Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दिंडोरीत रूसवे फुगवे सुरूच
नाशिक / प्रतिनिधी

 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ व माकपचे उमेदवार जीवा पांडु गावित यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघातील तिन्ही प्रमुख पक्षांमधील प्रचार रंगतदार उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. गावित यांच्यासाठी माकपचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावांगावांमध्ये प्रचारार्थ गुंतले असताना झिरवाळ व चव्हाण यांना मात्र अजूनही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करीत फिरावे लागत आहे.
कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा फटका भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ दोघांना जाणवू लागला आहे. कळवण येथे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. ए. टी. पवार यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याचा विषय अधिकच चर्चेत आला आहे. आपणास उमेदवारी न देण्यामागील कारण स्पष्ट करा, या त्यांच्या मागणीमुळे सर्वच उपस्थित चपापले. पवार हे कार्यकर्त्यांसह बैठकीतून निघून गेल्यानंतर तेथे मोजकेच कार्यकर्ते शिल्लक राहिल्याने झिरवाळ यांना आपणांस अजून किती मजल मारायचीोहे, हे लक्षात आले असेल. कळवणचा हा अनुभव दुसरीकडे येऊ नये म्हणून राष्ट्रवादीतर्फे काळजी घेण्यात येत असून चांदवड, येवला, निफाड येथे बैठकांचे नियोजन करताना पक्षातील सर्वच ज्येष्ठांनाही आमंत्रित करण्यात येत आहे. भुजबळ स्वत: झिरवाळ यांच्यासाठी प्रयत्न करीत असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आशादायक वातावरण आहे. भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारात उतरविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे. मतदारसंघात भाजपपेक्षा शिवसेनेचे बळ अधिक असल्याने त्यांची साथ मिळाल्याशिवाय वाटचाल अवघड असल्याची जाणीव चव्हाण यांना असल्यानेच त्यांनी सेनेला विश्वासात घेण्यास सुरूवात केली आहे.
माकपतर्फे राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील अनेक नेत्यांच्या सभा घेण्यात येणार आहेत. बसपतर्फे दीपक गांगुर्डे यांची उमेदवार जाहीर झाली असून गांगुर्डे यांची उमेदवारी कुणाला घातक ठरू शकते, याची चाचपणी इतर पक्षांकडून करण्यात येत आहे. भारिप बहुजन महासंघाचे संपत पवार हे गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.