Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सुदूर संवेदन तंत्र व व्यवस्थेचा उपयोग विकासासाठी व्हायला हवा -डॉ. भेलकर
नागपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी

धनवटे नॅशनल कॉलेजमधील भूगोल विभागाच्यावतीने ‘सुदूर संवेदन तंत्र व भौगोलिक माहिती

 

पुरवणारी आधुनिक व्यवस्था यांचे कार्यान्वयन’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्राचा समारोप नुकताच झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रत्नाकर भेलकर व प्रमुख पाहुणे म्हणून दूरसंवेदन तंत्र संचालक डॉ. ए.के. जोशी, भूगोल विभाग प्रमुख डॉ. वंदना देशमुख उपस्थित होत्या.
सुदूर संवेदन तंत्र व व्यवस्था हा आंतरविद्याशाखीय विषय आहे. त्याचा संबंध नागरी योजना, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, पीक प्रारुपांशी आहे. सुदूर संवेदन क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग प्राणी, वनस्पती, पृथ्वी व मानवी समाजाच्या विकासासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन डॉ. रत्नाकर भेलकर यांनी केले. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या काळात सुदूर संवेदन महत्त्वाचे आहे. त्याचा स्नातक व स्नातकोत्तर पातळीवर अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. सुदूर संवेदन केंद्र महाराष्ट्रात व इतर प्रांतात असून अभ्यासकांनी त्याचा उपयोग करून घ्यायला हवा, असे मत डॉ. ए.के. जोशी यांनी मांडले. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाचा स्पध्रेत टिकण्यासाठी फायदा करून घ्यायला हवा, असे मत डॉ. वंदना देशमुख यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन व पाहुण्यांचा परिचय प्रा. आदिती थेरगांवकर व प्रा. वैशाली धाबेकर यांनी केले. डॉ. कल्पना देशमुख यांनी आभार मानले.