Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘जलसंसाधने व संवर्धनांची योग्य जपणूक केल्यास देशांचा विकास’
नागपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी

केंद्रीय जल आयोग नागपूर व भारतीय जलसंधारण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसंवर्धनाची

 

आवश्यकता व पद्धती’ विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी बंगलोरच्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे संचालक वाय.बी.एन. कृष्णमूर्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.टी. देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी कृष्णमूर्ती यांनी जलसंवर्धनाच्या प्रक्रियांची आवश्यकता व महत्त्व विशद केले. याबाबत सॅटेलाईट रिमोट सेन्सिंगच्या तंत्रज्ञानामुळे सुविधा व अद्ययावत माहिती उपलब्ध असल्याचे सांगितले. इस्त्रायलसारख्या देशात २५ ते ३० सेंटीमीटर इतका कमी पाऊस पडणाऱ्या देशाने जलसंवर्धनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून देशाचा नेत्रदीपक विकास साधला आहे. ज्या देशांनी जलसंसाधने आणि जलसंवर्धन यांची योग्य जपणूक केली त्या देशांचा विकास झपाटय़ाने होत आहे. त्यामुळे भारतानेही जलसंवर्धनावर भर देणे आवश्यक असल्याचे मत कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एस.टी. देशमुख यांनी जलसंवर्धनाच्या उपायांची आवश्यकता विशद केली. ग्रामीण व शहरी विभागातील रहिवासी तसेच शेतक ऱ्यांनी जलसंवर्धनाचे वेगवेगळे उपाय अंमलात आणले तर भूगर्भातील जलाची पातळी वाढेल व पृथ्वीवरील प्राणीमात्रांना व सृष्टीला जीवनदान मिळू शकेल, असेही देशमुख म्हणाले.
चर्चासत्रात पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. चर्चासत्रातील दोन सत्रात २१ मान्यवरांनी विविध विषयावरील लेखांचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले. कार्यक्रमाला भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत डोईफोडे, ए.एम. पाटील, एम.डी. रायपुरे, एस.जी. देशपांडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.