Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुधवारी अर्ज दाखल केल्यावर प्रचारसभा झाली. पालकमंत्री दिलीप वळसे, कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, महापौर संग्राम जगताप, शिवाजीराव नागवडे, भानुदास मुरकुटे, प्रसाद तनपुरे, दादापाटील शेळके, जिल्हाध्यक्ष दादा कळमकर आदी यावेळी उपस्थित होते.

लोंढे यांनाही विरोधी पक्षनेता व्हायचंय!
नगर, १ एप्रिल/प्रतिनिधी
महापालिकेतील विरोधी पक्षनेता म्हणून आपली निवड करावी, असे पत्र महापौर व प्रशासनाला देऊन शिवसेनेतील बंडखोर नगरसेवक सुभाष लोंढे यांनी सेना-भाजप युती व प्रशासनासमोरही पेच निर्माण केला आहे. दुसरे बंडखोर नगरसेवक अंबादास पंधाडे यांची या पत्रावर सूचक म्हणून स्वाक्षरी आहे. लोंढे व पंधाडे या दोघांचीही सेना-भाजप व ३ अपक्षांच्या ३३जणांच्या गटात नोंद असून, हा गट विभागीय आयुक्तांनी अधिकृत ठरवला असला, तरी त्यात गटनेत्यांची मात्र नोंद करण्यात आली नव्हती.

नगर तालुका दहशतमुक्त करू - गांधी
नगर, १ एप्रिल/वार्ताहर
नगर तालुका दहशतमुक्त करू, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांनी केले. पक्षाच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत गांधी बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग होते. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. भानुदास बेरड, सुहास कासार, सुनील पंडित, रामदास आव्हाड, अनिल शर्मा, तालुका सरचिटणीस श्याम पिंपळे उपस्थित होते.

तडजोड : सांधा अजोड
दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. जीवनाची ही सुरेल व्याख्या कदाचित सर्वात छोटी आणि सर्वात अर्थपूर्णही असावी. कारण या व्याख्येत भुर्रकन सरणाऱ्या आणि सारीपटागत भासणाऱ्या जीवनाचं नेमकं वैशिष्टय़च अधोरेखित केलेलं दिसतं. प्रत्यक्ष जीवनात मात्र हरघडी अनुभवास येणारी आणि आयुष्यभर अविरत चालणारी बाब म्हणजे सर्वाच्याच परिचयाची तडजोड.तशी साऱ्यांनाच कधी ना कधी आणि या ना त्या कारणाने तडजोड ही करावीच लागते. समर्थ रामदासांच्या ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ या कालातीत उक्तीसारखं तडजोडीच्या बाबतीतही विचारता येईल, जगी तडजोडीविना राहे असा कोण आहे?

एबी फॉर्मसह कर्डिले यांचा अर्ज दाखल
नगर, १ एप्रिल/प्रतिनिधी

नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसह त्यांनी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना कर्डिले यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. कर्डिले यांनी एकाच वेळी चार अर्ज दाखल केले.

शिरूर-पुणे चौपदरीकरणाची चौकशी
जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचा आदेश
नगर, १ एप्रिल/प्रतिनिधी
काम अपूर्ण ठेवत, सरकारी नियमांची पायमल्ली करीत टोल वसुली सुरू केलेल्या शिरूर-पुणे रस्ता चौपदरीकरणाची चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय समिती नेमण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मोहोळे, शशिकांत चंगेडे व जितेंद्र लांडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात ही जनहित याचिका दाखल केली आहे.

औषधविक्रेत्यास लुटणाऱ्या चौघांना अटक; लुटीतील ५७ हजार जप्त
श्रीगोंदे, १ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील लिंपणगाव येथे बारामतीच्या औषधविक्रेत्यास १ लाख २० हजार रुपयांना लुटल्याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक करून ५७ हजार रुपये जप्त केले. औषधविक्री करणाऱ्या रिक्षाचा चालकच या लुटीचा सूत्रधार आहे. आरोपी बारामती-इंदापूर भागातील आहेत.

