Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कुठल्याही बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची योजना विस्कळीत
नागपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी

रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशानंतर १ एप्रिलपासून कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कुठल्याही शुल्काविना

 

पैसे काढण्याची योजना सुरळीत कार्यान्वित न झाल्याचा अनुभव आल्याने अनेकांनी त्यांच्याच बँकांच्या एटीएममधून पैसे काढणे पसंत केले. ज्यांनी इतर एटीएममधून पैसे काढले त्यांना नेमके शुल्क किती किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने त्याबाबत महिन्याअखेरच कळणार आहे. मात्र, रिझव्‍‌र्ह बँकेच्या या नव्या सेवेबाबत ग्राहक मोठय़ा प्रमाणात उत्सुक असल्याचे दिसून आले.
गेल्या काही वर्षांत ग्राहकांकडून एटीएमचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात येऊ लागला आहे. मात्र, एका बँकेच्या एटीएममध्ये दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरल्यावर सेवा देणाऱ्या बँकेकडून सेवा शुल्क आाकरण्यात येत होते. अनेक बँकांमध्ये हे सेवा शुल्क २० ते ५० रुपयांपर्यंत होते. त्यामुळे अनेकदा दोन बँकांमध्ये करार असूनही ग्राहकांना सेवा शुल्क द्यावे लागत असे. मात्र, रिझव्‍‌र्ह बँकेने आज १ एप्रिलपासून सेवाशुल्क रद्द करण्याचा आदेश बँकांना दिला होता. मात्र, आज पहिल्याच दिवशी आयसीआयसीआय, स्टेट बँक, सेंट्रल बँक आणि आयडीबीआय या बँकांमध्ये सेवा कार्यान्वित न झाल्याने अनेक ग्राहकांनी त्यांच्याच एटीएममधून पैसे काढणे पसंत केले. कुठल्याही बँकेच्या एटीएममधून सेवाशुल्काविना पैसे काढण्याच्या सुविधेमुळे आपल्या बँकेचे एटीएम शोधण्याची पायपीट करण्यापासून मुक्ती मिळणार असली तरी पहिल्या दिवशी काही तांत्रिक अडचणीमुळे यावर परिणाम झाला. मात्र, लवकरच ही सेवा सुरळीत होईल, अशी अपेक्षा एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.