटन तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांचे ‘ग्रामीण पर्यावरण आणि जनजागृती’, पर्यावरण तज्ज्ञ आणि प्रसिद्ध नाटककार शेखर ताम्हाणे ‘पर्यावरण कायद्यांची अमलबजावणी’ या विषयावर मार्गदर्शनपर भाषणे झाली.

वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉलसाठी चर्चासत्र
प्रतिनिधी

ऊन, पाऊस, थंडी अशा अनेक अडचणींवर मात करून मुंबईकरांना वेळेवर वर्तमानपत्र पोहोचवणारे वृत्तपत्र विक्रेते पेपरचे कायदेशीर स्टॉल मिळण्यासाठी संघटित होत आहेत. वृत्तपत्र विक्रीसाठी, कायमस्वरुपी स्टॉल मिळण्यासाठी ‘मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघा’ची समिती नेमण्यात येणार आहे. त्यासाठी १५ एप्रिलला चर्चासत्र आयोजित केले आहे. मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांना पेपरविक्रीचा कायदेशीर स्टॉल मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून संघ सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पण कायमस्वरुपी स्टॉल मिळण्यासाठी कोणताही तोडगा निघालेला नाही.संघाच्या वतीने जयवंत डफळे, रवींद्र चिले, शरद धुरी तसेच बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ व महासंघ त्यांचे प्रतिनिधींनी सर्व विक्रेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तरीही कोणतेही राजकारण व गटबाजी न करता मुंबईतील सर्व विक्रेता संघाची एक समिती नेमून स्टॉलविषयी कायमस्वरुपी तोडगा निघावा अशी संघाची प्रामाणिक इच्छा आहे. तरी स्टॉलविषयी अटी व नियम यांचा अभ्यास करून त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी १५ एप्रिलला चर्चासत्रामध्ये भाग घेण्याकरिता सर्व वृत्तपत्र विक्रेते यांनी एकत्र यावे.

पार्ले कट्टय़ावर मिलिंद गुणाजी
प्रतिनिधी

पार्ले कट्टय़ावर ४ एप्रिल रोजी अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्यासोबत गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राणी गुणाजी, डॉ. शशिकला वैद्य, डॉ. अनुया पालकर हे मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम साठे उद्यान, पार्क रोड, शिवसेना शाखेसमोर, विलेपार्ले (पू.). या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वैद्यकीय शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी
श्री साईनाथ सेवा ट्रस्ट आणि हिंदुजा इस्पितळाच्या वतीने ५ एप्रिल रोजी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कान, घसा, नाक, मोतीबिंदू तपासणी केली जाणार आहे. प्रभादेवी येथील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिपक भाटकर यांनी केले आहे.

डोंबिवलीत नूतन वैद्यकीय पदवीधरांचा सत्कार
प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता डोंबिवली जिमखाना (पूर्व) येथे नूतन वैद्यकीय पदवीधरांचा सत्कार करण्यात येणार आहे. ‘आयुष्य वाचवा, रुग्णालये आपत्कालासाठी सुरक्षित बनवा' हे यंदाचे घोषवाक्य असून सुप्रसिद्ध शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. रा. अ. भालेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत इंडियन डेंटल असोसिएशन, आयुर्वेद व्यासपीठ, होमिओपॅथी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन या संस्थाही या सोहळ्याच्या आयोजनात सहभागी आहेत. डोंबिवली मेडिकल डिरेक्टरी समितीच्या संयोजनाखाली दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. गेल्या १९ वर्षांत डोंबिवलीतील ८८६ नूतन वैद्यकीय पदवीधरांचा सत्कार करण्यात आला आहे. संबंधित नूतन वैद्यकीय पदवीधरांनी नोंदणी करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क-डॉ. सुनील पुणतांबेकर, १०३, वक्रतुंड भवन, राजाजी पथ, गल्ली क्र. १, डोंबिवली (पूर्व) मोबाईल-९८२०२१०८२४.

ब्लाईंड होममध्ये सर्व सोयीसुविधांची पूर्तता
प्रतिनिधी

जोगेश्वरी येथील ब्लाईंड होममधील अंधांसाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. निवास, जेवण व कॉट-गादी इत्यादी महत्त्वाच्या सुविधा अल्प दरात विद्यार्थ्यांना पुरविण्यात येतात. परंतु, काही अंध व्यक्ती शुल्क भरत नसल्याने त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात आल्याचा खुलासा ब्लाईंड होमचे मुख्य कार्यकारी अधिकारी बा. कृ. गिड्डे यांनी केला आहे.
२८ फेब्रुवारी रोजी ‘वृत्तांत’मध्ये ‘जोगेश्वरीच्या ब्लाईंड होममधील समस्यांमुळे अंध रहिवासी हैराण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या संदर्भात गिड्डे यांनी हा खुलासा केला आहे. ब्लाईंड होममध्ये राहणाऱ्या अंध व्यक्तींकडून निवास, एक वेळचे पोटभर जेवण, सकाळचा चहा व नास्ता, दुपारचा चहा यासाठी दरमहा केवळ ३०० रूपये शुल्क आकारण्यात येते. तर दोन वेळच्या जेवणासाठी ४०० रूपये घेण्यात येतात. पण काही अंध व्यक्ती ३०० रूपये शुल्क भरूनही दोन वेळचे जेवण घेत होत्या. अशा व्यक्तींवर कारवाईचा भाग म्हणून डिसेंबर २००८ पासून अतिरिक्त शुल्क आकारण्यात आले होते. जे नियमितपणे शुल्क भरतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींनीच प्रसारमाध्यमांकडे जाऊन संस्थेबद्दल चुकीची माहिती दिली, असे गिड्डे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.