Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

इतिहास बदलू पाहणारा कवी
‘सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण झालेलं गढुळलेपण दूर करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे आणि हा निर्णय जाहीर केल्यावर मिळालेल्या प्रतिसादाने भारावून गेलो आहे’, असे डॉ. यशवंत मनोहर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
मराठी साहित्याच्या क्षेत्रात यशवंत मनोहर यांनी एक कवी आणि समीक्षक म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही आणि हे पीक आम्ही आसवांवर काढले’ अशा शब्दात सामाजिक विषमतेवर भेदक भाष्य करणारा कवी, आंबेडकरी विचारांची समाजभिमुख चिकित्सा करणारा समीक्षक, विद्यार्थ्यांना डोळसपणे घडवणारा शिक्षक, अनेकांच्या लेखनांना प्रेरणा देणारा मार्गदर्शक, सामाजिक लढय़ात सक्रिय सहभागी होणारा विचारवंत अशा विविध पैलूंनी मनोहरांचे व्यक्तिमत्त्व सजलेले आहे. अशा या बहुधांगी पैलूंसह गढुळलेलं सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण स्वच्छ करण्यासाठी मनोहर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनेक डाव्या आणि पुरोगामी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

राजकीय पक्षांमध्ये आता ‘मोबाईल वॉर’
नागपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी
प्रसारमाध्यमांद्वारे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणे ही कंपन्यांची क्लुप्ती आता राजकारण्यांना सूचू लागली आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत अत्याधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राजकीय पक्षांचा कल राहतो. यंदाही याच प्रकारचे चित्र बघावयास मिळत असून लोकसभा निवडणुकांना अजून अवकाश असला, तरी राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांमधील ‘एसएमएस वॉर’ला सुरुवात झाली आहे.

‘नॅनो’ नागपुरात
नागपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी
आजपासून ‘टेस्ट ड्राईव्ह’
९० ग्राहकांची नोंदणी
सर्वसामान्यांची नॅनो कार कधी येणार.. बुकिंग कधी सुरू होणार.. सुरुवातीला किती रुपये भरावे लागणार.. यासारख्या प्रश्नांना उत्तरे देऊन कंटाळलेल्या टाटा मोटर्सच्या शोरूमधारकांनी अखेर आज सुटकेचा निश्वास सोडला. दहा दिवसांपूर्वी बाजारात सादर झालेल्या नॅनोचे आज दहाव्या दिवशी नागपूरकरांना प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यामुळे टाटाच्या वाहनांच्या शहरातील दोन प्रमुख शोरुम्समध्ये नागरिकांनी सकाळपासूनच ही कारला जवळून पाहण्यासाठी गर्दी केली होती.

चार अपघातात तिघे ठार, चार जखमी वाडी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर थोराने ठार
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी
कोराडी येथे बुधवारी दुपारी एका अपघातात वाडी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर थोराने ठार झाले. ते मोटारसायकलने घरी परत येत असताना हा अपघात घडला. नागपूर शहर व ग्रामीणमध्ये चार अपघात होऊन त्यात तिघे ठार तर चार जखमी झाले. छिंदवाडा मार्गावर कोराडी येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. चंद्रशेखर घनश्याम थोराने (रा. मारुती नगर वाडी) हे पल्सर मोटारसायकलने(एमएच ३१ एडब्लू ३६४२) कोराडीकडून वाडीला जात होते.

मोठय़ा प्रकल्पात ९ टक्केच पाणी! १८ जलाशये कोरडी
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

नागपूर विभागातील मोठे जलाशय आतापासूनच कोरडे पडू लागल्याने पुढील दोन महिन्यात नागरिकांना कधी नव्हे एवढय़ा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मोठय़ा जलाशयात ९ टक्के, मध्यम प्रकल्पात १० टक्के तर लघु प्रकल्पात फक्त ६ टक्के पाणी शिल्लक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रचारासाठी केवळ १३ दिवस; उमेदवारांची होणार दमछाक
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या, गुरुवारी अखेरचा दिवस आहे. प्रचाराला जोमाने सुरुवात झाली असली तरी, प्रत्यक्षात प्रचारासाठी फक्त १३ दिवस मिळणार असल्याने उमेदवार व प्रचारकांची दमछाक होणार आहे. १६ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असल्याने विदर्भात सर्वत्र प्रचाराला वेग आला आहे. बहुतेक सर्वच मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती अपेक्षित आहेत.

प्रचाराचा ज्वर चढू लागला
नागपूर, १ एप्रिल /प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागला असून यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. पक्ष आणि संघटनांनी मेळावे, सभा, पदयात्रा व जनसंपर्क मोहिमांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे.

बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर
नागपूर, १ एप्रिल/ प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आलोक बौद्ध विहारात सुखदेव वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर पार पडले. यावेळी केंद्रीय शिक्षक डी.डी. मोरे यांनी प्रशिक्षणार्थिना उद्बोधन केले. अनेकदा स्वत:च्या सुखासाठी इतरांची फसवणूक केली जाते. सम्यक समाज उभारण्यासाठी भोगवाद संपुष्टात आणणे गरजेचे आहे. मानवी कल्याणाचा संदर्भ दु:खी, कष्टींच्या उत्थानाशी निगडीत आहे. म्हणूनच ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ ही यंत्रणा तथागत गौतम बुद्धांनी भिक्खू, उपासक आणि अनुयायांना दिली. प्रशिक्षणानंतर बौद्धाचार्यानी त्याचा पाठपुरावा करावा, असे आवाहन यावेळी केले. जे.डी. रामटेके, जे.आर. गोडबोले, गजानन सूर्यवंशी, प्रा. डॉ. मुकुंद मेश्राम यांची भाषणे झाली.

मराठी गाण्यांच्या सुमधुर मैफलीने नववर्षांचे स्वागत
नागपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी

स्वरवेद व जायंट ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षांचे स्वागत मराठी गाण्यांच्या सुमधुर मैफलीने करण्यात आले. यावलकर सभागृहात आयोजित ‘केव्हा तरी पहाटे’ या मैफलीला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुढी उभारून ‘घनश्याम सुंदरा..’, ‘कानडा राजा पंढरीचा..’, ‘ऐरणीच्या देवा तुला..’, ‘राधा ही बावरी..’ अशी एकापेक्षा एक गोड गाणी स्वरवेदचे गायक कलाकार हिंडोल पेंडसे, अनुजा मेंघळ, विशाल देशपांडे, धनश्री देव यांनी सादर केली. यावेळी रवि सातफळे (तबला), सुनील चौधरी (गिटार), शशांक देशपांडे (बासरी), श्रीरंग उऱ्हेकर, परिमल जोशी (सिंथेसायझर), संजय उरकुंडे (ऑक्टोपॅड) यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे संचालन विक्रम मोरे यांनी केले.

रामटेकमधून चंद्रशेखर भिमटेंचा अर्ज दाखल
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी रामटेक लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन भीमशक्तीचे संघटक व कोळसा श्रमिक सभेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर भिमटे हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. यावेळी सिद्धार्थ कांबळे, चेतन मेश्राम, मनोज गोंडाणे, रितेश कालरा, सलीम सिद्दिकी, अहबाज खान, परवेज सिद्दिकी, राजेश गजभिये, मुकेश कांबळे, रमेश भिमटे, मोहम्मद अबदान, बाबु रहमान आदी उपस्थित होते.

ऑलिम्पियाड परीक्षेत अव्दैत सोहनीचे यश
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी
अखिल भारतीय ऑलिम्पियाड परीक्षेत कुर्वेज ई-पाठशाळेचा विद्यार्थी अद्वैत शशांक सोहनी याने गणित विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याने शाळेतून प्रथम, शहरातून आठवे तर राज्य पातळीवर १६७वे स्थान प्राप्त केले. अद्वैत शिक्षक सहकारी बँकेच्या देवनगर शाखेचे व्यवस्थापक शशांक सोहनी यांचा मुलगा असून जनसंघ व भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यां सुधा सोहनी यांचा नातू आहे. यशाचे श्रेय तो आई-वडील व शिक्षिका सुचिता पिल्लई यांना देतो.

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाची प्रचार यंत्रणा सज्ज
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे. सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम बिरकड यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निरीक्षकांची नियुक्ती अलीकडेच केली. भंडारा-गोंदिया- नामदेव कडुकार, बुलढाणा- सुधाकर हेमके, अमरावती- गणेश जयस्वाल, अकोला- रत्ना सोळंके, वर्धा- मोहिनी चांभारे, रामटेक- राजू हिंदुस्तानी, नागपूर- सुनीता नाशिककर, गडचिरोली-चिमूर- बाबा हाशमी, चंद्रपूर- देविदास रामटेके आणि यवतमाळ-वाशीम- दीपक गोल्डे हे विदर्भातील निरीक्षक आहे. सर्व निरीक्षकांनी तात्काळ निवडणुकीच्या कामाला लागावे, असे निर्देश राष्ट्रीय संघटक डॉ. धनुस्कर आणि प्रदेश प्रशिक्षण प्रमुख जानबा म्हस्के यांनी दिले आहे.

कमलताई परांजपे यांना श्रद्धांजली
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

बाल मंदिर संस्थेच्या आद्य संस्थापिका व संचालिका कमलताई परांजपे यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित वक्तयांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. बाल मंदिर संस्थेतर्फे धरमपेठ शाळेच्या प्रांगणात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ समाजसेविका लीलाताई चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या श्रद्धांजली सभेत बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे, शांता कोठेकर, नलिनीताई दाणी यांनी कमलताईंच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलु उलगडून श्रद्धांजली वाहिली. सर्व वक्तयांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. या सभेला आप्तस्वकीय, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कमलताईंच्या अनेक छायाचित्राच्या साहाय्याने त्यांच्या जीवनातील अनेक संस्मरणीय क्षणाचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला.