Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
नवनीत

जी व न द र्श न
मृत्यू आणि पाप

 

शरीर दिवसेंदिवस थकत जातं. वार्धक्य खुणावू लागतं. इंद्रियं निकामी होऊलागतात. तरीही माणूस मोहनिद्रेतून जागा होत नाही. मृत्यू जवळ आला आहे याची जाणीवही होत नाही. हे माझं माझं, म्हणत सतत तो संसारात गुंतत जातो. एवढेच नाही तर पैसा कसा मिळवावा- तो मिळवण्यासाठी अनेक युक्त्या-प्रयुक्त्या, लबाडय़ा करत राहतो. महावीरांनी म्हटलंय -
जरा जाव न पीडेइ, वाही जाय न वड्ढइ।
जाविंदिया न हायंति, ताव धम्मं समायेर।।

जोपर्यंत वृद्धत्व त्रास देत नाही, छळत नाही, रोगाची वृद्धी होत नाही, त्यांचा प्रादुर्भाव होत नाही, अवयव शक्तिहीन, दुर्बल होत नाहीत तोपर्यंत धर्माचरण करावे.
महानुभावानो धर्माने जीवनव्यापी असे हे सत्य सांगितले आहे. धर्माचरण म्हणजे वृद्धापकाळी वेळ घालवण्याचे साधन नसून ती एक साधना आहे. आचार्य सभागृहाला उद्देशून बोलत होते. ते म्हणाले की, पापापासून दूर राहण्याची एक युक्ती तुम्हाला सांगतो. ही कथा ऐका-
साधक आपल्या गुरूंना म्हणाला,‘‘संसारात राहून माणसाला अनेक पापं करावी लागतात. त्या पापांपासून मी दूर कसा राहू?’’ गुरू म्हणाले,‘‘मला ज्योतिष समजतं. बाकी सगळे प्रश्न बाजूला राहू देत. सगळी आवराआवर कर. कारण आठ दिवसांनी तुझा मृत्यू होणार आहे.’’ शिष्य गुरूभक्त होता. घरी येऊन त्याने सगळा कारभार निपटायला सुरुवात केली. देणे- घेणे संपवले. दानधर्म केला. मृत्यूनंतर कुठे दान द्यायचे, कुठल्या संस्थेतल्या मुलांना जेवण द्यायचे, आपलं धन कसं-कुणाकुणात वाटायचं हे सर्व ठरवलं. लिखापढी झाली. आठव्या दिवशी गुरूच शिष्याकडे आले. म्हणाले,‘‘वत्सा सांग, या आठवडय़ात तुझ्याकडून किती पापे झाली?’’ शिष्य म्हणाला,‘‘पापं कसली करतो! समोर मृत्यू उभा असताना!’’ गुरू हसले. म्हणाले,‘‘पुढच्या क्षणी मृत्यू आहे असं समजून माणसाने जगावे. आपोआप पापं दूर जातील.’’
लीला शहा

कु तू ह ल
खग्रास सूर्यग्रहण
खग्रास सूर्यग्रहणाची काय वैशिष्टय़े आहेत?

खग्रास सूर्यग्रहण हा निसर्गाचा एक अप्रतिम आविष्कार आहे. अगदी ९९ टक्के सूर्यबिंब झाकलेलं खंडग्रास सूर्यग्रहण आणि खग्रास सूर्यग्रहण यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, तसेच खग्रास सूर्यग्रहण दूरचित्रवाणीवर पाहणं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं यातदेखील प्रचंड फरक आहे. खग्रास सूर्यग्रहण पृथ्वीवरून फारच छोटय़ा भूभागावरून पाहता येते. आपल्या गावामधून आपल्याला सरासरी ४१० वर्षांतून एकदाच खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळेल.चंद्रबिंबाला सूर्यबिंबाचा स्पर्श होऊन ग्रहणाला सुरुवात होते. सूर्यिबब जसजसं झाकलं जाऊ लागतं, तशी सूर्याची सुरेख कोर दिसू लागते. हळूहळू वातावरणात आश्चर्यकारक बदल होऊ लागतात. आसमंतात काळोखी दाटू लागते. सभोवतालचं तापमान कमी होऊलागतं. पक्षी-प्राणी गोंधळतात. अचानक भरदिवसा पडू लागलेल्या अंधारामुळे प्राणी व पक्षी सैरभैर होतात. पक्षी घरटय़ांकडे परतू लागतात. प्राणी विचित्र ओरडू लागतात. काही वनस्पतींची पाने मिटू लागतात. आजूबाजूला होत असलेल्या बदलांमुळे आपल्यावरही एकप्रकारचं दडपण येऊलागतं.
सूर्याची कोर आता अगदी बारीक होते. त्याबरोबरच जमिनीवर ‘छायापट्टे’ सर्पनृत्याप्रमाणे नाचू लागतात. हे सर्व क्षणभराकरता होतं. चंद्रबिंबाच्या परिघावरील दऱ्यांमधून येणाऱ्या प्रकाशकिरणांमुळे तेथे तेजस्वी ‘मण्यांची माळ’ दिसते. क्षणार्धात शेवटचा प्रकाशकिरण आपल्याला हिऱ्याच्या अंगठीचं दर्शन देतो. पुढच्या क्षणाला पूर्णपणे ‘काळय़ा’ झालेल्या सूर्याभोवती प्रभामंडल (करोना) दिसू लागतं. सूर्यग्रहणाचा हा परमोच्च बिंदू! यालाच एका ग्रहण निरीक्षकानं ‘स्वर्गीय डोळा’ असं म्हटलं आहे. काही काळानंतर चंद्रबिंब पुढे सरकतं आणि पुन्हा हिऱ्याची अंगठी, मण्यांची माळ, छायापट्टे व सूर्याची कोर या क्रमाने ग्रहण घटना पाहायला मिळतात. अखेरीस ग्रहण संपतं.
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
टी. बी. कुन्हा

गोवा मुक्ती चळवळीचे रणझुंजार नेते कुन्हा त्रिस्ताव ब्रागांझा यांचा जन्म २ एप्रिल १८९१ रोजी साश्टीजवळील चांदर गावात झाला. पाँडेचरीच्या फ्रेंच कॉलेजातून बी.ए.ची पदवी मिळवल्यावर पॅरिसमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी संपादन केली. या काळात महात्मा गांधींचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. फ्रेंच वृत्तपत्रांतून ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीविषयी लेख लिहीत असत. भारतात परतल्यावर त्यांनी १९२८ च्या सुमारास ‘गोवा काँग्रेस कमिटी’ या समितीची स्थापना केली. त्यावेळेस गोव्यातील लोकांना मजुरीच्या निमित्ताने आसामच्या चहाच्या मळय़ात गुलामासारखे राबवत. या विरोधात आवाज उठवून त्यांची गुलामगिरीतून सुटका केली. १९४६ च्या सुमारास त्यांनी ‘गोवन यूथ लीग’ या संस्थेची स्थापना केली. अखेर राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक होऊन आठ वर्षांची काळय़ा पाण्याची शिक्षा झाली. पुढे गोव्यातून त्यांना हद्दपार करण्यात आले. तेव्हा ते मुंबईत आले. तेथूनच त्यांनी आपल्या ‘गोवन यूथ लीग’ची सूत्रे हलवली. १९५५ चे दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामाचे ते एक मार्गदर्शक होते. ‘आझाद गोवा’ आणि ‘फ्री गोवा’ ही नियतकालिके त्यांनी चालवली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या लेखांचे ‘गोवा फ्रीडम स्ट्रगल’ नावाचे पुस्तक ऐतिहासिक संदर्भसाहित्य म्हणून गणले जाते. शांततेच्या कार्यासाठी त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन जागतिक शांतता कौन्सिलद्वारे त्यांना मरणोत्तर सुवर्णपदक दिले. १९८४ साली गोवा सरकारकडून त्यांच्या कार्याचा मरणोत्तर गौरव करण्यात आला. त्यांचा मृत्यू २६ सप्टेंबर १९६८ रोजी मुंबईत झाला. १९८६च्या सुमारास गोवा सरकारने मुंबईत असलेल्या त्यांच्या अस्थी पणजी शहरात आणून त्यावर त्यांचे स्मारक उभारले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
पैशांचा वापर

भार्गवीची बारावीची परीक्षा संपली. वर्षभर परीक्षा आणि अभ्यास याशिवाय तिने कशाचाच विचार केला नव्हता. परीक्षा संपल्यावर मात्र सगळं दडपण एकदम हलकं झालं. तिचे मित्र आणि मैत्रिणी सगळय़ांची अगदी अशीच मन:स्थिती होती. त्यांनी विचार केला की, आता भटकूया, पिक्चर पाहूया, बाहेर खाऊया, धम्माल करूया! सगळय़ांनी एक पिक्चर निवडले. दुपारच्या शोला जायचा असा बेत ठरला. सकाळपासून तीन-तीन वेळा भार्गवीने आई-बाबांना सांगितले, आजीला सांगितले, ‘आज किनई आम्ही सगळेजण खूप धम्माल करणार आहोत. खूप दिवसांपासून आम्ही ठरवले होते की, परीक्षा झाली की, अगदी फुल टू धम्माल करायची.’ तिच्या अभ्यासू वृत्तीचे, वर्षभर तिने केलेल्या श्रमांचे घरी सगळय़ांनाच कौतुक वाटायचे. ती मजा करायला जाणार म्हटल्यावर बाबांनी पैसे काढून दिले. आईने कपाटातून नोटा काढून प्रेमाने दिल्या. आजीने तिच्या गालावरून हात फिरवत, ‘घे बाळ तुला. जा गंमत करा!’ म्हणत तिच्या ट्रंकमधून पैसे काढून दिले. भार्गवी म्हणत राहिली, ‘अगं, कशाला आणखी पैसे? माझ्याकडे आहेत.’ ठरल्याप्रमाणे सगळे ‘आकाशदीप’ मल्टिफ्लेक्सला पिक्चर पाहायला दुपारी जमले. भार्गवीला मात्र निघायला जरा उशीर झाला. तिच्या लाडक्या ‘खुशी’ कुत्रीला अंघोळ घालण्याचा समारंभ जरा जास्तच लांबला त्या दिवशी! ११चा मॅटिनी शो होता. पंधरा मिनिटे आधी ती धावत-पळत थिएटरवर पोहोचली ती ‘सॉरी.. सॉरी.. रागावू नका’ करतच. अश्विन म्हणाला,‘‘तुझी वाट पाहून मी तिकिटे काढली बरं का!’’ संध्या म्हणाली,‘‘जरा महागच आहेत तिकिटे. एवढे मॅटिनीला येऊन फार काही फरक नाही पडला.’’ ‘हो ना, दीडशे रुपये प्रत्येकी असा दर आहे इथे,’ मीनल म्हणाली. ‘अरे, मग कशाला काढलीत एवढी महाग तिकिटं?’ भार्गवी डोळे मोठ्ठे करून म्हणाली. ‘त्यापेक्षा एक मस्त आयडिया सांगते. आपण ही तिकिटे विंडोवर देऊन टाकूया. त्याऐवजी ४० रुपयांत सीडी घेऊन घरी बसून मस्तपैकी पिक्चर पाहूया आणि शेवाळे मॅग्नम मॉलमध्ये जाऊ. भटकू आणि मोमोज, चायनिज किंवा एसपीडीपी ज्याला जे आवडेल ते खाऊया.’ सगळय़ांनाच कल्पना पसंत पडली. सगळा चमू आनंदात तिकिटे परत करून पैसे घेऊन बाहेर पडला. खर्च करण्यासाठी आता प्रत्येकाकडे बऱ्यापैकी पैसे होते. अंधार पडला. भार्गवी मैत्रिणींना, मित्रांना, ‘अच्छा’ म्हणून घरी परतली. आई टीव्ही पाहात हॉलमध्ये बसली होती. तिने विचारले, ‘काय मजा केली का?’ भार्गवी हसत म्हणाली, ‘अगं खूप खूप धमाल केली आम्ही आणि हे बघ तुम्ही दिलेल्या पैशांमधले बरेच पैसे वाचवून परत आणलेत. हे घे!’ आई चकित होऊन पाहातच राहिली. पैसे ही सांभाळून वापरण्याची गोष्ट आहे. उधळण्याची नाही. जिथे एक रुपयात काम भागेल तिथे दहा रुपये खर्च करणे हा उधळेपणा आहे. आजचा संकल्प - मी पैशांची उधळमाधळ करणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com