Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रचारासाठी केवळ १३ दिवस; उमेदवारांची होणार दमछाक
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या, गुरुवारी अखेरचा दिवस आहे. प्रचाराला

 

जोमाने सुरुवात झाली असली तरी, प्रत्यक्षात प्रचारासाठी फक्त १३ दिवस मिळणार असल्याने उमेदवार व प्रचारकांची दमछाक होणार आहे.
१६ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असल्याने विदर्भात सर्वत्र प्रचाराला वेग आला आहे. बहुतेक सर्वच मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती अपेक्षित आहेत. उन्हाच्या तडाख्यात प्रचारकांना प्रचार तोफा सांभाळाव्या लागतील. पदयात्रांच्या माध्यमातून ‘वारे पंजा आ गया पंजा’, ‘वारे घडी आ गयी घडी’, ‘वारे कमल आ गया कमल’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘बहेनजी के सम्मान मे बीएसपी मैदान में’ याशिवाय ‘आगे बढो’, ‘जिंदाबाद’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्याचे काम प्रचारक करत आहेत. ऑटोरिक्षा, सायकल रिक्षावर ध्वनिक्षेपक लावूनही प्रचार सुरू झाला आहे.
विदर्भात भौगोलिकदृष्टय़ा नागपूर वगळता सर्वच मतदारसंघ बरेच मोठे आहेत. भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम, वर्धा आणि चंद्रपूरसारख्या मतदारसंघातील उमेदवारांना चक्क दुसऱ्या जिल्ह्य़ात जावे लागते. यामुळे अशा मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन वेगळे आहे. बहुतेक प्रमुख उमेदवारांनी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघात आणि सर्व तालुका मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे.
निवडणुकीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रचार साहित्य. फलक, पत्रके, बिल्ले, लहान प्लास्टिकची पक्षचिन्हे यांना कार्यकर्त्यांकडून मोठी मागणी होताना दिसत आहे. साहित्य वाटपासाठी प्रमुख उमेदवारांचे खंदे समर्थक नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीत कार्यकर्त्यांची नाराजी परवडणारी नसल्याने त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. प्रमुख कार्यकर्त्यांचे निवासस्थान, लहान सभागृहे आदी ठिकाणी अशा कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रचारात माघार होऊ नये यासाठी वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांना वाहने देण्यात आली आहेत. सर्वाधिक भर सुमोवर आहे. ही बडदास्त ठेवताना वॉर्ड आणि गावातील मतदारयाद्या देण्यास उमेदवारांचे खंदे समर्थक विसरत नाहीत, हे विशेष.
देवरीपासून ते सिंदखेड राजापर्यंत प्रचाराचा धुमधडाका दिसून येतो. पदयात्रा, तसेच गाव, वॉर्डातील प्रमुख नेते किंवा समाजाच्या नेत्यांशी चर्चा आणि लहान सभांवर सध्या भर देण्यात आला आहे. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा दिनक्रमही बदलला आहे. सकाळी सहा वाजतापासून प्रचाराचे नियोजन सुरू झाले आहे. सकाळी साडे सात वाजेपर्यंत प्रचारक व कार्यकर्त्यांना पदयात्रा किंवा छोटेखानी सभा स्थळी जमावे लागते. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पदयात्रा, जाहीर सभा, नंतर मतदारांशी थेट संवाद आणि सायंकाळी परत पदयात्रा व सभांवर भर देण्यात येत आहे. रात्री १० वाजतानंतर खबलते करण्यात नेते मंडळी व्यस्त झाली आहेत.
नागपुरात काँग्रेसचे विलास मुत्तेमवार, भाजपचे बनवारीलाल पुरोहित आणि बसपचे माणिकराव वैद्य यांच्या प्रचारास वेग आला आहे. तिन्ही उमेदवार आणि त्यांचे प्रचारक पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत मतदारांशी संपर्क साधत आहेत. वैद्य यांच्या लहान सभा सुरू आहेत तर मुत्तेमवार यांनी पदयात्रांवर भर दिला आहे. पुरोहित यांनी सर्व १३६ वॉर्ड पिंजून काढले व त्यांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू झाला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघ गोलाकार असून भौगोलिकदृष्टय़ा बराच मोठा आहे. काँग्रेसचे मुकुल वासनिक, शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांचाही प्रचार जोमात चालला आहे. प्रा. कवाडे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क ठेवला आहे. वासनिक यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनीही प्रत्येक तालुक्यात सभा घेऊन गावातील प्रमुख नेते व समाजातील नेत्यांशी चर्चा केली. या दोघांच्या तुलनेत तुमाने थोडे मागे आहेत. सेनेने त्यांची उमेदवारी बरीच उशिरा जाहीर केली. गेल्या चार दिवसांपासून त्यांनीही मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे.