Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नागपुरातील काँग्रेसमधील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार आणि वस्त्रोद्योगमंत्री अनीस अहमद, गृह राज्यमंत्री नितीन

 

राऊत व माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी या नेत्यांमधील मतभेद संपुष्टात आणण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या तिघांचीही समजूत काढून ‘पॅच अप’ करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे.
नागपुरातील वाद मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात गेला. हा वाद मिटावा यासाठी आधीही बरेच प्रयत्न झाले. पण, आता निवडणुकीत पक्षाला फटका बसू नये म्हणून उभय नेत्यांनी आज पुढाकार घेतला. विलास मुत्तेमवार यांच्या एकाही प्रचार सभेत अद्याप उपस्थित न राहिलेले अनीस अहमद, नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्याशी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी बुधवारी मुंबईत चर्चा केली.
चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. सकाळी टिळक भवनमध्ये आणि सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षां’ बंगल्यावर ही चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाली. नाराजी आणि मतभेद होते, ते दूर करण्याचा प्रयत्न केला. पक्ष म्हणून सर्वानी एकत्र असले पाहिजे, असे सांगून त्यांची समजूत काढली. अद्याप पूर्णत नाराजी आणि राग दूर झालेला नसला तरी, निश्चित तो दूर होईल. निवडणुकीत सर्व एकत्र काम करतील, असा दावा माणिकराव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. येत्या ३ एप्रिलला नागपुरात परत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.