Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राजकीय पक्षांमध्ये आता ‘मोबाईल वॉर’
नागपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी

प्रसारमाध्यमांद्वारे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणे ही कंपन्यांची क्लुप्ती आता राजकारण्यांना

 

सूचू लागली आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत अत्याधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राजकीय पक्षांचा कल राहतो. यंदाही याच प्रकारचे चित्र बघावयास मिळत असून लोकसभा निवडणुकांना अजून अवकाश असला, तरी राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांमधील ‘एसएमएस वॉर’ला सुरुवात झाली आहे.
सध्या प्रत्येक वयोगाटातील नागरिकाकडे मोबाईल असणे अगदी सर्वसामान्य बाब झाली आहे. त्यातच मोबाईलवरून एसएमएसची देवाणघेवाण हा मोबाईल कंपन्यांच्या व्यवसायातील सर्वात महत्वाचा घटक असतो. नेमकी हीच बाब हेरून राजकीय पक्षांनी आता मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी एसएमएस तंत्रज्ञानाचा वापर करणे सुरू केले आहे. त्यामुळे आता दिवसभरातून एकदा तरी सर्वच प्रमुख राजकीय पक्षाचा किवा त्यांच्या उमेदवाराचा एसएमएस येणे प्रत्येकासाठी नित्याचेच झाले आहे. राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींबरोबरच त्यांचे कार्यकर्तेही परिचितांना एसएमएस करताना दिसून येत आहेत. यासाठी राजकीय पक्षांनी अनेक मोबाईल कंपन्यांसोबत करार केला असून त्याद्वारे ग्राहकांना एसएमएस पाठविण्याचे कार्य सुरू आहे. राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रीय स्तरावरच एसएमएस युद्ध सुरू आहे, असे नाही तर शहरातील उमेदवारांमध्येही एसएमएस युद्ध सुरू आहे.
शहरात काँग्रेसचे विलास मुत्तेमवार हे यंदा लोकसभेवर सातव्यांदा निवडून जाण्यासाठी िरगणात आहेत. तर तीनवेळा खासदार राहिलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना आव्हान दिले आहे. याचबरोबर इतर राजकीय पक्षांचे उमेदवारही रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमध्ये व पक्षांमध्ये प्रचारासाठी एसएमएस युद्ध सुरू आहे. मुत्तेमवार यांनी खासदार असताना मिहान, गोसीखुर्द प्रकल्प, नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत केलेली कामे याची माहिती एसएमएसद्वारे पोहचविण्याचे कार्य सुरू आहे. तर ‘काँग्रेस की जय हो’ अशा स्वरुपाचे एसएमएसही आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी पाठविण्यात येतेआहेत.
बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून ‘व्होट फॉर बीजेपी’ या प्रकारचा एसएमएस येत आहे. तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांचा ‘स्वीस बँकेत भारतीय नागरिकांचे २५ लाख कोटी रुपये आणण्यासाठी भाजप कटीबद्ध आहे’ असे एसएमएस सध्या सर्वच मोबाईल धारकांना पाठविण्यात येत असल्याचे चित्र आहे. याशिवाय राजकीय पक्षांकडून इतरही विविध प्रकारचे एसएमएस मतदारांना पाठविण्यात येत आहेत. गेल्यावेळी भाजपच्या वतीने मतदारांना ‘मै अटल बोल रहा हू’ या प्रकारचे दूरध्वनी करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यंदाही सर्वच पक्षांकडून या प्रकराचे दूरध्वनी येत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रचारसभा आणि दौऱ्यांबरोबर एसएमएस वॉरही जोरदार सुरू आहे.