Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सदरमध्ये व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

एका चुना व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरणाच्या वृत्ताने सदर परिसरात खळबळ उडाली आहे.

 

अपहरण झालेला तरुण ‘सीए’चा विद्यार्थी असून त्याला एक बंगला खरेदी करावयाचा होता. त्याबाबत त्याचे काही लोकांशी बोलणेही झाले होते. काल दुपारी तो घरी असताना दोघे मोटारसायकलवर आले. त्यांच्यासोबत तो निघून गेला. काहीवेळाने त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर एक कॉल आला. तुमच्या मुलाचे अपहरण केले असून १ कोटी रुपये लागतील, पोलिसांना सांगितले तर जिवे ठार मारू, अशी धमकी बोलणाऱ्याने दिली. त्यानंतर बराचदा कॉल आले.
अपहरण झालेल्या मुलाच्या मोबाईलवरून आलेल्या कॉलवर बोलणाऱ्याने १५ लाख रुपये मागितले. या प्रकाराने तरुणाच्या वडिलांना धक्काच बसला. या तरुणाच्या वडिलांचा राजुरा परिसरात चुन्याचा व्यवसाय आहे. तरुणाच्या अपहरणाच्या वृत्ताने सदर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुठलीच तक्रार आली नसल्याचे सदर पोलिसांनी सांगितले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनूपकुमारसिंह यांच्याशी संपर्क साधला असता यासंदर्भात उद्या बोलू, असे ते म्हणाले.