Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

इतिहास बदलू पाहणारा कवी
‘सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण झालेलं गढुळलेपण दूर करण्यासाठी मी

 

निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे आणि हा निर्णय जाहीर केल्यावर मिळालेल्या प्रतिसादाने भारावून गेलो आहे’, असे डॉ. यशवंत मनोहर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
मराठी साहित्याच्या क्षेत्रात यशवंत मनोहर यांनी एक कवी आणि समीक्षक म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही आणि हे पीक आम्ही आसवांवर काढले’ अशा शब्दात सामाजिक विषमतेवर भेदक भाष्य करणारा कवी, आंबेडकरी विचारांची समाजभिमुख चिकित्सा करणारा समीक्षक, विद्यार्थ्यांना डोळसपणे घडवणारा शिक्षक, अनेकांच्या लेखनांना प्रेरणा देणारा मार्गदर्शक, सामाजिक लढय़ात सक्रिय सहभागी होणारा विचारवंत अशा विविध पैलूंनी मनोहरांचे व्यक्तिमत्त्व सजलेले आहे. अशा या बहुधांगी पैलूंसह गढुळलेलं सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण स्वच्छ करण्यासाठी मनोहर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनेक डाव्या आणि पुरोगामी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
बाहेर उन्ह जिवाची काहिली वाढवत असताना मनोहर नातवाशीही संवाद साधत ठाम शीतलतेने वावरत बोलत होते. ‘मी निवडणूक लढवणार असल्याची बातमी ‘लोकसत्ता’नी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि प्रतिसादाचे ओझे जड झाले. कुठून कुठून फोन आले, अजूनही येताहेत, कोणी पैसे पाठवतोय, कोणी प्रचाराला येण्याचं वचन देतोय. खरं सांगायचं तर या प्रतिसादाने हळवाही झालो आहे काहीसा..’ यशवंत मनोहर सदगदत्या स्वरात सांगतात.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या लोकशाहीच्या पवित्र मार्गावरच मी चालणार आहे निवडणूक लढवताना’, असा उच्चार करून मनोहर पुढे सांगतात, ‘मी कोणालाही पैसे देणार नाही, दारूची बाटलीही देणार नाही, अन्य कोणतीही भेटवस्तू देणार नाही, प्रचाराचा आवाका आणि खर्चही मोठा आहे हवंतर लोकांनीच पैसे द्यावे आणि मत तर द्यावंच.’
निकालाचं काही टेन्शन नाही तुम्हाला? या प्रश्नाला उत्तर देताना यशवंत मनोहर म्हणाले, ‘यशाने हुरळून जावे आणि अपयशाने खचून जावे अशा वयातच मी नाही मुळी. माझा निवडणुकीतला जय जनतेचा असेल आणि पराभवही जनतेचाच असेल. प्रामाणिकपणे प्रयत्न करणे माझ्या हाती आहे, ते मी करणार.’
पराभवाचे भय नाही वाटत? या प्रश्नावर ताडकन यशवंत मनोहर उत्तरले, ‘पराभवाच्या भीतीने न लढणारे रणछोडदास असतात, मध्यमवर्गीय बुद्धिवंत लढत नाहीत, तशी वेळ आली की रण सोडतात अशी टीका होते. मी रणछोडदास थोडीच आहे? आता स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या आणि संवेदनशील समजणाऱ्या मतदारांनी कोणासोबत जायचं, याचा निर्णय घ्यायचा आहे’, जबाबदारीचे ओझे या शब्दात मनोहर मतदारांवरच टाकून मोकळे होतात. एक मोठ्ठा पॉझ घेऊन तेच परिचित हसू चेहऱ्यावर पसरवत मनोहर पुढे म्हणाले, ‘विजयाची खात्री आहेच मला, मतदारांच्या समंजसपणावर, उमेदवार पारखण्याच्या नीर-क्षीर-विवेक बुद्धीवर विश्वास आहे माझा.’
स्टार टीव्हीवरच्या कार्यक्रमात उमेदवारांच्या समर्थकांनी घातलेल्या गोंधळाचा आणि त्यातून नागपूरच्या झालेल्या नाचक्कीचा विषय निघाला तर यशवंत मनोहर म्हणाले, ‘शब्दांच्या जागी अपशब्द निघाले यावरूनच वातावरण किती गढुळले आहे आणि ते कोणी गढुळवले आहे हे दिसले. हेच गढुळलेपण दूर करण्यासाठी मी उभा आहे. अपशब्दाच्या जागी तलवारी निघण्याआधीच हे सर्व थांबवायला हवं आपण.’
एक कवी, समीक्षक, विचारवंत असा जिद्दीने निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. सुबुद्ध म्हणवून घेणाऱ्या समाजाने याआधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कविश्रेष्ठ सुरेश भट, विठ्ठल वाघ, सुधाकर गायधनी, ज्ञानेश वाकुडकर (वाकुडकर याही निवडणुकीत आहेतच) या कवींच्या झोळीत विजय टाकला नसल्याचा इतिहास आहे. तरीही जिद्दीने आणि काहीशा बेडरपणे यशवंत मनोहर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, साहित्यिकांच्या पराभवाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी. हा इतिहास बदलण्यासाठी यशवंत मनोहर यांना शुभेच्छा आणि त्यांच्या या धाडसाला सलाम!
प्रवीण बर्दापूरकर