Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मोठय़ा प्रकल्पात ९ टक्केच पाणी! १८ जलाशये कोरडी
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

नागपूर विभागातील मोठे जलाशय आतापासूनच कोरडे पडू लागल्याने पुढील दोन महिन्यात

 

नागरिकांना कधी नव्हे एवढय़ा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मोठय़ा जलाशयात ९ टक्के, मध्यम प्रकल्पात १० टक्के तर लघु प्रकल्पात फक्त ६ टक्के पाणी शिल्लक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
विभागातील सहा जिल्ह्य़ात एकूण १८ मोठे जलाशय असून यातील तीन प्रकल्प आताच कोरडे पडले आहेत. नागपूर जिल्ह्य़ातील कामठी (खैरी), गोंदिया जिल्ह्य़ातील कालीसरार आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील दिना प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. सर्वाधिक मोठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोतलाडोह जलाशयात आजच्या घडीला फक्त १३ टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्यावर्षी याच जलाशयात २७ टक्के पाणीसाठा होता. रामटेक जलाशयात ६ टक्के, नांदमध्ये एक टक्का आणि वडगाव धरणात फक्त १३ टक्के पाणी शिल्लक आहे. तोतलाडोहनंतर दुसऱ्या क्रमांकाच्या गोंदिया जिल्ह्य़ातील इटियाडोह जलाशयात फक्त ५ टक्के पाणी असून गेल्यावर्षी याच तारखेला ५० टक्के पाणी उपलब्ध होते.
गोंदिया जिल्ह्य़ातील सिरपूरमध्ये ८ टक्के, पुजारी टोलामध्ये ४ टक्के तर चंद्रपूर जिल्ह्य़ातील असोलामेंढा जलाशयात १३ टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच जलाशयात अनुक्रमे ४१, ३७ व ५७ टक्के पाण्याचा साठा होता. वर्धा जिल्ह्य़ातील बोर जलाशयात १२ टक्के, धाममध्ये २४ टक्के आणि पोथरामध्ये ९ टक्के पाणी उपलब्ध आहे. हीच स्थिती २००५ मध्ये आली होती.
मध्यम जलाशयाची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. नागपूर विभागात एकूण ३९ मध्यम जलाशये असून या जलाशयात फक्त १० टक्के पाणी शिल्लक आहे. नागपूर जिल्ह्य़ात एकूण १३ मध्यम स्वरुपाची जलाशये असून त्यात फक्त १० टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या जलाशयात ५३ टक्के पाणी उपलब्ध होते. भंडारा जिल्ह्य़ात चार जलाशये असून ही चारही जलाशये आताच कोरडी पडली आहेत. गेल्यावर्षी या जलाशयात ५ टक्के पाणी होते. यामुळे भंडारा जिल्ह्य़ाला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गोंदिया जिल्ह्य़ात एकूण ९ प्रकल्प असून त्यात फक्त ५ टक्के पाणी आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ाची स्थिती काहीशी बरी आहे. या जिल्ह्य़ातील ८ प्रकल्पात १२ टक्के पाणी उपलब्ध आहे. वर्धा जिल्ह्य़ात ५ प्रकल्प असून त्यात ३१ टक्के पाणी आहे. वर्धा जिल्ह्य़ाची स्थिती समाधानकारक दिसून येते. गडचिरोली जिल्ह्य़ात मध्यम स्वरुपाचा एकही प्रकल्प नाही.
विभागातील लघु जलाशयांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. विभागात एकूण ३०९ प्रकल्प असून त्यात आजच्या घडीला फक्त ६ टक्के पाणी शिल्लक आहे. नागपूर जिल्ह्य़ातील ५९ तसेच गोंदिया जिल्ह्य़ातील ६० जलाशयात फक्त ७ टक्के तर भंडारा जिल्ह्य़ातील ६० आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील ८८ जलाशयात फक्त तीन टक्के पाणी आहे. येत्या पंधरा दिवसात हे जलाशय कोरडे पडण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील २२ जलाशयेही कोरडी पडली आहेत. वर्धा जिल्ह्य़ातील लघु जलाशयांची स्थिती समाधानकारक आहे. या जिल्ह्य़ातील २० प्रकल्पांत १६ टक्के पाणी शिल्लक आहे. विभागातील वर्धा जिल्हा सोडला तर अन्य जिल्ह्य़ांची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.