Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे
अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन
अध्यक्षपदी कवी सुधाकर गायधनी यांची निवड
नागपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी

जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे २३ व २४ मे रोजी पाचवे अखिल भारतीय मराठा साहित्य

 

संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी सुधाकर गायधनी यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी या निवडीची घोषणा केली. यावेळी मराठा मार्गचे संपादक डॉ. प्रभाकर पावडे, ज्येष्ठ विचारवंत गंगाधर बनबरे, मार्गदर्शक दादासाहेब ठाकरे, परिषदेचे सचिव दिलीप चौधरी, विभागीय अध्यक्ष मधुकर मेहकरे, राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम कडू, संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुधान्शू मोहोड, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी सुधाकर गायधनी यांचे अभिनंदन केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून बाळासाहेब लुंगे यांची निवड करण्यात आली आहे. येत्या २२ मे रोजी एका भव्य शोभायात्रेद्वारे व साहित्य दिंडीच्या माध्यमातून या संमेलनाचा प्रचार करण्यात येईल. संमेलनात महाराष्ट्र व गोव्यातून नामवंत साहित्यिक व वक्ते मार्गदर्शन करतील. या संमेलनात ‘शिव शब्द गजर’ हा अभिनव प्रयोग कवितांच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येईल. संमेलनादरम्यान विविध प्रकाशनांच्या शेकडो पुस्तकांचे स्टॉल संमेलन परिसरात असतील, असे जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी कळवले आहे.