Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सी.पी. अ‍ॅण्ड बेरार हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

रविनगरातील सी.पी. अ‍ॅण्ड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गुढीपाडव्याला माजी

 

विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या प्रहार विद्यालयातील प्रयोगशाळा आणि कलादालनाला दिवंगत सदाशिव मोहरीर आणि प्रमोद सदाशिव मोहरीर यांचे नाव देण्यात आले.
संस्थेच्या रविनगर शाखेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्षे म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त हा चवथा कार्यक्रम होता. स्नेहमिलन मेळाव्याचे आमंत्रक उपमुख्याध्यापक भाके यांनी वर्षभरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा सांगितली. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या काही सूचना असल्यास त्याही करण्याचे आवाहन केले. शाळेचे माजी विद्यार्थी श्रीकांत डोईफोडे, अतुल गाडगीळ, नरेंद्र टिपले आणि सुरुची अग्निहोत्री-नाईक यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ‘आर्कुट’ या वेबसाईटवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक दीपक गोखले यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त काढण्यात येणाऱ्या स्मरणिकेसाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन केले.
अरुण मोहरीर यांनी दहावीत मराठी आणि पदार्थविज्ञान या विषयांत प्रथम येणाऱ्यांसाठी प्रत्येकी ५,००० रुपये पारितोषिक जाहीर केले. यावेळी डॉ. दत्ता हरकरे आणि चमूने ‘आई’ हा संगीतमय भावपूर्ण कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब महाजन, सचिव अ‍ॅड. अशोक बनसोड, प्रहार विद्यालयाचे संचालक कर्नल सुनील देशपांडे, मुख्याध्यापिका टोंगे आणि संस्थेतील कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.