Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विदर्भात अधिकाधिक कोळसा खाणींची गरज -नरेश नारद
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

कोळसा हा ऊर्जेचा एक महत्वाचा स्त्रोत आहे. विजेच्या उत्पादनात कोळशाची अत्यंत महत्वाची

 

भूमिका असल्याने त्यापासून जास्तीत जास्त प्रमाणात वीजनिर्मिती करण्यासाठी कोल इंडियाकडून कंपन्यांना कोळसा पुरवला जातो. विदर्भात कोळशाच्या उत्पादनाला चांगला वाव आहे. त्यामुळे या भागात अधिकाधिक कोळशाच्या खाणी सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे अध्यक्ष नरेश नारद यांनी केले.
कामठी क्षेत्रातील इंदर ओपनकास्ट खाणीच्या उद्घाटनप्रसंगी नरेश नारद बोलत होते. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र गर्ग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर वेकोलिच्या वित्त विभागाच्या संचालक इरावती दाणी, तंत्र संचालक ओ.पी. मिगलानी, बी.के. सक्सेना, ओमप्रकाश आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोळशाच्या मागणीनुसार उत्पादन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी वेकोलिने प्रयत्न करावे, असे सांगून वेकोलिच्या विविध उपक्रमांसाठी नारद यांनी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कोळसा उत्पादनासाठी अनेकदा जमिनीचे अधिग्रहण हा सर्वात मोठा मुद्दा असतो. यासाठी शेतक ऱ्यांच्या जमिनींवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अनेकदा जमीन न मिळाल्यास उत्पादन वाढविण्यात अडथळे येतात, असे सांगून विजेच्या वाढत्या मागणीमुळे येत्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात कोळशाची गरज भासणार आहे, याकडे गर्ग यांनी लक्ष वेधले. येणाऱ्या काही दिवसात वेकोलि ३३ नवे प्रकल्प सुरू करणार आहे. यासाठी या भागातील कामगार व नागरिकांनी उत्साह दाखविला याबद्दल गर्ग यांनी सर्वाचे अभिनंदन केले. कर्मचारी, कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोल इंडियाने सर्व कुटुंबियांना आरोग्य आणि शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे ठरवले असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात तंत्र संचालक ओमप्रकाश यांनी इंदर ओपनकास्ट खाणीच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी सवरेत्कृष्ट कामगारांना पुरस्कार देण्यात आले.