Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आदिवासींच्या झोपडय़ा उध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

शंकरनगरातील सुधार प्रन्यासच्या जागेवरील २६ आदिवासी कुटुंबीयांच्या झोपडय़ा उध्वस्त

 

करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे व या आदिवासी कुटुंबियांना त्याच जागेचे मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी झोपडी निर्मूलन गृह निर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष ललित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
गेल्या चाळीस वर्षांंपासून शंकरनगरातील सुधार प्रन्यासच्या जागेवर २५ आदिवासी कुटुंब राहत आहे. ही जागा त्यांना देण्याची तयारी शासनाने दाखवली होती. यासाठी संघटनेतर्फे वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. परंतु ३० मार्चला सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या संरक्षणात आदिवासींच्या झोपडय़ा तोडल्या. यावेळी झोपडपट्टीवासीयांनी मुलांच्या परीक्षा सुरू असल्याने काही दिवस वेळ मागितली. परंतु अधिकाऱ्यांनी या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याचेही पवार म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार न केल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आदिवासींची घरे उध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. ही मागणी येत्या दहा दिवसांमध्ये पूर्ण न केल्यास संपूर्ण आदिवासी समाज १६ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नियम ४९ (अ)चा वापर करून सर्व उमेदवारांना नाकारेल. यानंतरही मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला राजू मडावी, प्रदीप मसराम, विकास तुमडाम, मनीष उईके आदी उपस्थित होते.