पाथरकर समाजाच्या मेळाव्यात १०१ वधू-वरांचा सहभाग
कोपरगाव, १ एप्रिल/वार्ताहर

अखिल पाथरकर समाज सेवा संस्थेच्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात १०१ वधू-वरांनी सहभाग घेतला. सातजणांचे विवाह ठरले, अशी माहिती अध्यक्ष रमेश भोपे यांनी दिली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी इगतपुरीचे सभापती जनार्दन माळी होते. आनंदराव नाईक, सूर्यकांत पाटील, सुरजभाई कोपरकर, घोटी बाजार समितीचे उपाध्यक्ष रघुनाथ तोकडे, सुरेश पाटील यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक हेमंत भोईटे यांनी केले. पाथरकर समाजाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणराव कुडके, उपाध्यक्ष उत्तमराव गोपाळे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन शीला भगत, तर आभार उपाध्यक्ष रमेश भगत यांनी मानले. मेळाव्यासाठी विजय आमले, सुहास गगे, शिवकिरण आमले, जितेंद्र थेरपे, युवराज शेटे, विनोद मैले, अलका गोपाळे, विजय म्हस्के यांनी परिश्रम घेतले.

श्रीरामपूरला रविवारी कान तपासणी शिबिर
श्रीरामपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी

येथील लायन्स क्लब, तसेच कुटे मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (दि. ५) सकाळी १० वाजता मोफत कानाचे विकार तपासणी शिबिर आयोजित केले असल्याची माहिती सुनील गुप्ता, डॉ. रवींद्र कुटे यांनी दिली. नगरच्या प्रसिद्ध तज्ज्ञ प्रतिमा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होणार आहे. कुटे रुग्णालयात होणाऱ्या या शिबिरात जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कानाच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन मिळणार आहे. शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

आचारसंहिता भंगाबद्दल रिक्षाचालकाला अटक
नगर, १ एप्रिल/प्रतिनिधी
पॅगो रिक्षावर विनापरवाना फलक व ध्वनिवर्धक लावून प्रचार केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी चालक गणेश सुधाकर कर्डिले (रा. सर्जेपुरा) यास अटक केली. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांची आज दुपारी बाजार समिती चौकात प्रचारसभा होती. या सभेसाठी गणेश कर्डिले याने रिक्षाचा (एमएच १६ बी ९६९९) विनापरवाना प्रचारासाठी वापर करून आचारसंहितेचा भंग केला, अशी फिर्याद हवालदार दुशिंग यांनी दिली. बाजार समिती आवारात अर्बन बँकेसमोर तो रिक्षातून प्रचार करताना आढळला.

जेजुरी, शिर्डी, श्रीरामपूरसाठी यात्रेनिमित्त जादा गाडय़ा
नगर, १ एप्रिल/प्रतिनिधी

एसटी महामंडळाच्या नगर विभागातर्फे जेजुरी येथील खंडोबा यात्रेसाठी ३८, तर श्रीरामनवमीनिमित्त शिर्डी-श्रीरामपूर यात्रेसाठी ५८ जादा गाडय़ा सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक जे. एम. उदमले यांनी दिली. जेजुरीसाठी ८ ते ११ एप्रिलदरम्यान, तर शिर्डी, श्रीरामपूरसाठी उद्या (गुरुवार)पासून रविवापर्यंत गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कर्डिले लँडलॉर्ड
नगर, १ एप्रिल/प्रतिनिधी

रेसिडेन्शिअल हायस्कूलमधून सन १९७४मध्ये इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेले, नगर तालुक्यातून सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले नगर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्याकडे फक्त ५ हजार रुपयांची रोकड असली, तरी त्यांच्या नावावर बुऱ्हाणनगर व अन्य ठिकाणी असलेल्या शेतजमिनी व अन्य इमारतींची किंमत मात्र तब्बल १ कोटी ५९ लाख ५४ हजार इतकी आहे!
याशिवाय पत्नीच्या नावावर असलेल्या जमिनींची व इमारतींची किंमतही ३० लाख ८० हजार आहे.

एकच ‘प्याला’!
नगर मतदारसंघातील एका पक्षाच्या उमेदवारासाठी ग्रामीण भागात नुकत्याच जंगी प्रचारसभेचे आयोजन केले होते. सभेला प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सभेसाठी चांगली गर्दी जमविली होती. भाषणात प्रमुख नेत्याने प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. आधी कापूस प्रश्नावर बोलताना ‘कापसाचा भाव आम्ही ११००वरून २८००वर नेला,’ असे म्हणताच लोकांनी टाळ्यांचा गजर केला. पुढे नेत्याने शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांना हात घातला. वीजप्रश्नावर बोलताना ‘केंद्रात आमचे सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांची वीज एक मिनिटही जाऊ देणार नाही,’ असे म्हणताच समोरच्या गर्दीतील एकजण अचानक तत्परतेने उठला आणि म्हणाला, ‘यापुढे एक मिनिटसुद्धा वीज आली नाही पाहिजे!’ त्याच्या या उद्गारावर सभेत क्षणभर शांतता पसरली.

राजळेंचा पत्ता कुणी कापला?
पाथर्डीचे आमदार राजीव राजळे यांनी एकाच म्यानात तीन तलवारी घेऊन फिरण्याची कसरत केली. परंतु लोकसभेच्या मैदानात त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाची तलवार उरली नाही. राजळे काँग्रेसचे आमदार. मतदारसंघ पुनर्रचनेत त्यांचा पाथर्डी विधानसभा मतदारसंघ विभागला गेला. त्यामुळे त्यांना खासदारकीचे डोहाळे लागले.

खासदार विखेंनी राज्यसभेवर जावे - आठवले
आज अर्ज दाखल करणार
नगर, १ एप्रिल/प्रतिनिधी

भारिपचे नेते रामदास आठवले यांची शिर्डीतील निवडणूक खासदार बाळासाहेब विखे यांच्याभोवतीच केंद्रीत झाली आहे. मात्र, त्यांची नाराजी दूर होईल, असा विश्वास आठवले यांना आहे. पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी याबाबत आपल्याला हमी दिल्याचे आठवले यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बाहेरील शक्तींनी तालुका खाईत लोटला - धुमाळ
राहुरी, १ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील राजकीय संघर्षांचा बाहेरील शक्तींनी फायदा घेऊन राहुरी तालुक्याला खाईत लोटण्याचा प्रयत्न केला. तो थांबविण्यासाठी माजी आमदार प्रसाद तनपुरे व आपण आता विचार करण्याची हीच वेळ आहे, असे मत डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

आठवलेंची उमेदवारी जाहीर न झाल्याने रुपवते आशावादी
संगमनेर, १ एप्रिल/वार्ताहर

शिर्डीतून खासदार रामदास आठवले यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच ती जाहीर न झाल्याने काँग्रेसचे निष्ठावंत प्रेमानंद रुपवते अजूनही आशावादी आहेत. मात्र, उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष अथवा अन्य पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे.

गडाख-राजळे समर्थकांकडून शेवगावमध्ये चाचपणी
शेवगाव, १ एप्रिल/वार्ताहर

पाथर्डीचे आमदार राजीव राजळे व खासदार तुकाराम गडाख यांच्या उमेदवारीसंदर्भात येथे उत्सुकता असून, या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून चाचपणी सुरू आहे.श्री. राजळे व गडाख यांच्या उमेदवारीने कुणाला राजकीय फायदा होणार याचीही चर्चा झडत आहे.

विकासकामांची पावती मतदानातून मिळेल - औटी
वाडेगव्हाण, १ एप्रिल/वार्ताहर

पारनेर तालुक्यात केलेल्या विकासकामांमुळे लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या रूपाने पावती मिळेल, असा विश्वास आमदार विजय औटी यांनी व्यक्त केला. पारनेर येथील बेलकर मंगल कार्यालयात शिवसेना-भाजप युतीच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून श्री. औटी बोलत होते. तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जातीयतेचे विष पेरत असल्याचा आरोप श्री. औटी यांनी केला. भाजप उमेदवार दिलीप गांधी यांचा प्रचार सेनेचे कार्यकर्ते मनापासून करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. सेनेचे तालुकाप्रमुख सबाजी गायकवाड यांनी ही निवडणूक विधानसभेची नांदी ठरणार असल्याचे सांगितले. जि. प. सदस्य वसंतराव चेडे, वसंत लोढा, कृष्णाजी बडवे, काशिनाथ दाते, मनीषा माळी, सुरेश बोऱ्हुडे, साहेबराव मोरे आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षांतील नाराजांच्या कर्डिले संपर्कात!
कर्जत, १ एप्रिल/वार्ताहर

नगर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी तालुक्यातील विरोधी पक्षांतील नाराजांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नीतिने त्यांनी युतीचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या तालुक्यातील विरोधकांशी संधान साधायला सुरुवात केली आहे. भाजपमधील अभय आगरकर यांना मानणारा गट आगरकर यांच्या दौऱ्यानंतरही अद्याप प्रचारात सक्रिय झाला नाही. शिवसैनिकांमध्येही भाजपबद्दल नाराजी असून, तेही प्रचारापासून अलिप्तच राहिले आहेत. नाराज कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यावर कर्डिलेंनी भर दिला आहे. सर्वच पक्षांतील अशा कार्यकर्त्यांशी त्यांनी स्वत मोबाईलवर संपर्क साधून चर्चा केल्याची माहिती मिळाली. तालुक्यातील नाराजांचा फायदा करून घेण्याची व्यूहरचना कर्डिले आखत आहेत. त्यात त्यांना किती यश येते, यावर त्यांचे तालुक्यातील भवितव्य अवलंबून आहे.