Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

साईसेवा मंडळाच्या विश्वस्तांविरुद्ध मानहानीचा दावा करणार
माजी संचालकांनी आरोप फेटाळले
न्यायालयाने लावला विश्वस्तांना चाप
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी
वर्धा मार्गावरील साई मंदिरच्या विश्वस्त मंडळाने आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात केलेले सर्व आरोप

 

माजी संचालक मंडळाने फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात विश्वस्त मंडळाने ४८ तासात माफी न मागितल्यास ५० लाख रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही माजी संचालकांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असलेल्या प्रकरणात न्यायालयाने, पुढचा आदेश मिळेपर्यंत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, असा चाप विश्वस्तांना लावला आहे.
श्री साई बाबा सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब उत्तरवार यांनी, काल माजी संचालकांच्या कार्यकाळात चारशे किलो चांदी आणि अडीच किलो सोन्याची अफरातफर झाल्याचा आरोप केला होता. हे सर्व आरोप माजी अध्यक्ष सुधाकर वाचासुंदर, सचिव शशिकांत खांडवेकर, अविनाश शेगावकर, सी.ए. चोथमल राठी आणि बिल्डर अनिल आष्टनकर यांनी आज फेटाळून लावले. शिर्डी येथे ८७ कोटी रुपयांचा प्लॉट घेतल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे. मात्र ८७ कोटी तर सोडाच ८७ रुपयांचाही प्लॉट माझ्या नावावर असेल तर दाखवा, असे आव्हान वाचासुंदर यांनी दिले. चारशे किलो चांदी आणि अडीच किलो सोने गहाळ होण्याच्या प्रकरणात सीबीआय चौकशीला तोंड द्यायला तयार आहोत, असे आव्हान शशिकांत खांडवेकर यांनी दिले.
बाबासाहेब उत्तरवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही सुपारी देऊन करण्यात आली असून ती बेकायदेशीर आहे. तसेच न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी उत्तरवार यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन तालेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा बनाव घडवून आणला, असा आरोप शेगावकर यांनी यावेळी केला. यावेळी माजी संचालकांनी त्यांच्या कार्यकाळात साई मंदिराचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालत होता, असा दावा केला. हा वाद न्या. भूषण धर्माधिकारी यांच्या खंडपीठापुढे सुरू असून प्रतिवादींनी पुन्हा वेळ मागितला आहे. पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार असून तोपर्यंत विश्वस्तांनी मंदिराच्या केवळ दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवावे. मात्र कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले.