Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नागपूरचा विक्रम लाभे ‘अल्पविराम’ चित्रपटाचे दिग्दर्शक
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

चित्रपट दिग्दर्शक जयंत गिलाटर यांच्या जे जे फिल्म बॅनरखाली तयार होणारा ‘अल्पविराम’ या

 

पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन नागपूरच्या विक्रम लाभे करणार असून या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईला प्रसिद्ध दिग्दर्शक अनिस बझमी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जयंत गिलाटर या चित्रपटाचे निर्माते असून चित्रपटाचे लेखन, पटकथा व दिग्दर्शन विक्रम लाभे यांनी केले आहे. या चित्रपटात मानसी साळवी, तुषार दळवी, बाळ धुरी, सुहिता थत्ते, सागर तळशीकर, कमलेश सावंत व बालकलाकार राहुल फाळके भूमिका करणार आहेत. संवाद गणेश पंडित यांचे आहे. ७९ टक्के चित्रपटाचे चित्रिकरण झाले असून मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल.
विक्रम लाभे यांनी आतापर्यंत बऱ्याच हिंदी-मराठी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. त्यात पेशवाई, नुपूर, रेशिमगाठी, जगावेगळी, अधुरी एक कहानी, काटा रुते कुणाला या मालिकांचा समावेश आहे. इंडिया कॉलिंग, ट्विंकल ब्युटी पॉलर या हिंदी मालिकाचे दिग्दर्शन केले आहे.
विक्रमला क्रिएटिव्ह फिल्मसचे उत्कृष्ट बाल चित्रपटाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. मूळचा नागपूरचा असलेला विक्रम लाभे तरुण दिग्दर्शक आहे. इंजिनियर असून केवळ कला क्षेत्रात आवड असल्यामुळे चित्रपट उद्योगात उतरला आहे. चित्रपट दिग्दर्शक संजय सुरकर यांच्यासोबत अनेक दिवस सहदिग्दर्शक म्हणून विक्रमने काम केले आहे.