Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शोभायात्रांसाठी ५ हजारावर पोलिसांचा कडक बंदोबस्त
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

शुक्रवारी शहरात रामनवमी व त्यानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत पाच हजारावर पोलिसांचा अत्यंत

 

कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. शहरात रामनवमीला धरमपेठ, मोतीबाग आणि महाल परिसरात शोभायात्रा काढल्या जातात. या तिन्ही शोभायात्रांच्या मार्गावर पोलीस जागोजागी तैनात राहतील.
पोद्दारेश्वर राम मंदिर ते परत राम मंदिर या २४ किलोमीटरच्या मार्गावर प्रत्येक किलोमीटरवर एक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व दहा शिपाई तैनात राहतील. खुद्द पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित, सहपोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले, अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर गावित, अनूपकुमारसिंह, शांताराम वाघमारे यांच्यापासून ते सर्व उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्तही बंदोबस्तात राहतील. एकटय़ा पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेत तीन हजाराहून अधिक पोलीस ताफा तैनात राहील. याशिवाय साध्या वेशातील दीड हजार शिपायांची शहरात पाळत राहील.
राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी, गृहरक्षक दलाचे साडेतीनशेहून अधिक जवान पोलिसांना मदत करतील. पोद्दारेश्वर राम मंदिर ते शहीद चौक तसेच बडकस चौक ते टिळक पुतळा या मागार्ंवर पोलिसांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. हा मार्ग अरुंद असल्याने गोंधळ वा चेंगराचेंगरीची घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी स्वयंसेवी संघटनांची मदत घेतली आहे. या मार्गावर रस्त्यांच्या दुतर्फा आणि इमारतींवर सशस्त्र पोलीस तैनात राहतील. दुर्बिणीतून या परिसरात सतत टेहळणी केली जाईल. शोभायात्रेच्या दोन्ही बाजूंना पोलिसांचे कडे राहील.
बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकही शोभायात्रेबरोबर चालणार असून श्वान शोभायात्रेच्या मार्गाची तपासणी करतील. शुक्रवारपासून पोलिसांच्या साप्ताहिक सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.