Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नॅनो’ नागपुरात
नागपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी
आजपासून ‘टेस्ट ड्राईव्ह’
९० ग्राहकांची नोंदणी
सर्वसामान्यांची नॅनो कार कधी येणार.. बुकिंग कधी सुरू होणार.. सुरुवातीला किती रुपये भरावे

 

लागणार.. यासारख्या प्रश्नांना उत्तरे देऊन कंटाळलेल्या टाटा मोटर्सच्या शोरूमधारकांनी अखेर आज सुटकेचा निश्वास सोडला. दहा दिवसांपूर्वी बाजारात सादर झालेल्या नॅनोचे आज दहाव्या दिवशी नागपूरकरांना प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यामुळे टाटाच्या वाहनांच्या शहरातील दोन प्रमुख शोरुम्समध्ये नागरिकांनी सकाळपासूनच ही कारला जवळून पाहण्यासाठी गर्दी केली होती.
बहुप्रतीक्षित ‘टाटा नॅनो’ नागपुरात दाखल झाल्याने कार घेण्याचे अनेक मध्यमवर्गीयांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. सुरुवातीला फक्त मुंबईकरांना कंपनीने ‘टाटा नॅनो’चे दर्शन घडवले होते. आज कंपनीने टाटाच्या देशभरातील सर्व शोरुम्स व अधिकृत विक्रेत्यांकडे कारचे मॉडेल उपलब्ध करून दिले. नागपूरला घाट रोडवरील ए.के. गांधी यांच्या शोरुममध्ये आजच ‘नॅनो’ प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. कंपनीने जाहीर केल्यानुसार ९ ते २५ एप्रिल दरम्यान सर्वसामान्यांना कारचे बुकिंग करता येणार आहे. मात्र, कंपनीने त्यांच्या ‘लकी ड्रॉ’ स्कीमनुसार पहिल्या १ लाख नॅनोसाठी आजपासूनच बुकिंग सुरू केले. त्यामुळे नॅनो नागपुरात आल्याची माहिती मिळताच कार बघण्यासाठी अनेकांनी शोरुममध्ये गर्दी केली. काहींनी बुकिंग सुरू असल्याचे कळताच नोंदणी शुल्क भरून ‘नॅनो’चे अ‍ॅडव्हान्स बुकींग करून टाकले.
शोरुममधील ‘नॅनो’ पाहून बाहेर निघणारे ग्राहक उत्साहात दिसत होते. ए.के. गांधी यांच्या शोरुममध्ये येणारा प्रत्येकजण कारबाबत सर्व माहिती अगदी बारकाईने विचारताना दिसून येत होता. ‘नॅनो’ची टेस्ट ड्राईव्ह उद्या, गुरुवारपासून सुरू होणार आहे. टाटा नॅनोचे बुकिंग स्टेट बँक ऑफ इंडिया, टायटन शोरुममध्येही होणार आहे. नॅनो नागपुरात दाखल झाल्यानंतर घाटरोडवरील ए.के गांधींच्या शोरुममध्ये सायंकाळपर्यंत ९० ग्राहकांनी नोंदणी केल्याचे शोरुमच्या व्यवस्थापकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
बुकींगनंतर ६० दिवसात टाटा मोटर्सतर्फे पहिल्या एक लाख मॉडेल्सच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. १ लाखात कारचे स्वप्न साकार होणार असल्याने आज नागपूरकरांमध्येही बुकींगबाबत उत्सुकता होती. पुढील काही दिवस टाटा व टायटनच्या शोरुममध्ये व स्टेट बँकांच्या शाखांमध्ये ग्राहक बुकींगसाठी गर्दी करतील, अशी अपेक्षा आहे.