Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या रौद्रावतारामुळे अधिकाऱ्याचे पलायन
नागपूर, १ एप्रिल/ प्रतिनिधी

निरीक्षण दौऱ्यावर आलेल्या अधिकाऱ्याने समस्या ऐकून घेण्यास वेळ न दिल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी

 

घोषणाबाजी करून या अधिकाऱ्याला मागच्या दाराने काढता पाय घ्यायला भाग पाडले.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ अभियंता (दक्षिण) गौतम बिऱ्हाडे आज बल्लारपूरला निरीक्षणासाठी गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी बल्लारपूर रेल्वे क्वार्टर्सची फारच वाईट अवस्था असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती केली. तसेच त्यासंदर्भात त्यांना एक निवेदनही दिले. बिऱ्हाडे यांनी तक्रार ऐकून न घेता, ‘आता वेळ नाही, नागपूरला येऊन काय ते बोला किंवा कनिष्ठ अभियंता (कार्य) येथे उपलब्ध आहेत, त्यांना तुमच्या समस्या सांगा’, या शब्दात सुनावले. त्यामुळे कर्मचारी भडकले आणि घोषणाबाजी करू लागले. हे बघून बिऱ्हाडे यांनी तेथून काढता पाय केला. चेन्नई-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसमधून ते नागपूरकडे रवाना झाले. परंतु, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पिच्छा सोडला नाही. त्यांनी नागपुरातील नॅशनल मजदूर युनियनचे पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून याबाबतची माहिती दिली.
नागपूर रेल्वे स्थानकावर युनियनचे विभागीय सचिव जी.एम. शर्मा, अध्यक्ष हबीब खान आणि दुर्गा डकाह यांच्या नेतृत्त्वाखाली कर्मचारी बिऱ्हाडे यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते. राजधानी एक्सप्रेस फलाट क्रमांक १ वर येताच कर्मचाऱ्यांनी घोषणा सुरू केल्या. हे कळताच इंजिनिअरिंग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिऱ्हाडे यांना निदर्शकांची नजर चुकवून दुसऱ्या बोगीतून रेल्वे स्थानकाबाहेर नेले, असे नॅशनल मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.