Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रामटेकमध्ये मुकुल वासनिक समर्थकांची दोन वाहने जप्त
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक यांच्या समर्थकांच्या सफारी

 

आणि तवेरा ही दोन वाहने रामटेक पोलिसांनी बुधवारी जप्त केली. विना परवानगी ही वाहने पक्षाची झेंडे लावून फिरत असताना निरीक्षकांना आढळून आल्यानंतर पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून जप्तीची कारवाई केली.
नगरधन भागात मुकुल वासनिक यांचा आज दौरा होता. त्यांची गावात मिरवणूक सुरू असताना रामटेकचे निरीक्षक अश्विनीकुमार राय आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जी.बी. संगीतराव हेदेखील त्याच भागात दौऱ्यावर होते. वासनिक यांच्या ताफ्यातील एमएच-३१-बीटी-५ ही सफारी आणि एमएच-१९-एई-३६९९ या तवेरा या दोन्ही वाहनांवर काँग्रेसचे झेंडे लागले होते. मात्र, त्या वाहनांची परवानगी नसल्याचे निरीक्षकांना आढळून आले. यावर तात्काळ दोन्ही वाहने जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
अश्विनीकुमार राय यांनी आज कन्हान, टेकाडी, तारसा, डोर्ली आणि नगरधन या संवेदनशील भागाचा दौरा केला. तसेच संगीतराव यांच्याकडून या भागाची माहिती जाणून घेतली.