Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मध्यवर्ती कारागृहात हिंदी-मराठी गीतांचे स्वर उमटले
नागपूर, १ एप्रिल/ प्रतिनिधी

मध्यवर्ती कारागृहाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर सभागृहात ‘ओल्ड इज गोल्ड ग्रुप ऑफ

 

म्युझिक’द्वारा भजन संध्या हा भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कारागृहाचे अधीक्षक एस.व्ही. खटावकर यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उपअधीक्षक मिश्रा, वरिष्ठ तुरुंग अधिकारी प्रमोद वाघ सर्व सहकाऱ्यांसह कार्यक्रमात उपस्थित होते.
जुन्या-नव्या, हिंदी-मराठी भक्तीगीतांच्या भजनसंध्येत सुरेश धुंडे यांनी ‘श्रीराम चौपाई’, ‘राम नाम अति मिठा है’, ‘देहाची तिजोरी’, ‘रंगदे चुनरिया’ इत्यादी एकाहून एक सरस भजने गावून वातावरण भक्तीमय केले. धुंडे यांच्यासोबत त्यांचे सहकारी सहगायिका नंदा राजोरिया यांनी ‘ज्योतीकलश छलके’, ‘तोरा मन दर्पण कहलाये’ त्याचप्रमाणे सुनीता दुपारे यांनी ‘कभी राम बनके’, तर बालगायिका अर्पिता अटाळकर हिने ‘केशवा माधवा’ इत्यादी भजने सादर करून श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली. वाद्यवृंदात तबल्यावर प्रमोद बावणे, ढोलकीवर अक्षय श्रीकोंडवार, ऑक्टोपॅडवर प्रकाश निमगडे व गिटारवर राहुल पंचभाई यांनी साथसंगत केली. मंगेश धुंडे यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले. अधिवक्ता अविनाश घरोटे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.
संचालन गोविंद साल्पे यांनी केले. तुरुंगातील सर्व अधिकारी कर्मचारी, शिक्षक दीपक सराफ, अंकुश ठेंगळे व बंदिवानांनी सहकार्य केले.