Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

चार अपघातात तिघे ठार, चार जखमी वाडी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर थोराने ठार
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

कोराडी येथे बुधवारी दुपारी एका अपघातात वाडी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर थोराने ठार

 

झाले. ते मोटारसायकलने घरी परत येत असताना हा अपघात घडला. नागपूर शहर व ग्रामीणमध्ये चार अपघात होऊन त्यात तिघे ठार तर चार जखमी झाले.
छिंदवाडा मार्गावर कोराडी येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. चंद्रशेखर घनश्याम थोराने (रा. मारुती नगर वाडी) हे पल्सर मोटारसायकलने(एमएच ३१ एडब्लू ३६४२) कोराडीकडून वाडीला जात होते. कोराडी औष्णिक वीज केंद्र वसाहतीच्या प्रवेशद्वारातून आलेला एक तरुण रस्ता ओलांडत असताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ब्रेक लावल्याने मोटारसायकल घसरली आणि काही अंतरापर्यंत घासत गेली. चंद्रशेखर यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघात होताच तेथे गर्दी झाली. कोराडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव काटोले सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. त्यांनी चंद्रशेखर आणि जखमी झालेल्या शिवकुमार या दोघांना लगेचच मेयो रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोटारसायकल चालकाची बऱ्याच वेळाने ओळख पटली.
आमच्या वाडी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर थोराने यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच थोराने परिवारावर शोककळा पसरली. पंचायत समिती सदस्य नारायण थोराने यांचे चंद्रशेखर पुतणे आहेत. चंद्रशेखर वाडी युवक काँग्रेसचे तसेच यंग स्टार नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनीता गावंडे, बाबा आष्टनकर, वाडीचे सरपंच नरेश चरडे, सभापती प्रमिला पवार व अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. चंद्रशेखर यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, भाऊ व मोठा आप्तपरिवार आहे.
महिला ठार
वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. अयोध्यानगर ते साई मंदिर रस्त्यावर २३ मार्चला दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. विमल वामन शास्त्रकार (रा़ अयोध्यानगर) या भाजी घेण्यासाठी पायी जात असताना एका वाहनाने त्यांना धडक दिली. गंभीर अवस्थेत त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आल़े तेथे उपचार सुरू असताना २८ मार्चला रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या अनोळखी वाहन चालकाविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
खापा पोलीस ठाण्यासमोर मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ऑटो रिक्षाच्या धडकेने वृद्धेचा मृत्यू झाला. राधा मोतीराम भोदेकर हे मृत महिलेचे नाव आहे. ती पोलीस ठाण्यासमोर उभी असताना नवीन वस्तीकडे आलेल्या ऑटो रिक्षाने (एमएच ३१ बीबी ९४८) तिला धडक देत रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राधा व ऑटो रिक्षा चालक सुनील विनायक कवडे (रा. खापा) या दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना राधाचा मृत्यू झाला. खापा पोलिसांनी ऑटो रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
भाऊ-बहीण जखमी
परीक्षा देऊन घरीत परत जात असलेले बहीण-भाऊ ट्रकच्या धडकेने गंभीर जखमी झाले. कळमेश्वरजवळील ब्राह्मणी येथे काल मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. पल्लवी व प्रीतम पांढरीबांधे ही जखमींची नावे आहेत. पल्लवी आठवीत तर प्रीतम सहावीत प्रताप हायस्कुलमध्ये शिकतात. या दोघांची परीक्षा सुरू असून काल हे दोघे पेपर सोडवून सायकलने जिनिंग फॅक्टरीस्थित घरी जात होते. सावनेर रस्त्यावर सावनेरकडून कळमेश्वरकडे वेगात जात असलेल्या एमएच ०४ सीयू ८२७२ क्रमांकाच्या ट्रकने सायकलला धडक दिली. दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात होताच तेथे गर्दी झाली. गर्दीला पाहून ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या दोघा बहीण-भावाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच कळमेश्वर पोलीस तेथे पोहोचले.