Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

महिला हवालदारास पोलीस ठाण्यात मारहाण
निरीक्षकाची बदली

ठाणे/प्रतिनिधी : कर्तव्यावरील महिला हवालदाराला मारहाण करून तिचा छळ केल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश वाशी न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली असून मारहाण करणाऱ्या या पोलीस निरीक्षकाची बदली सिंधुदुर्गमध्ये करण्यात आली आहे.

सेंट जोसेफची फीवाढ पालकांनी रोखली
पनवेल/प्रतिनिधी : खांदा कॉलनीच्या सेक्टर ११ मधील सेंट जोसेफ शाळेने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून एकतर्फी लागू केलेली जबर फीवाढ शेकडो पालकांनी बुधवारी उग्र आंदोलन करून रोखण्यास व्यवस्थापनाला भाग पाडले. या शाळेने यंदापासून सर्व इयत्तांच्या शुल्कांमध्ये ४० ते ५० टक्के एवढी वाढ पालकांना विश्वासात न घेता लागू केली.

डोंबिवली नागरी बँक पनवेलमध्ये
पनवेल/प्रतिनिधी

१९७० पासून कार्यरत असणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन मंगळवारी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिच्या हस्ते करण्यात आले. पनवेलमधील गोखले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी बँकेचे सदिच्छादूत आणि संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी, उद्योजिका मीनल मोहाडीकर, बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे, तसेच आजी-माजी संचालक उपस्थित होते.

ग्राहकांच्या हितासाठी शिवसेना ग्राहक कक्ष पाठीशी
उरण/वार्ताहर : शिवसेना ग्राहक कक्ष ग्राहकांच्या हितासाठी ग्राहकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन ग्राहक कक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. अरुण जगताप यांनी उरण येथे आयोजित कार्यक्रमातून केले. उरण-पनवेल शिवसेना ग्राहक कक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, जिल्हा कक्ष संपर्कप्रमुख राजू पाटील, कक्ष जिल्हाप्रमुख हरिभाऊ पाटील, गणेश घरत, तालुका कक्षप्रमुख रमेश म्हात्रे, आत्माराम कदम व ५०-६० पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उरण-पनवेल पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच शिवसेना ग्राहक कक्षांच्या कार्यपद्धतीची माहिती देऊन ग्राहकांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी ग्राहकांच्या पाठीशी ग्राहक कक्ष खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन अ‍ॅड. जगताप यांनी दिले.