Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे रडगाणे सुरूच
वृत्तान्त चमू / नाशिक, धुळे

 

रेल्वेमार्ग म्हणजे केवळ प्रवासाचे साधन नसून विकासाचाही मार्ग आहे, याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवलीच नाही. याचा अनुभव मनमाड-धुळे-इंदूर या रेल्वेमार्गाच्या बाबतीत सर्वाना घ्यावा लागत आहे. एखाद्या पक्षाचा अपवाद वगळता उत्तर महाराष्ट्रातील एकाही खासदाराने हा प्रश्न लावून धरला नाही. अलिकडेच या प्रश्नी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असली तरी त्या दृष्टीकोनातून अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू झाल्याचे दिसत नाही.
संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची क्षमता असलेल्या या रेल्वेमार्गाची मागणी थोडीथोडकी नव्हे तर शंभर वर्षांपासून स्थानिक जनता करीत आहे. देशाच्या रेल्वेमार्गाच्या जाळ्याच्या तुलनेत राज्यात केवळ चार टक्के एवढेच रेल्वेमार्ग आहेत. हे जाळे अधिक विस्तारण्याची गरज लोकप्रतिनिधींनी लक्षात घेतली नाही. या पाश्र्वभूमीवर, कोकण रेल्वेच्या उभारणीतील सर्व अडथळे दूर करण्याचे काम करणाऱ्या जॉर्ज फर्नाडिस यांची आठवण होते. पण, बहुसंख्य स्थानिक लोकप्रतिनिधी रेल्वेच्या बाबतीत उदासिन असल्यानेच या मार्गाचा प्रश्न १९०८ पासून भिजत पडला आहे. मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा-शिरपूर-सेंधवा-महू-इंदूर या रेल्वेमार्गाचा विषय मार्गी लागणे तर सोडाच पण दिवसेंदिवस तो अधिकाधिक गुंतागुंतीचा बनत गेला आहे. नियोजित रेल्वेमार्ग कसा तोटय़ाचा आहे आणि तो फायद्याचा कसा ठरणार नाही अशा नकारात्मक भूमिकेतच रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे पाहिले. पण, हा रेल्वेमार्ग कसा फायद्याचा आहे हे २००४ मध्ये खऱ्या अर्थाने उघड झाले. अंतर वाचविणारा, इंधनाची बचत करणारा, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यासह जवळपास ३५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रातील अडीच ते तीन कोटी जनतेसाठी हा रेल्वेमार्ग विकासाचे दरवाजे खुले करून देणारा असल्याचे नव्याने व एकत्रितपणे केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले. असे असताना या नियोजित रेल्वे मार्गाबाबत संबंधित लोकसभा मतदार संघांतील किती खासदारांनी किती प्रमाणात रेल्वेमार्ग होण्यासाठी धडपड केली हा संशोधनाचा विषय आहे.
ढोबळमानाने या रेल्वेमार्गाचा सकारात्मक विचार केला तर मध्य रेल्वेने मुंबई-दिल्ली हे अंतर १५४२ किलोमीटर नोंदविले आहे. पण, तेच अंतर नियोजित मुंबई-मनमाड-धुळे-शिरपूर-सेंधवा, धामणोद-महू-इंदूर या मार्गाने १४०६ किलोमीटर होईल. म्हणजे किमान १३६ ते १५० किलोमीटरचा एवढय़ा अंतराची बचत होईल. अवंतिका एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल ते इंदूर ८३० हे किलोमीटरचे अंतर धावते. तेच अंतर दररोज २५० किलोमीटरने कमी होवू शकते. इंदूर-पुणे हे अंतरही ३२० किलोमीटरने कमी होणार आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीच्या अंतरात ६८० किलोमीटरची बचत होवू शकते.
मध्यरेल्वेच्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेमार्गावरून प्रतिदिन २४ अतिजलद प्रवासी गाडय़ा व १६ अतिजलद मालगाडय़ांची वाहतूक होते. सरासरीने बचत होणारे अंतर पाहिल्यास एक दिवसात धावणाऱ्या सर्व रेल्वेगाडय़ांचे मिळून सुमारे ६३०० किलोमीटर अंतराची बचत होईल. असा हा रेल्वेमार्ग १०० वर्षांपासून केवळ मागणी या शब्दापुरताच मर्यादित राहिला होता.
वर्षभरापूर्वी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या प्रश्नी सकारात्मक भूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारने रेल्वेमार्गाचा निम्मा खर्च उचलण्याचा तोडगा पुढे आला आहे. महाराष्ट्र शासनानेही त्याला मान्यता दर्शविली आहे. पण, भविष्यात त्याचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे.